मुरगाव मुख्याधिकाऱ्यांची शैक्षणिक संस्थांच्या प्रतिनिधींसोबत बैठक

वास्को : येथील विविध शैक्षणिक संस्थाप्रमुख तसेच इतर संस्थांच्या प्रतिनिधीसमवेत मुरगाव पालिकेचे मुख्याधिकारी सिद्धीविनायक नाईक यांनी बैठक घेऊन विद्यालय तसेच संबंधित संस्थांच्या आवारात भटकी कुत्रे (Stray dogs) येऊ नयेत, यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, यासंबंधी चर्चा केली. शैक्षणिक संस्था व इतर संस्था परिसरात भटकी कुत्री चावण्याच्या घटना शून्यावर आणण्याच्या उद्दिष्टावर सिद्धीविनायक नाईक यांनी भर दिला.
सर्वोच्च न्यायालयाचे (supreme court) निर्देश आणि उपाययोजना
सर्वोच्च न्यायालयाच्या (supreme court) निर्देशानुसार भटक्या कुत्र्यांच्या समस्येसंदर्भात चर्चा करण्यासाठी मुरगाव पालिका क्षेत्रातील विविध शैक्षणिक संस्थाप्रमुख तसेच बस स्थानक, विविध आरोग्य केंद्र, इस्पितळ संबंधित प्रतिनिधी उपस्थित होते. आवारामध्ये भटक्या कुत्र्यांचे प्रवेश रोखण्यासाठी आठ आठवड्यांच्या आत योग्य कुंपण, दरवाजे व इतर संरचनात्मक उपाययोजना करणे, भटके कुत्री (Stray dogs) आवारात येऊ नयेत किंवा राहू नयेत, यासंबंधी देखरेख करण्यासाठी तसेच स्वच्छतेसाठी नोडल अधिकारी नेमणे, नोडल अधिकाऱ्याचे नाव, संपर्क तपशील ठळकपणे प्रदर्शित करणे, आवारात आढळणाऱ्या प्रत्येक कुत्र्याला तेथून बाहेर काढणे, यासंबंधी माहिती देण्यात आली.
१ डिसेंबरपर्यंत कुंपण उभारणे बंधनकारक
मुरगाव पालिका क्षेत्रातील सर्व शैक्षणिक संस्थांनी तसेच इतर सार्वजनिक संस्थांनी १ डिसेंबरपर्यंत आपल्या सीमांकनात कुंपण उभारावे. जर निर्धारित वेळेत निर्देशाचे पालन करण्यात आले नाही, तर त्यांच्यावर गंभीर कारवाई करण्यात येईल, असे सिद्धीविनायक नाईक यांनी स्पष्ट केले. पालिका अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्यासाठी नोडल अधिकाऱ्याचे नाव, संपर्क क्रमांक देणे, तसेच संबंधित शैक्षणिक संस्थाच्या आवारातील कुंपणाची सद्यस्थितीसंबंधी माहिती देण्यासंबंधी सूचना केल्या. संबंधित माहिती व सूचना नोडल अधिकाऱ्यांना प्रतिबंधात्मक उपाययोजना आयोजित करण्यास मदत करेल, असे त्यांनी सांगितले.
प्रतिनिधींच्या समस्या आणि उपाय
याप्रसंगी एक सरकारी व एक अनुदान प्राप्त अशा दोन विद्यालयांच्या प्रतिनिधींनी शाळेच्या परिसरात कुंपण नसल्याचे स्पष्ट केले. तसेच चिखली उपजिल्हा इस्पितळाच्या प्रतिनिधीने पायाभूत सुविधांच्या मोठ्या खर्चामुळे कुंपण अपूर्ण राहिल्याचे सांगितले. सिद्धीविनायक नाईक यांनी संबंधित समस्यांची व तेथील भटक्या कुत्र्यांची उपस्थिती पडताळण्यासाठी पाहणी करण्यात येईल, असे स्पष्ट केले. नोडल अधिकाऱ्याने भटक्या कुत्र्यांची माहिती त्वरित देण्यासंबंधी सूचना करण्यात आली. विद्यालयाच्या आवारात भटक्या कुत्र्यांना खायला दिल्यास तेथे कुत्र्यांची संख्या वाढू शकते, कुत्रा चावण्याच्या घटना वाढू शकतात. त्यामुळे भटक्या कुत्र्यांना तेथे खायला देऊ नये. पीपल फॉर अनिमल एजन्सीने अतिरिक्त जागा व पायाभूत सुविधांची गरज असेल, तर पशुसंवर्धन विभागाकडे संपर्क साधावा.
कुत्र्यांची ठिकाणे प्रसिद्ध करण्याचे आवाहन
कारवाई सुलभ करण्यासाठी भटक्या कुत्र्यांची ठिकाणे छायाचित्रांसह प्रसिद्ध करावीत, असे आवाहन नाईक यांनी केले. भटक्या कुत्र्यांबाबत संपर्क साधण्यासाठी पीपल फॉर अनिमल व पशुसंवर्धनच्या प्रतिनिधींना आपले संपर्क क्रमांक शैक्षणिक संस्था व इतर संस्थांना द्यावेत, असे निर्देश देण्यात आले.

बैठकीत मार्गदर्शन करताना मुख्याधिकारी सिद्धिविनायक नाईक. सोबत इतर मान्यवर.