कर्मचाऱ्यांच्या पगारातून पैसे लुटले : आगशी पोलिसांत गुन्हा दाखल

पणजी : बांबोळी येथील एका कॅसिनोमध्ये सहाय्यक एचआर व्यवस्थापकाने आपल्या अधिकाराचा गैरवापर करत तब्बल २५.३३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आगशी पोलिसांनी पंढरीनाथ उर्फ विराज गोवेकर याच्यावर गुन्हा दाखल केला असून त्याला चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.
याप्रकरणी वर्ल्डवाईड रिसॉर्ट्स अँड एंटरटेनमेंट प्रा. लि. कंपनीचे सुरक्षा प्रमुख निखिल शिरोडकर यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. संशयित आरोपी पंढरीनाथ उर्फ विराज गोवेकर (रा. सुर्ला-साखळी) हा बांबोळी येथील ‘बिग डॅडीज् स्ट्राईक’ कॅसिनोमध्ये २०२३ पासून सहाय्यक एचआर व्यवस्थापक म्हणून कार्यरत होता. कर्मचाऱ्यांचे वेतन तयार करणे आणि त्याचे वितरण करणे, ही महत्त्वाची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आली होती.
गुगल पेद्वारे रक्कम स्वतःकडे वळवली
तक्रारीनुसार, २०२३ ते २०२५ या कालावधीत गोवेकर याने नियोजनपूर्वक ही फसवणूक केली. त्याने सहा कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात मूळ वेतनापेक्षा अतिरिक्त रक्कम जमा केली. त्यानंतर, ही जास्तीची रक्कम त्याने त्या कर्मचाऱ्यांकडून ‘गुगल पे’द्वारे आपल्या वैयक्तिक बँक खात्यात परत मागवून घेतली. अशा प्रकारे त्याने कंपनीची एकूण २५ लाख ३३ हजार २७० रुपयांची अफरातफर केली, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल
तक्रारीची गंभीर दखल घेत आगशी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनंत गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शुभम कोरगावकर यांनी कारवाई सुरू केली आहे. संशयित गोवेकर याच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम ३१६(४) (विश्वासघात) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला नोटीस बजावून पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.