लॉजिस्टिक्स मॅनेजरलाही अटक : सशर्त जामिनावर सुटका; वेर्णातील कंपनीत आग, बेतुल येथे स्फोट झालेल्या कंपनीशी संबंध

पणजी : परदेशातून बनावट कागदपत्रांद्वारे १ कोटी ११ लाख रुपये किमतीच्या दारूगोळ्याची बेकायदेशीर आयात केल्याप्रकरणी केंद्रीय महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) गोवा विभागाने मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी वेर्णा येथील ‘ह्युज प्रेसिझन’ या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक संजय वेद्राक्ष सोनी आणि लॉजिस्टिक्स मॅनेजर जयेश पांडुरंग शेट्ये या दोघांना अटक करण्यात आली होती. सध्या त्यांना सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे.
एकूण जप्ती : १ कोटी ११ लाख १५ हजार ९६५ रुपये.
वेर्णा येथील ‘ह्युज प्रेसिझन’ ही कंपनी बेकायदेशीर पद्धतीने दारूगोळ्याची आयात करत असल्याची गोपनीय माहिती डीआरआयला मिळाली होती. त्याआधारे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात छापा टाकला असता, कंपनीने सहा वेगवेगळ्या खेपांमधून हा साठा आणल्याचे समोर आले. तपासणीदरम्यान कंपनीकडे दोन प्रकारची इनव्हॉइस आणि पॅकिंग लिस्ट सापडली, ज्यामुळे त्यांनी वैध परवान्याशिवाय आयात केल्याचे उघड झाले.
दिशाभूल आणि अटक
चौकशीदरम्यान कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बनावट ईमेल्स आणि कागदपत्रे सादर करून तपास यंत्रणेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. या कारणास्तव डीआरआयने गुन्हा दाखल करून १९ नोव्हेंबर रोजी कंपनीचे एमडी आणि मॅनेजरला अटक केली.
आरोप (DRI) : कंपनी अधिकाऱ्यांनी तपासात सहकार्य केले नाही आणि खोटी माहिती दिली. (PP आशा देसाई)
बचाव (Defense) : अटक करताना योग्य प्रक्रिया पाळली नाही, नोटीस दिली नाही. (Adv. सुबोध कंटक)
आगीमागे कंपनीचा हलगर्जीपणा
वेर्णा येथील कारखान्यात जून २०२५ मध्ये लागलेल्या आगीच्या घटनेतही कंपनीचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचे तपासात समोर आले आहे. जिथे अत्यंत संवेदनशील दारूगोळा साठवला जातो, तिथेच ज्वलनशील पुठ्ठ्यांची खोकी ठेवल्याने ही दुर्घटना घडली होती.
बेतूल प्रकरण : मुख्य सचिवांचा दिलासा, पण सुरक्षा ‘वाऱ्यावर’
बेतूल-नाकेरी येथील कंपनीच्या गोदामाला २० मार्च २०२५ रोजी भीषण आग लागून १४.५ टन दारूगोळा खाक झाला होता. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी कंपनीचा ‘ना हरकत दाखला’ (NOC) रद्द केला होता. मात्र, मुख्य सचिव डॉ. व्ही. कांडावेलू यांनी नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वावर हा दाखला पुन्हा बहाल केला आहे.