तिसऱ्या दरोड्यातील चोरही सापडेनात

बायणा दरोड्यात ३५ लाखांचा मुद्देमाल लंपास : पोलिसांची चार पथके दरोडेखोरांच्या मागावर

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
3 hours ago
तिसऱ्या दरोड्यातील चोरही सापडेनात

वास्को : दोनापावला आणि गणेशपुरी-म्हापसा येथील दरोड्यांचा तपास अद्याप लागलेला नाही. त्यातच बायणा-वास्को येथेही दरोडा पडला. मात्र, पोलिसांना या तीनही दरोड्यांचा छडा लावता आलेला नाही. बायणा येथील दरोड्यात सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा ३५ लाखांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला. हा मुद्देमाल मिळविण्यासह दरोडेखोरांना जेरबंद करण्यासाठी पोलिसांची धडपड सुरू आहे. त्यासाठी पोलिसांनी चार पथके तैनात केली असून राज्यांतर्गत तपासावर लक्ष केंद्रित केले आहे.
भरवस्तीतील व मुख्य रस्त्याच्या कडेला असलेल्या चामुंडी आर्केड या इमारतीतील सागर नायक यांच्या सहाव्या मजल्यावरील फ्लॅटवर दरोडा पडल्याने वास्कोवासीय भीतीच्या छायेत आहेत. म्हापसा, दोनापावला येथील दरोडे हे तुलनेने कमी लोकवस्तीच्या भागातील बंगल्यांवर घालण्यात आले होते. परंतु इमारतीत इतर शेकडो लोक असतानाही दरोडा घालून दरोडेखोरांनी आपली हिंमत वाढली असल्याचे दाखविले की काय, असा सवाल उपस्थित होत आहे. हा दरोडा आम्ही एक आव्हान म्हणून स्वीकारतो, असे डीआयजी वर्षा वर्मा यांनी सांगितले आहे. त्यांचे आव्हान कधी पूर्ण होते, याकडे वास्कोवासीयांचे लक्ष लागले आहे. शहरातील कॅमेऱ्यांची पडताळणी करण्यात येत असून त्यातून सुगावा लागतो का, हे पडताळून पाहिले जात आहे.
बायणा येथील चामुंडी आर्केड इमारत मुरगाव पोलीस स्थानकाच्या हद्दीत येते. तर सहा-सात मीटरच्या रस्त्याच्या दुसऱ्या बाजूस असलेल्या इमारती, घरे वास्को पोलीस स्थानकाच्या हद्दीत येतात. त्यामुळे मुरगाव पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. मात्र, दरोडेखोरांनी आव्हान उभे केल्याने इतर पोलीस स्थानकातील पोलीस अधिकारी व इतरांचा सहभाग असलेली चार पथके तयार करण्यात आली आहेत. मंगळवारपासून चौकशीसाठी काही जणांना चौकशीसाठी पोलीस स्थानकात आणण्यात आले. काहीजणांना संशयावरून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी करण्यात येत आहे. पोलिसांनी आतापर्यंत एकूण ४० जणांची चौकशी केली आहे.
परिचितांचेच कृत्य असल्याचा कयास
दरोडेखोरांना सागर नायक यांच्या फ्लॅटची आणि परिसराची पूर्ण माहिती असावी, कारण त्यांनी दारातून प्रवेश न करता ग्रिल्स नसलेल्या खिडकीची काच फोडून आत प्रवेश केला. तसेच, त्यांना तिजोरीची माहिती होती आणि त्यांनी नायक यांच्या कारची चावी घेऊन त्याच कारमधून पळ काढला. त्यामुळे पोलिसांनी सागर नायक यांच्या व्यवसायाशी संबंधित असलेल्या शिपायापासून ते लोडरपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांची कसून चौकशी सुरू केली आहे.