नागेशीला आढळलेल्या शिलालेखाशी साधर्म्य दर्शविणारा हा वारसा जतन करणे महत्वाचे आहे. डिचोलीतील शांतादुर्गेच्या आशीर्वचनात विसावलेल्या या भूमीचा ऐतिहासिक वारसा सांगणारा हा शिलालेख अस्मितेचा मानदंड आहे.
डिचोलीतील बोर्डे-कुंभारवाडा येथील वयोवृद्ध लोककलाकार रमाकांत शेटकर यांच्या जिज्ञासुवृत्तीमुळे पूर्णपणे विस्मृतीत जाण्याच्या वाटेवर असलेला ऐतिहासिक शिलालेख पुन्हा एकदा प्रकाशात आला. गोव्याच्या इतिहासात एकेकाळी महत्त्वाचे स्थान असलेल्या डिचोली शहराची आजची स्थिती अत्यंत हलाखीची झालेली असून, लोकवस्ती आणि इमारतीची संख्या झपाट्याने वाढत आहे. ही मनमानी वाढ रोखण्यासाठी लवकरात लवकर नियोजनबद्ध योजना कार्यान्वित झाली नाही, तर त्याची कटुफळे इथल्या भूमिपुत्रांच्या वाट्याला येतील. हे शहर प्राचीन काळापासून अस्तित्वात असले पाहिजे. पूर्वी कोल्हापूर संस्थान, हेरे संस्थान, त्याचप्रमाणे विजापूर संस्थानाकडे जाणारा रामघाट दोडामार्गला जोडणारा असल्याने तेथून लाडफे, व्हाळशीमार्गे डिचोलीला येणे शक्य होते. डिचोली शहरातील बंदिरवाडा इथे अस्तित्वात असलेल्या बंदराची आठवण जागृत करत असून आजही इथे असलेली सुंदरपेठ, आतीलपेठ, भायलीपेठ ही स्थलनावे शहराच्या वेगवेगळ्या पेठ्यांची कल्पना आणून देत आहेत.
पाद्री लेवनार्दु पाईस यांनी लिस्बन येथे १७१३ साली प्रकाशित केलेल्या पुस्तकात मोगल बादशहा औरंगजेब याचा मुलगा अकबर द्वितीय, डिचोली येथे राहात असल्याचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. डिचोलीत एकेकाळी दुसरे खेम सावंत भोसल्यांनी किल्ला बांधला. पुढे १७२५ च्या सुमारास फोंड सांवत यांनी दोन इंग्रज अभियंत्यांच्या साहाय्याने त्याची डागडुजी केल्याची नोंद आढळते. १७ मे १७२६ रोजी हा किल्ला पोर्तुगीजांनी सावंतवाडकरांकडून जिंकून घेतला. १६८१ मध्ये छत्रपती संभाजी डिचोलीला गेल्याचे उल्लेख आढळतात. संभाजी महाराजांनी डिचोली व कुडाळ येथे दोन दारूचे कारखाने उभारले होते. औरंगजेब पुत्र शहाआलम हा रामघाटातून ७ जानेवारी १६८४ रोजी कोकणात पोहोचला आणि त्यानंतर १५ जानेवारीला तो डिचोलीत पोहोचल्याचा उल्लेख पोर्तुगीज दफ्तरात आढळतो. त्यानंतर शहाजादा अकबर डिचोलीहून गोवा-कर्नाटक सीमेवर आज घनदाट अरण्यात वसलेल्या भीमगडास गेल्याबद्दलचा उल्लेख पोर्तुगीजांच्या नोंदीत असून पुढे भीमगडास मोंगलांनी वेढा घातला होता. १५ जानेवारी १६८४ रोजी शहाआलम डिचोलीत पोहोचला. त्यांच्या सैन्यात ४० हजार घोडेस्वार, ६० हजार पायदळ, ९९०० हत्ती आणि २० हजार उंट होते असे संदर्भ आढळतात.
आग्वाद किल्ल्यासमोर सैन्यासाठी धान्यसामुग्री घेऊन औरंगजेबाचे आरमार दाखल झाले होते, त्यावेळी मोगलांनी डिचोली हे संभाजी महाराजांचे शहर जाळून टाकले. तेथे असलेले शहाजादा अकबर व छत्रपती संभाजी यांच भव्य वाडे जमीनदोस्त केले, असा उल्लेख जदुनाथ सरकार यांनी केलेला आहे. औरंगजेबाचा हिंदू चरित्रकार ईश्वरदास नागर याच्या वर्णनाप्रमाणे हे शहर मोठे असून त्यात इंग्रज, फ्रेंच, डच व पोर्तुगीज यांचेही वाडे होते. बिशप दो मातेऊस् द कास्त्रू याने डिचोलीत सुंदर कॅथॉलिक मंदिर बांधले होते. डिचोलीच्या सुभेदाराच्या अमलाखाली भतग्राम, साखळी (सतर), पेडणे, मणेरी व बांदा हा प्रदेश असे याचा उल्लेख केलेला आहे. या साऱ्या ऐतिहासिक संदर्भावरून डिचोली शहराच्या एकंदर विस्ताराची कल्पना येते.
