कृषी खात्याची मंजुरी : बार्देश तालुक्याला सर्वाधिक झळ

पणजी : राज्यात ऑक्टोबरमध्ये पडलेल्या अवकाळी पावसामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी कृषी खात्याने भरपाई मंजूर केली आहे. ‘शेतकरी आधार निधी’ योजनेअंतर्गत राज्यातील २ हजार ९९७ शेतकऱ्यांना एकूण २ कोटी ५३ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. कृषी खात्याने आतापर्यंत ५७७ हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याचे स्पष्ट केले असून, अर्जांची छाननी प्रक्रिया वेगाने सुरू आहे.
कृषी संचालक संदीप फळदेसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका बार्देश तालुक्याला बसला आहे. येथे सुमारे २०० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून, ९३० शेतकरी यामुळे बाधित झाले आहेत. ऑक्टोबर महिन्यात दिवाळीनंतर झालेल्या परतीच्या आणि अवकाळी पावसामुळे तयार झालेले भातपीक कुजले. पिके आडवी झाल्याने शेतकऱ्यांना कापणी करणे कठीण झाले होते.
अर्जांची पडताळणी आणि मंजुरी
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ‘शेतकरी आधार निधी’तून भरपाई देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार शेतकऱ्यांनी विभागीय कार्यालयात अर्ज सादर केले. अधिकाऱ्यांकडून या अर्जांची पाहणी आणि नुकसानीचे मूल्यांकन सुरू आहे. ज्या अर्जांची पडताळणी पूर्ण झाली आहे, त्यांना मंजुरी देण्यात आली आहे.
| तालुका / विभाग | शेतकरी | नुकसान (हेक्टर) | मंजूर रक्कम (रु.) |
|---|---|---|---|
| बार्देश | ९३० | २०० | १,०६,००,००० |
| काणकोण | ६०२ | ५१.१२ | २०,४५,१५६ |
| डिचोली | ३९२ | १४२ | ५६,८०,००० |
| केपे | ३०४ | २८.४ | ११,३६,००० |
| फोंडा | २३८ | २८.२ | ११,२८,३५७ |
| सासष्टी | १४३ | २२.५५ | ११,६५,१०० |
| पेडणे | ११० | १७.९१ | ७,१६,७२३ |
| साखळी | ९६ | ३३ | १३,२०,००० |
| मुरगाव | ८७ | १४.७३ | ५,८९,२०० |
| तिसवाडी | ८० | ३७.३१ | ८,३५,६०० |
| सत्तरी | ०७ | १.२३ | ४९,२०० |
| धारबांदोडा | ४ | ०.७ | २८,००० |
| सांगे | ४ | ०.६ | २४,००० |
| एकूण | २,९९७ | ५७७.७६ | २,५३,१७,३३६ |