कोकणी भवनसाठी दिले ५.५ कोटी : सिद्दण्णा मेटी

पणजी : गोवा मुक्ती संग्रामादरम्यान कर्नाटकातील अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी बलिदान दिले. मंगळुरुतील कोकणी भवनासाठी कर्नाटक सरकारने जमीन तसेच ५.५ कोटी रुपये दिले आहेत. आम्हाला ‘घाटी’ म्हणून हिणवू नका. लहान लोकांचा वापर राजकारणासाठी करू नका, असे आवाहन कन्नड साहित्य परिषदेचे अध्यक्ष सिद्दण्णा मेटी यांनी रिव्होल्यूशनरी गोवन्सचे (आरजी) अध्यक्ष मनोज परब यांना केले.
"फक्त लहान लोकांचा वापर करून तुमचे राजकारण करू नका, तुमच्या राजकारणाशी आम्हाला काही देणेघेणे नाही. आम्हाला सन्मानाने जगू द्या. आम्हाला घाटी म्हणून हिणवू नका."
- सिद्दण्णा मेटी (अध्यक्ष, कन्नड साहित्य परिषद)
कर्नाटक सीमा क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी मंगळवारी कन्नड महासंघाच्या गोव्यातील पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. गोव्यातील कन्नड भवनच्या विषयासह गोव्यात ‘घाटी’ शब्दावरून निर्माण झालेल्या वादावरही आजच्या बैठकीत चर्चा झाली. यापुढे कोणी ‘घाटी’ म्हटल्यास कशा पद्धतीने त्याला प्रत्युत्तर द्यावे आणि भविष्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पुढील काही दिवसांत निर्णय घेणार असल्याचे मेटी म्हणाले.
मुक्तीसंग्रामातील योगदान विसरलात?
गोव्याच्या मुक्तीसंग्रामावेळी कर्नाटकातील स्वातंत्र्य सैनिक जगन्नाथ राव यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य सैनिकांचे जथे आले होते आणि अनेकांनी बलिदान दिले. आज आमची तिसरी पिढी इथे आहे. त्यांना चांगली कोकणी येत नसेल, पण कर्नाटकात राहणाऱ्या गोमंतकीयांना तरी कन्नड येते का? असा रोखठोक सवाल त्यांनी उपस्थित केला.
कायदा सुव्यवस्थेचा इशारा
आम्हाला घाटी म्हणणारे काही लोक भविष्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गोव्यात निर्माण करू शकतात, अशी भीती मेटी यांनी व्यक्त केली. त्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.