बिहारनंतर भाजपचे पुढचे लक्ष्य स्टॅलिन व ममता

ज्या पद्धतीने बिहारने राष्ट्रीय राजकारणाला नवा टप्पा दिला, त्याच पद्धतीने तामिळनाडू आणि बंगाल ही दोन राज्ये आता २०२६ ते २०२९ या काळातील भारतीय राजकीय क्षेत्राला वेगळे वळण देऊ शकतील.

Story: विचारचक्र |
15 hours ago
बिहारनंतर भाजपचे पुढचे लक्ष्य स्टॅलिन व ममता

बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने मिळवलेला अद्वितीय विजय हा फक्त एका राज्यापुरता मर्यादित घडामोडीचा भाग नाही. हा निकाल २०२६-२०२९ या पुढील निवडणूक-चक्रातील राष्ट्रीय राजकारणाचा दिशादर्शक ठरणार आहे. बिहारनंतर आता भाजपची रणनीती स्पष्टपणे दक्षिणेच्या दिशेने व पूर्वेकडील राज्यांकडे  केंद्रित होताना दिसते. या समीकरणात दोन व्यक्तिमत्वे सर्वाधिक चर्चेत आहेत, ती म्हणजे तामिळनाडूचे मुख्यमंत्री व द्रमुक प्रमुख एम. के. स्टॅलिन आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी. दोघेही स्वतःच्या राज्यांत प्रबळ, प्रभावी आणि प्रादेशिक अस्मिता जपणारे नेते आहेत. एकीकडे भाजपचा संघटन विस्तार आणि दुसरीकडे केंद्रीय नेतृत्वाचा आक्रमक निवडणूक पवित्रा, यामुळे स्टॅलिन आणि ममता हे आता नैसर्गिकरीत्या भाजपच्या पुढच्या राजकीय रणांगणावर उभे राहणारे प्रतिस्पर्धी बनले आहेत.

बिहारमध्ये एनडीएने मिळवलेला जबरदस्त पाठिंबा हे भाजपसाठी तीन स्तरांवर महत्त्वाचे यश मानले जाते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपची गती मंदावली होती, बिहारने ती पुन्हा वाढवली. मोदी आणि नितीश कुमार यांचे 'डबल इंजिन' मॉडेल अजूनही प्रभावी ठरते, विशेषतः महिला कल्याण योजनांमुळे असे दिसून आले. संघटना व बूथ व्यवस्थापन याबाबत असे दिसून आली की, संघटनात्मक ताकद जर योग्य वेळी धोरणात्मक पातळीवर वापरली तर प्रादेशिक पक्षांना सहज मागे टाकता येते. या पार्श्वभूमीवर भाजपला आता ज्याठिकाणी वाढीची संधी आहे, त्या राज्यांवर लक्ष केंद्रित करणे स्वाभाविक ठरते. त्यात पहिले नाव आहे तामिळनाडू आणि दुसरे पश्चिम बंगाल. तामिळनाडूत स्टॅलिन विरुद्ध मोदी हा एक विचारसरणीचा संघर्ष आहे. तामिळनाडू हे भारतातील सर्वाधिक राजकीयदृष्ट्या जागृत राज्य मानले जाते. धर्मनिरपेक्ष द्रविड मॉडेल आणि हिंदुत्ववादाचा संघर्ष हा इथे अनेक दशकांपासून स्पष्टपणे जाणवतो आहे. दक्षिणेत केरळ व तामिळनाडू हे भाजपसाठी सर्वात अवघड प्रदेश समजले जातात. द्रमुकचा मजबूत कॅडर असून प्रत्येक गावापर्यंत त्यांचा संघटनात्मक प्रभाव आहे. भाजपला दक्षिणेत पाय रोवायचे आहेत. २०२९ च्या राष्ट्रीय समीकरणासाठी दक्षिणेत किमान ३०-४० जागा मिळवण्याची रणनीती भाजपने आखली आहे.

