८ लाखांहून अधिक मतदारांनी भरले अर्ज
पणजी : गोव्यात सुरू असलेल्या मतदार पडताळणी (एसआयआर) मोहिमेअंतर्गत अर्ज स्वीकारण्याची मुदत संपायला अजून ११ दिवस बाकी आहेत. तरीही, ३० नोव्हेंबरपर्यंत भरलेले अर्ज सादर करण्याचे काम पूर्ण होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. रविवारपर्यंत एकूण ८ लाख २७ हजार ६०८ अर्ज सादर झाले असून हे प्रमाण ६९.८४ टक्के इतके आहे.
राज्यातील एकूण ११ लाख ८५ हजार ०३४ मतदारांना अर्जांचे वाटप करण्यात आले आहे. त्यापैकी सुमारे ७० टक्के अर्ज जमा झाले असून, आता केवळ ३० टक्के अर्ज सादर होणे बाकी आहे. मतदार पडताळणीचे अर्ज देण्याची मोहीम ४ नोव्हेंबरला सुरू झाली होती. मतदारांनी माहिती भरून हे अर्ज ४ डिसेंबरपर्यंत सादर करणे आवश्यक आहे. कुठून किती अर्ज आले, याचा दररोज आढावा घेतला जात असल्याची माहिती उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी अंकित यादव यांनी दिली.
बीएलओंना तीन भेटी सक्तीच्या
बूथ लेव्हल ऑफिसर्सकडून (बीएलओ) अर्ज सादर होण्याचे प्रमाण समाधानकारक आहे. भरलेला अर्ज घेण्यासाठी बीएलओंना कमीतकमी तीन वेळा संबंधित मतदाराच्या घरी भेट देणे सक्तीचे करण्यात आले आहे. या कष्टांमुळेच अर्ज जमा होण्याच्या कामाला वेग आला आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने २७ ऑक्टोबरला गोव्यासह १२ राज्यांत मतदार पडताळणी मोहिमेची घोषणा केली होती. आयोगाच्या वेळापत्रकानुसार, २८ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या काळात अर्जांची छपाई झाली. त्यानंतर ४ नोव्हेंबरपासून अर्ज वाटपाला सुरुवात झाली. बीएलओंनी घरोघरी जाऊन मतदारांपर्यंत अर्ज पोहोचवले असून, नोंदणीकृत १०० टक्के मतदारांपर्यंत अर्ज पोहोचल्याचा दावा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी संजय गोयल यांनी केला.