मुख्य सूत्रधार मोहम्मद सुहैल, पत्नी विरोधात आरोपपत्र

पणजी : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जमीन हडप प्रकरणातील मुख्य सूत्रधार मोहम्मद सुहैल उर्फ मायकल फर्नांडिस याच्यावर मोठी कारवाई केली आहे. हणजूण येथील १,९५० चौरस मीटर क्षेत्रफळाचा आणि ६ कोटी ८२ लाख ५० हजार रुपये किमतीचा भूखंड ईडीने तात्पुरता जप्त केला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे ही जमीन हडप केल्याचे तपासात उघड झाल्यानंतर मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) ही कारवाई करण्यात आली.
या प्रकरणाची सुरुवात खोर्ली-बार्देश येथील जेनिफर कारास्को आणि सिसीनो कारास्को यांनी दिलेल्या तक्रारीवरून झाली. हणजूण येथील सर्व्हे क्रमांक ५०४/१० मधील १,९५० चौरस मीटरचा हा भूखंड त्यांच्या पूर्वजांच्या मालकीचा होता. एके दिवशी त्यांना या भूखंडावर एका बँकेची नोटीस दिसली, ज्यामुळे ही जमीन दुसऱ्याच्या ताब्यात असल्याचे त्यांना समजले. त्यांनी चौकशी केली असता, मडगाव येथील सलीम शेख याने हा भूखंड विकत घेतल्याचे समोर आले. त्यानंतर गोवा पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
बनावट व्यवहारांची साखळी
एसआयटीच्या तपासात या जमिनीच्या व्यवहाराची धक्कादायक माहिती समोर आली. मुख्य सूत्रधार मोहम्मद सुहैल याने आपली पत्नी अंजुम शेख हिच्या नावावर ही जमीन करण्यासाठी आपला साथीदार नुरे फैजल भाटकर याचा वापर केला. २९ सप्टेंबर २०१० रोजी अंजुमने भाटकरकडून जमीन विकत घेतल्याचे दाखवले. त्यानंतर १५ एप्रिल २०११ रोजी अंजुमने हाच भूखंड सलीम शेख याला ५० लाख रुपयांना विकला. या बनावट व्यवहारांच्या आधारे पोलिसांनी सुहैल, अंजुम, नुरे भाटकर आणि सलीम शेख यांच्यावर गुन्हा दाखल केला.
कोट्यवधींची संपत्ती आणि ईडीची कारवाई
पोलीस तपासानंतर ईडीने या प्रकरणात आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू केली. तपासात असे आढळले की, सलीम शेख याने मोहम्मद सुहैलला ४६ लाख रुपये चेकद्वारे आणि २४ लाख रुपये रोखीने, असे एकूण ७० लाख रुपये दिले होते. मात्र, ईडीने या जप्त केलेल्या भूखंडाचे आजच्या बाजारभावानुसार मूल्यांकन केले असता, त्याची किंमत ६ कोटी ८२ लाख ५० हजार रुपये असल्याचे स्पष्ट झाले. ईडीचे अतिरिक्त संचालक अवनीश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपसंचालक प्रफुल्ल वाबळे यांनी जप्तीचा आदेश जारी केला.
विशेष न्यायालयात आरोपपत्र : या प्रकरणाचा तपास पूर्ण करून ईडीने आता मुख्य सूत्रधार मोहम्मद सुहैल उर्फ मायकल फर्नांडिस आणि त्याची पत्नी अंजुम शेख यांच्याविरोधात मेरशी येथील विशेष न्यायालयात (पीएमएलए कोर्ट) आरोपपत्र दाखल केले आहे.