तामिळनाडूत लोकप्रिय कल्याणकारी योजना ही स्टॅलिनची ताकद आहे. त्याशिवाय तमिळ ओळख व प्रादेशिक अभिमान ही जमेची बाजू मानली जाते. याउलट भाजपची प्रतिमा उत्तर भारतीय, हिंदी पट्ट्यातील पक्ष अशी आहे. असे असले तरी बिहारनंतर भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे. सामाजिक अभियांत्रिकी अधिक केंद्रातील योजनांचा लोकानुभव आणि महिलांचा पाठिंबा या तिहेरी सूत्राने कोणताही किल्ला पाडता येतो, असे बिहारात दिसून आले. तामिळनाडूमध्येही हे प्रयोग सुरू झाले आहेत. केंद्रीय योजनांचा लाभार्थी वर्ग वाढत आहे, महिला मतांच्या पॅटर्नमध्ये किंचित बदल दिसू लागला आहे आणि अण्णाद्रमुकसोबत नव्या समीकरणांची चर्चा सुरू आहे. दक्षिण विरुद्ध उत्तर या द्रमुकच्या पारंपरिक प्रचाराला उत्तर देण्याची तयारी सुरू आहे. केंद्राच्या योजनांचे थेट डिलिव्हरी मॉडेल विरुद्ध द्रमुकचे राज्यस्तरीय मॉडेल अशी तुलना केली जाते. २० ते २५ वयोगटातील शहरी मतदारांबाबत आक्रमक मोहीम राबवली जात आहे. तसेच द्रमुक आणि अण्णाद्रमुक या पक्षांना तिसरा पर्याय म्हणून भाजपला पुढे आणण्यासाठी प्रयत्न केले जातील.

ममता बॅनर्जी या पूर्व भारतातल्या सर्वात प्रबळ प्रादेशिक नेत्यांपैकी एक आहेत. बंगालमधील सांस्कृतिक राष्ट्रवाद, उपनिवेशवादी इतिहास, बुद्धिजीवी राजकारण आणि ग्रामीण संघटन रचना यामुळे ममता आजही दमदारपणे उभ्या आहेत परंतु, २०१९च्या लोकसभा आणि २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप जवळजवळ पहिला पर्याय बनला. २०२६ च्या तयारीसाठी आता बिहारनंतर पुन्हा बंगाल भाजपने आपले लक्ष्य ठरवले आहे, कारण पूर्व भारतातील हा अंतिम मोठा किल्ला तर आहेच, शिवाय केंद्र विरुद्ध राज्य संघर्षाचा प्रमुख चेहरा म्हणून ममता बॅनर्जींकडे पाहिले जाते. तृणमूलमधील अंतर्गत असंतोष, उद्योग, गुंतवणूक व प्रशासनावर वाढते प्रश्नचिन्ह, भाजपची नवीन रणनीती तसेच बिहारच्या यशानंतर बंगालमधील तीन कोटी महिला मतदार हा निर्णायक वर्ग ठरणार आहे. बंगाल सरकार लाभार्थ्यांना रोखत आहे, हा मुद्दा आक्रमकपणे पुढे आणण्यात येत आहे. राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेवर प्रकाशझोत टाकताना भाजप संदेशखाली प्रकरणासारख्या घटनांचा उल्लेख करीत आहे. तृणमूलची ताकद म्हणून बंगालची सांस्कृतिक अस्मिता, अल्पसंख्याक व ग्रामीण महिलांचा मोठा जनाधार, दीदी हा भावनिक ब्रँड आणि मतदारसंघ पातळीवरील मजबूत तृणमूल नेटवर्क याचा उल्लेख करावा लागेल. नवीन भूगोलिक विस्तार तसेच स्टॅलिन आणि ममता यांच्या मोठ्या प्रादेशिक शक्तींचे प्रभावक्षेत्र मर्यादित करणे ही भाजपची नवी रणनीती आहे. भाजप तामिळनाडूत विचारसरणीचा लढा, तर बंगालमध्ये भावनिक-राजकीय लढा लढणार असे दिसते. ज्या पद्धतीने बिहारने राष्ट्रीय राजकारणाला नवा टप्पा दिला, त्याच पद्धतीने तामिळनाडू आणि बंगाल ही दोन राज्ये आता २०२६ ते २०२९ या काळातील भारतीय राजकीय क्षेत्राला वेगळे वळण देऊ शकतील. या संघर्षातून उद्या कोण वरचढ स्टॅलिन, ममता की भाजप यावर देशाचे राजकीय चित्र बदलू शकते. ममता असो किंवा स्टॅलिन यांचे आपल्या राज्यातील स्थान बळकट असल्याने भाजपची वाटचाल सोपी नाही, हे सांगण्यासाठी कोणा राजकीय निरीक्षकांची गरज नाही. कमकुवत काँग्रेसच्या तुलनेत हे दोन पक्ष तुल्यबळ आहेत, असे आजचे चित्र आहे. ते बदलणे हेच भाजपसमोर मोठे आव्हान आहे.


गंगाराम केशव म्हांबरे

(लेखक पत्रकार असून विविध 

विषयांवर लेखन करतात)

मो. ८३९०९१७०४४