पोलीस मुख्यालयाकडून आदेश जारी : नव्या जागेवर रुजू झाल्यानंतरच मिळणार पगार

पणजी : पोलीस स्थापना मंडळाच्या शिफारशीनुसार पोलीस खात्याने २०२० पासून मागील पाच वर्षांत अनेक कर्मचाऱ्यांच्या वारंवार बदली होऊन ही जागा न सोडणाऱ्यांना सक्तीने रिलिव्ह करण्यात आले. तसेच नव्या जागेवर गेल्यावरच त्यांना पगार मिळणार असल्याचा आदेश पोलीस मुख्यालयाकडून देण्यात आला आहे.
गोवा पोलीस दलातील अनेक कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या होत्या. मात्र, त्यांना त्यांच्या पूर्वीच्या ठिकाणाहून सोडण्यात आले नव्हते, त्यात सहा उपनिरीक्षकांसह ६८ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पोलीस अधीक्षक (मुख्यालय) धर्मेश आंगले यांच्याकडून आदेश जारी करण्यात आले. पोलीस खात्याकडे जानेवारी २०२५ च्या अखेरीस मोठ्या संख्येने बदलीसाठी अर्ज आले होते. याला वरिष्ठांनी आक्षेप घेतला. यापूर्वी बदली झालेले किती जण नवीन ठिकाणी रुजू झाले, याची यादी मागवली. फेब्रुवारी २०२५ मध्ये पुन्हा यादी मागवली असता, सुमारे २३० जण नवीन जागी रुजू झाले नसल्याचे दिसून आले. याची दखल घेऊन कर्मचाऱ्यांना मुक्त करण्याचे, तसेच नवीन जागी रुजू न झाल्यास वेतन न देण्याचे बिनतारी आदेश जारी केले होते.
२०२५ मध्ये पोलीस स्थापना मंडळाच्या शिफारशीनुसार अनेक कर्मचाऱ्यांची बदली केली. सप्टेंबरमध्ये त्यातील ५०६ जण अद्याप नवीन ठिकाणी रुजू झाले नव्हते. या संदर्भात खात्याने १५ आणि १९ सप्टेंबर रोजी बिनतारी संदेश जारी करून कर्मचाऱ्यांना मुक्त करण्याचे आदेश दिले. तसेच २०२० ते २०२५ मध्ये बदली झालेले ७३ पोलीस कर्मचारी नवीन ठिकाणी रुजू झाले नसल्याचे समोर आले. त्यात ५ उपनिरीक्षक, ७ साहाय्यक उपनिरीक्षक, २० हवालदार, ३९ काॅन्स्टेबल आणि इतर २ कर्मचाऱ्यांचा समावेश होता. वरील दोन्ही संख्या मिळून ऑक्टोबरमध्ये सुमारे ५७९ कर्मचारी त्याच ठिकाणी असल्याचे समोर आले. त्यानंतर मुख्यालयाचे पोलीस उपमहानिरीक्षक अजय कृष्णन शर्मा यांच्या आदेशानुसार, मुख्यालयाचे अधीक्षक धर्मेश आंगले यांनी बिनतारी संदेश जारी करून सर्व अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना मुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत. तसे न केल्यास संबंधित पोलीस स्थानक, तसेच विभागाच्या प्रमुखावर खात्याअंतर्गत कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला होता.
राजकीय वजन वापरल्याचे उघड
पोलीस खात्याने अनेक वर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची यादी मागवली होती. तेव्हा २०२० पासून बदलीचे आदेश जारी होऊनही अनेक कर्मचाऱ्यांनी नवीन ठिकाणी रुजू न होता, पुन्हा त्याच ठिकाणी बदली करून घेतल्याचे समोर आले. कर्मचाऱ्यांनी आपल्या सोयीनुसार बदली करून घेण्यासाठी राजकीय वजन वापरल्याचे उघड झाले होते.
६८ कर्मचाऱ्यांवर अंतिम कारवाई
नोव्हेंबरमध्ये पुन्हा यादी मागवली असता, ६८ पोलीस कर्मचारी अजूनही जुन्याच जागेवर असल्याचे समोर आले. याची दखल घेऊन पोलीस मुख्यालय अधीक्षक धर्मेश आंगले यांनी या सर्व ६८ कर्मचाऱ्यांवर सक्तीने कार्यमुक्त करण्याची कारवाई केली आहे.