गोव्याचा आसामवर एका डावाने विजय

कूच बिहार क्रिकेट स्पर्धा : मिहीर कुडाळकरचा भेदक मारा

Story: क्रीडा प्रतिनिधी। गोवन वार्ता |
25th November, 11:39 pm
गोव्याचा आसामवर एका डावाने विजय

कूच बिहार क्रिकेट स्पर्धेतील विजेता गोव्याचा संघ.

पणजी : कूच बिहार एलिट क्रिकेट स्पर्धेतील (१९ वर्षांखालील) आसामविरुद्धचा चार दिवसीय सामना गोव्याने केवळ अडीच दिवसांत जिंकला. पणजी जिमखान्याच्या बांदोडकर मैदानावर हा सामना खेळविण्यात आला.
गोव्याच्या पहिल्या डावातील ३७६ धावांना उत्तर देताना आसामचा पहिला डाव ३५ षटकांत केवळ ७५ धावांत संपला. गोव्याने यानंतर आसामला अपेक्षेप्रमाणे फॉलोऑन दिला. फॉलोऑननंतर आसामचा दुसरा डाव ४१.२ षटकांत ८६ धावांत संपला. गोव्याने या सामन्यातील विजयाचे ६ व १ बोनस गुणासह एकूण सात गुणांची कमाई केली.
दुसर्‍या दिवशीच्या ४ बाद ४८ धावांवरून मंगळवारी खेळ पुन्हा सुरू झाला. आसामला या धावसंख्येत केवळ २७ धावांची भर घालता आली. गोवा संघाकडून मिहीर कुडाळकर याने ३.२ षटकांत एकही धाव न देता ३ गडी बाद केले. समर्थ राणे याने ३३ धावांत ३, तर चिगुरुपती व्यंकट (२१ धावांत २) व यश कसवणकर (२१ धावांत २) यांनी प्रत्येकी २ गडी बाद करत आसामला गुंडाळण्यात मोलाचा वाटा उचलला.
पहिल्या डावातील सपशेल अपयशानंतर दुसर्‍या डावातही आसामला सुधारित कामगिरी करता आली नाही. आसामचा कर्णधार दिपांकर पॉल २० धावा करून नाबाद राहिला. मिहीर कुडाळकरने दुसर्‍या डावातही शानदार प्रदर्शन करताना ९ धावांत ४ गडी बाद केले. यश कसवणकरने १९ धावांत २, शिवेन बोरकरने १८ धावांत २ तर समर्थ राणेने १६ धावांत १ गडी बाद केला. दरम्यान, गोव्याचा पुढील सामना १ ते ४ डिसेंबर या कालावधीत सांगे मैदानावर उत्तर प्रदेशशी होणार आहे.
गोव्याचे गट ‘ड’मध्ये स्थान
या विजयासह, एलिट ‘ड’ गटात गोव्याचा संघ २ सामन्यांतून १४ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. समान गुण असलेला बंगाल संघ या गटात सध्या प्रथम स्थानावर आहे. गोव्याने या स्पर्धेतील आपल्या पहिल्या सामन्यात छत्तीसगडचा एक डाव व १३ धावांनी पराभव केला होता.