मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत : ५६ व्या इफ्फीचे दिमाखदार उद्घाटन : चित्रपट प्रोत्साहन योजनेला मिळणार नवसंजीवनी

पणजी : गोव्यातील ५६ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी) गुरुवारी दिमाखात उद्घाटन झाले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्याला जागतिक दर्जाचे ‘फिल्म हब’ बनवण्यासाठी चित्रपट प्रोत्साहन योजना पुनरुज्जीवित केली जाईल, अशी घोषणा केली. गोव्याचे नैसर्गिक सौंदर्य आणि सरकारी पाठिंबा यामुळे हे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.
गोव्याचे नैसर्गिक सौंदर्य आणि येथील उत्तम पायाभूत सुविधांमुळे चित्रपट निर्माते चित्रीकरणासाठी गोव्याला पसंती देत आहेत. निर्मात्यांना चित्रीकरणाचे परवाने त्वरित मिळावेत, यासाठी सरकार ‘एकेरी खिडकी’ योजना प्रभावीपणे राबवत आहे. इफ्फी आणि फिल्म बाजारसारख्या उपक्रमांमुळे गेल्या काही वर्षांत गोव्याचे महत्त्व आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढले आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले.
गोवा हे केवळ पर्यटनाचे स्थळ नसून तो एक समृद्ध अनुभव आहे. आम्हाला गोव्याला देशाच्या कल्पकतेची राजधानी बनवायचे आहे. भारतीय चित्रपट निर्मात्यांनी येथे येऊन चित्रीकरण करावे, स्थानिक कलाकारांना संधी देऊन नवीन कथा तयार कराव्यात. कल्पक निर्मात्यांचे स्वागत करण्यासाठी गोवा सदैव उत्सुक आहे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारत देश आंतरराष्ट्रीय ‘सॉफ्ट पॉवर हब’ म्हणून उदयास येत आहे. इफ्फीच्या माध्यमातून भारतीय आशय, सृजनशीलता आणि संस्कृती यांना जागतिक संधी दिली जात आहे. इफ्फी हा ‘ऑरेंज इकॉनॉमी’चा आधारस्तंभ असल्याचे केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल. मुरुगन यांनी सांगितले.
चित्रपटसृष्टीतील ५० वर्षांच्या अतुलनीय योगदानाबद्दल प्रसिद्ध तेलुगू अभिनेते एन. बालकृष्णन यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय प्रेक्षक आणि कुटुंबीयांना दिले. तसेच, गोव्यातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात इफ्फीचे स्थान वेगळे असल्याचे मत अभिनेते अनुपम खेर यांनी व्यक्त केले.
या सोहळ्याला उपस्थित असलेले दक्षिण कोरियाच्या नॅशनल असेंब्लीचे सदस्य जेवोन किम यांनी महोत्सवाच्या आयोजनाचे कौतुक केले. त्यांनी भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यातील सहकार्य वाढवण्याची आशा व्यक्त केली. विशेष म्हणजे, त्यांनी ‘वंदे मातरम’चे भावपूर्ण सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. उद्घाटन सोहळ्यानंतर निघालेल्या चित्ररथ मिरवणुकीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.