दरोड्यामुळे परिसरात दहशत : रात्री कडक गस्तीची नागरिकांकडून मागणी

वास्को : बायणातील चामुंडी आर्केडमध्ये पडलेल्या सशस्त्र दरोड्यात गंभीर जखमी झालेले उद्योजक सागर नायक यांना गुरुवारी गोमेकॉतून डिस्चार्ज देण्यात आला. ते घरी परतले असले तरी त्या भयावह रात्रीची दहशत त्यांच्या मनात आणि डोळ्यांत अजूनही कायम आहे. या घटनेमुळे संपूर्ण बायणा परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिक चिंतेत आहेत.
सध्या सागर नायक आपल्या भावाच्या पहिल्या मजल्यावरील घरी वास्तव्यास आहेत. एकेकाळी सुरक्षित वाटणाऱ्या सहाव्या मजल्यावरील स्वतःच्या फ्लॅटमध्ये जाण्याचीही आता त्यांना भीती वाटत आहे. ती रात्र आठवली की अंगावर काटा येतो, असे त्यांनी सांगितले. सात जणांच्या टोळक्याने टाकलेला हा दरोडा बायणातील अलीकडच्या काळातील सर्वात गंभीर घटना ठरली आहे. घुसखोरी, लोखंडी रॉडने मारहाण आणि हातपाय बांधून ठेवणे या प्रकारामुळे नायक मानसिकदृष्ट्या खचले आहेत.
आपल्याला गॅलरीत बांधून ठेवले असताना दरोडेखोर खाली बेसमेंटमध्ये फिरताना दिसले, असे नायक यांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांची पीसीआर व्हॅन अवघ्या काही मिनिटांत पोहोचली. पोलिसांनी तत्परता दाखवली, मात्र त्यावेळी एका गाडीने परिसरात गस्त घातली असती, तर कदाचित गुन्हेगार त्याच रात्री पकडले गेले असते, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली. ही पोलिसांची चूक नसून परिस्थितीचा तो परिणाम होता, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हायटेक सुरक्षा यंत्रणाही ठरली कुचकामी
चामुंडी आर्केडमध्ये अत्याधुनिक सीसीटीव्ही, नाईट-व्हिजन कॅमेरे आणि डिजिटल सुरक्षा व्यवस्था असूनही गुन्हेगारांनी सहज प्रवेश केला. चोरटे अत्याधुनिक साधने वापरत असून काही मिनिटांत आवाज न करता ग्रील तोडण्यात ते निष्णात आहेत. त्यामुळे गुन्हेगार तांत्रिकदृष्ट्या सक्षम झाल्याचे दिसून येते.
सुरक्षेसाठी श्वानांची गरज : नायक
सुरक्षा रक्षक झोपू शकतो, पण कुत्रा नेहमी सतर्क असतो आणि हालचाल ओळखतो. त्यामुळे सोसायट्यांमध्ये कुत्र्यांची उपस्थिती गुन्हेगारांना दूर ठेवू शकते, असे मत नायक यांनी व्यक्त केले. दरम्यान, सातही दरोडेखोर अद्याप मोकाट असल्याने बायणातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. लोक लिफ्टमध्ये जाण्यापूर्वी थांबत आहेत आणि दरवाजाच्या कड्या पुन्हा पुन्हा तपासून पाहत आहेत. शहरात रात्रीची कडक गस्त आणि जुन्या काळाप्रमाणे आयडी तपासणी पुन्हा सुरू करण्याची गरज नायक यांनी व्यक्त केली.