समिती म्हणजे देव नाही : व्याघ्र प्रकल्पावरून मंत्री फळदेसाई आक्रमक

पणजी : सर्वोच्च न्यायालयाच्या तज्ज्ञ समितीने (सीईसी) नेत्रावळी अभयारण्यात व्याघ्र प्रकल्पाची शिफारस केल्यानंतर समाजकल्याण मंत्री आणि सांगेचे आमदार सुभाष फळदेसाई यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. ही समिती म्हणजे देव नाही असे ठणकावून सांगत त्यांनी स्थानिकांच्या हक्कासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरण्याचा आणि तुरुंगात जाण्याचा इशारा दिला आहे.
"नेत्रावळीत आजवर कुणालाही वाघ दिसलेला नाही. तरीही शिफारस करणे आश्चर्यकारक आहे. समिती म्हणजे काही देव नव्हे. वाघाच्या नावाखाली लोकांना घरातून काढले तर मी रस्त्यावर उतरेल, यासाठी तुरुंगात जावे लागले तरी चालेल."
सीईसीने नेत्रावळी अभयारण्यातील २११.०५ चौरस किलोमीटर क्षेत्र व्याघ्र प्रकल्पात समाविष्ट करण्याची शिफारस केली आहे. यावर आक्षेप घेताना फळदेसाई म्हणाले की नेत्रावळीत शेकडो वर्षांपासून लोक राहत आहेत आणि त्यांनी कधीही शिकार केलेली नाही.
‘म्हादई बचाव अभियाना’च्या अध्यक्षा निर्मला सावंत यांच्या मते, या निर्णयामुळे म्हादई पाणी तंटा लवादात गोव्याची बाजू भक्कम होईल. वाघ आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी म्हादईचे पाणी कर्नाटकाला वळवता येणार नाही, हा मुद्दा आता गोव्याला अधिक प्रभावीपणे मांडता येईल.
व्याघ्र प्रकल्प ही काळाची गरज आहे. सरकारने विरोध न करता अधिसूचना जारी करावी आणि लोकांचे योग्य पुनर्वसन करावे.
निर्णय योग्य आहे, पण म्हादई अभयारण्यात वाघांचे प्रत्यक्ष अस्तित्व असल्याने त्याचाही समावेश व्हायला हवा.
सावध भूमिका : "अहवाल वाचून आणि सविस्तर अभ्यास करूनच मी माझी भूमिका मांडेन."