८४ देशांचे २७० चित्रपट होणार प्रदर्शित : दिग्गजांचा होणार सन्मान

पणजी : दरवर्षी पणजीमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी) उद्घाटन गुरुवारी २० नोव्हेंबर रोजी दुपारी चित्ररथ मिरवणुकीने होणार आहे. या चित्रपट महोत्सवामुळे २८ नोव्हेंबरपर्यंत पणजीत तसेच संपूर्ण गोव्यात चित्रपटमय वातावरण होईल. चित्रपटांच्या प्रदर्शनासोबतच ‘मास्टर क्लास’, ‘ओपन फोरम’, ‘प्रदर्शन’ अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
मिरवणुकीत असणार २३ चित्ररथ
यंदा पहिल्यांदाच महोत्सवाचे उद्घाटन वेगळ्या पद्धतीने होत आहे. दुपारी जुन्या सचिवालयाकडून चित्ररथ मिरवणुकीला सुरुवात होईल. आंध्र प्रदेश, हरियाणा आणि गोव्याचे चित्ररथ देशाच्या सीने संस्कृतीचे दर्शन घडवतील. मिरवणुकीत २३ चित्ररथांचा समावेश असेल, ज्यात गोव्याचे ११ चित्ररथ असतील. प्रत्येक चित्ररथातून त्या-त्या राज्यांच्या संस्कृतीचे दर्शन घडेल.
दाक्षिणात्य अभिनेते रामचरण उद्घाटक
चित्ररथ मिरवणुकीनंतर मनोरंजन संस्थेच्या कार्यालयासमोर औपचारिक उद्घाटन समारंभ होईल. दक्षिणेकडील सुप्रसिद्ध अभिनेते रामचरण यांच्या हस्ते उद्घाटन होईल. उद्घाटनाची तसेच इतर तयारी जोरदार सुरू आहे.
मुख्यमंत्र्यांनी घेतला तयारी आढावा
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी रात्री तयारीचा आढावा घेतला. राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री एल. मुरुगन, इतर मंत्री आणि आमदारांची उपस्थिती असेल. त्यापूर्वी 'वेव्हज फिल्म बाजार'चे उद्घाटन होईल.
इफ्फी फेस्ट हा संगीत, सादरीकरण आणि सर्जनशील कलांचा उत्सव असेल. २१ ते २४ नोव्हेंबर दरम्यान सायं. ६ ते ८ या वेळेत डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी सभागृहात हा महोत्सव होईल. कलाकार आणि प्रेक्षकांना एकत्र आणणाऱ्या या कार्यक्रमात कलाकार आपले अनुभव सांगतील.
श्रद्धांजली या विभागात यंदा गुरुदत्त, राज खोसला, ऋत्विक घटक, पी. भानुमती, भूपेन हजारिका आणि सलील चौधरी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांचे चित्रपट प्रदर्शित केले जातील. सलील चौधरी यांचा 'मुसाफिर' आणि ऋत्विक घटक यांचा 'सुवर्णरेखा' चित्रपट प्रदर्शित होईल.
मुख्य आकर्षणे
- चित्रपट महोत्सवासाठी ८४ देशांचे एकूण २७० चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.
- ब्राझीलच्या 'द ब्लू ट्रेल' या चित्रपटाने महोत्सवाचा शुभारंभ होईल.
- ‘मास्टर क्लास’, ‘ओपन फोरम’, ‘प्रदर्शन’, ‘क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो’, ‘सिनेमा हॅकथॉन’ आणि - ‘इफ्फी फेस्टा’ यांसारखे विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत.
समारोपाला रजनीकांत, आमिर खानची उपस्थिती
समारोपावेळी सुप्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित केले जाईल. तसेच, आमिर खान याची देखील खास उपस्थिती असेल. २८ नोव्हेंबर रोजी समारोप सोहळा डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर होईल. समारोप सोहळ्यात सुवर्ण मयूर आणि रौप्य मयूर या पुरस्कारांचे वितरण केले जाईल.