
कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरू आहे. त्यावरून मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार गटांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. सिद्धरामय्या सरकारला अडीच वर्षे पूर्ण झाल्यामुळे शिवकुमार मुख्यमंत्रिपद मिळवण्यासाठी हालचाली करताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांचे समर्थक आमदार वरचेवर दिल्लीला जाऊन वरिष्ठ नेत्यांची भेटी घेत आहेत. राहुल गांधी यांनी शिवकुमार यांना धीर धरण्याचे निर्देश दिल्याची माहिती समोर आल्याने होणाऱ्या घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेल्या आठवड्यात किमान १५ आमदार आणि अनेक विधान परिषद सदस्यांनी शिवकुमार यांना मुख्यमंत्री म्हणून नियुक्त करण्याची विनंती करण्यासाठी दिल्लीत तळ ठोकला होता. डी. के. शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी २०२३ मध्ये झालेल्या सत्तावाटप करारावर आधारित असल्याचे सांगितले जात आहे. त्याअंतर्गत सिद्धरामय्या यांनी अडीच वर्षांचा कार्यकाळ (२० नोव्हेंबरपर्यंत) पूर्ण केल्यानंतर शिवकुमार यांना मुख्यमंत्रिपद सोपवायचे होते. मे २०२३ च्या विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर मुख्यमंत्रिपदासाठी सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्यात तीव्र स्पर्धा होती. सिद्धरामय्या यांची मुख्यमंत्री आणि शिवकुमार यांची उपमुख्यमंत्री म्हणून निवड झाली असली तरी अडीच वर्षांनंतर शिवकुमार सूत्रे हाती घेतील. या ‘रोटेशनल फॉर्म्युला’बद्दल त्यावेळी मोठी चर्चा होती.
शिवकुमार राहुल गांधींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. अखेर राहुल गांधींनीच त्यांना ‘थोडी वाट पाहा, मी तुम्हाला फोन करतो’, असा मेसेज व्हॉट्सअॅपवर पाठवला आहे. शिवकुमार २९ नोव्हेंबरला दिल्लीला जाण्याची तयारी करत असून त्यांनी सोनिया गांधी यांची भेटीसाठी वेळ मागितली आहे. सिद्धरामय्या समर्थकांनी नेतृत्वबदलाच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. त्यांचा दावा आहे की, कोणताही औपचारिक अडीच वर्षांचा रोटेशनल करार झालेला नाही. सिद्धरामय्या पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतील. काही झाले तरी पाच वर्षे आपणच मुख्यमंत्री राहणार, असा दावा सिद्धरामय्या यांनी केला होता. आता त्यांचा सूर मवाळ झाला आहे. हायकमांडची इच्छा असेल तोपर्यंत आपण मुख्यमंत्रिपदावर राहू, असे ते म्हणतात. बदललेला सूर शिवकुमार यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.
सूत्रांच्या मते, काँग्रेस राज्यात नेतृत्व बदलाचा विचार करत आहे. सिद्धरामय्या यांना हटवण्याचे फायदे आणि तोटे विचारात घेतले जात आहेत. शिवकुमार यांना मुख्यमंत्री नियुक्त केल्याने वोक्कालिगा समुदायाचा पाठिंबा मिळेल. २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत त्याचा फायदा होईल. शिवकुमार वोक्कालिगा समुदायाचे आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत लिंगायत समुदायाचे ३९ आणि वोक्कालिगा समुदायाचे २५ आमदार काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाले होते. २०२९ च्या निवडणुकीत वोक्कालिगा समुदायाचा पाठिंबा मिळाला नाही, तर ते पक्षासाठी हानिकारक ठरू शकते.
- प्रदीप जोशी