घाट माथ्यावरून येणारे व्यापारी, यात्रेकरू याच्या तांड्यांना डिचोलीतल्या नदीत असलेल्या जलमार्गाद्वारे ये-जा करता येत असे. आज डिचोली आणि परिसरातल्या डोंगरातून प्रचंड प्रमाणात खनिज साठ्यांचे उत्खनन करण्यात आल्याने खाणमातीच्या गाळाने या नदीतील जलमार्ग आपले गतवैभव हरवून बसलेला आहे.
जुन्या काळी डिचोली शहर म्हणून विकसित होण्यास ज्या बाबी कारणीभूत ठरल्या, त्यात डिचोलीत ३० गावांचे तपे होते. त्याचप्रमाणे त्याला कसबा म्हणूनही त्याकाळी प्रशासकीय महत्व प्राप्त झाले होते. ११ जून १७४५ रोजी छत्रपती शाहू महाराजाचे पेशवे बाळाजी बाजीराव यांनी हे गाव शांतादुर्गा देवस्थानास इनाम दिल्याचा उल्लेख आढळतो. वामन नारायण पालेकर यांच्या १४ जून १९२६ रोजी शांतादुर्गा देवस्थानाबाबत प्रकाशित करण्यात आलेल्या पुस्तकात कुडाळ येथील सूर्यभानू देसायांच्या अमदानीत बोर्डे, डिचोली, लामगाव व पिळगाव या चार गावांचे भाग एकत्र करून कसबा वसविल्याचा उल्लेख आहे. याच पुस्तकात डिचोलीत शिलालेख असून त्यात या चार गावांच्या सीमांची अदलाबदल करील तो गदर्भविर्याचा होईल, अशी माहिती आढळते.
रमाकांत शेटकर यांनी त्यांच्या बालपणी सासष्टी वाड्याजवळ असलेल्या शेतजमिनीत कोरीवकामाने युक्त असलेला पाषाणी स्तंभ पाहिला होता. त्या स्तंभावरची चित्रे आणि अक्षरेही पाहिली होती. आज या स्तंभावरची अक्षरे आणि चित्रे गायब झालेली असून, केवळ शेवटच्या भागात गाढव आणि स्त्री यांच्या संभोगाच्या दृश्याचे चित्र तेवढे शिल्लक आहे. ही शेतजमीन सर्वे क्र. ३६/८ असून तिचा उल्लेख निसाचे शेत असा असून ती महादेव पिस्सुलो परब यांच्या ताब्यात आहे. पूर्वी या जमिनीत सर्द आणि वायंगण अशी दोन मोसमात भातशेती केली जायची. शेतात राबणाऱ्या कष्टकऱ्यांसाठी हा शिलास्तंभ लोकधर्माचे संचित ठरला होता आणि त्यामुळे लामगावच्या अखत्यारित येणाऱ्या या स्तंभावर देवीच्या कळसाचे 'न्हावण' अर्पण केले जायचे तर बोर्डे येथील महामाया रवळनाथ देवस्थानचे भाविकही आपला आदरभाव प्रकट करायचे. खाण व्यवसायामुळे जेव्हा लामगावातील शेतजमीन नापिक होऊ लागली, तेव्हा हा शिलास्तंभ लोकजीवनातून हळूहळू विस्मृतीत जाऊ लागला. त्यामुळे त्याच्यावर असलेला शिलालेख, त्याची लिपी हे सारे कधीच इतिहासजमा झालेले आहे.
हा शिलालेख डिचोली शहराच्या मध्ययुगीन इतिहासाचा साक्षीदार असल्याने त्याचे संवर्धन आणि संरक्षण प्राधान्यक्रमाने करण्याची गरज आहे. आज चिखलमय परिसरात एका मोयच्या झाडाशेजारी उभा असलेला हा शिलालेख अत्यंत दयनीय स्थितीत असून डिचोली, बोर्डे, पिळगाव आणि लामगाव या चारही गावातील सांस्कृतिक अनुबंध दर्शवणारा हा इतिहासाचा वारसा इथले स्थानिक विसरलेले आहेत. डिचोली, बोर्डे परिसरातल्या सिमेंट काँक्रिटच्या इमारतींच्या विस्तारात दिवसेंदिवस इथला पुरातत्वीय आणि सांस्कृतिक वारसा विस्मृतीत जात असून, ही परिस्थिती अशीच राहिली तर उरलासुरला दस्तावेजही गायब होणार आहे. बांदोड्यातील नागेशीला आढळलेल्या शिलालेखाशी काही अंशी साधर्म्य दर्शविणारा हा वारसा जतन करणे आज महत्वाचे आहे. डिचोलीची ग्रामदेवी शांतादुर्गेच्या आशीर्वचनात विसावलेल्या या भूमीचा ऐतिहासिक वारसा सांगणारा हा शिलालेख अस्मितेचा मानदंड आहे.

प्रा. राजेंद्र केरकर
(लेखक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते
असून पर्यावरणप्रेमी आहेत.) मो. ९४२१२४८५४५