दुसरा कसोटी सामना : भारतासमोर ५४९ धावांचे आव्हान

गुवाहाटी : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेने आपला दुसरा डाव ५ बाद २६० धावांवर घोषित करून यजमान भारतासमोर विजयासाठी ५४९ धावांचे डोंगराएवढे आव्हान ठेवले आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची दिवसअखेर २ बाद २७ अशी दयनीय अवस्था झाली. यासह, दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतीय भूमीवर तब्बल २५ वर्षांनंतर कसोटी मालिका जिंकण्याच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे.
या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने १-० अशी आघाडी घेतली असून, आता त्यांची 'क्लीन स्वीप'च्या दिशेने वाटचाल करण्याची महत्त्वाकांक्षा स्पष्टपणे दिसत आहे. सामन्यातील पराभवाची नामुष्की टाळण्यासाठी आता भारतीय संघाला बुधवारी खेळाची तीनही सत्रे खेळून काढावी लागणार आहेत, अन्यथा ५४९ धावांचे लक्ष्य सर करणे हा चमत्कारच ठरेल.
दुसऱ्या डावातही आफ्रिकेचा दबदबा
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात ४८९ धावांचा डोंगर उभा केला होता. याला प्रतुत्तर देताना भारतीय संघ केवळ २०१ धावांत गारद झाला. ३१ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून आफ्रिकेच्या खेळाडूंनी दुसऱ्या डावातही दमदार फलंदाजी केली आणि ५ बाद २६० धावांवर डाव घोषित केला. या कामगिरीमुळे भारताला सामना वाचवण्यासाठी किंवा जिंकण्यासाठी आता शेवटच्या डावात एक ऐतिहासिक आणि अत्यंत संयमी खेळ करावा लागणार आहे.
स्टब्सच्या ९४ धावा, जडेजाचा भेदक मारा
पहिल्या डावातील २८८ धावांच्या भक्कम आघाडीमुळे जागतिक कसोटी विजेता दक्षिण आफ्रिका संघ सामन्यावर पूर्णपणे मजबूत पकड ठेवू शकला. दुसऱ्या डावात बिनबाद २६ धावसंख्येवरून खेळाला सुरुवात झाली. चेंडू वळण्यास सुरुवात झाल्यावर आफ्रिकेच्या आघाडीच्या फळीला संघर्ष करावा लागला.
रिकेलटन (३५) आणि एडन मार्कराम (२९) यांनी पहिल्या विकेटसाठी ५९ धावांची भागीदारी केली. डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजाने (६२ धावांत ४ बळी) या दोघांनाही माघारी धाडले. रिकेलटन कव्हरमध्ये झेलबाद झाला, तर मार्करामला जडेजाने त्रिफळाचित केले. कर्णधार टेंबा बावुमा (वॉशिंग्टन सुंदरकरवी झेलबाद) आणि टोनी डी झोर्झी (४९) बाद झाल्यानंतर ट्रिस्टन स्टब्स आणि वियान मुल्डर (नाबाद ३५) यांनी डाव सावरला.
स्टब्स (९४ धावा) आपले शतक पूर्ण करू शकला नाही, त्याला जडेजाने त्रिफळा उडवत पॅव्हेलियनमध्ये पाठवले. स्टब्सने आपल्या खेळीत नऊ चौकार आणि एक षटकार लगावला. स्टब्स बाद होताच कर्णधार बावुमाने ५ बाद २६० धावांवर डाव घोषित केला.
भारताची खराब सुरुवात
५४९ धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाच्या दुसऱ्या डावाची सुरुवात अत्यंत खराब झाली. सलामीवीर यशस्वी जैस्वालने (१३ धावा) मार्को यान्सेनच्या गोलंदाजीवर अप्पर कट मारून शानदार षटकार वसूल केला. मात्र, पुढच्याच षटकात तसाच फटका मारण्याच्या नादात तो यष्टिरक्षकाकडे झेल देऊन बाद झाला.
त्याचा जोडीदार के. एल. राहुल (६ धावा) खेळपट्टीवर स्थिरावतो न स्थिरावतो तोच फिरकीपटू सायमन हार्परच्या जबरदस्त वळण घेतलेल्या चेंडूने त्याला त्रिफळाचित केले. दिवसअखेर भारतीय संघ अजूनही ५२२ धावांनी पिछाडीवर आहे. चौथ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा साई सुदर्शन (२ धावा) आणि 'नाईटवॉचमन' कुलदीप यादव (४ धावा) खेळपट्टीवर नाबाद होते. शेवटच्या दिवशी भारतीय फलंदाजांना किमान अनिर्णित निकालासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे.
कांगारूंचा विक्रम मोडला
दक्षिण आफ्रिकेने कसोटी क्रिकेटमध्ये भारतासमोर ५४९ धावांचे जवळजवळ अशक्य असे आव्हान ठेवून सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता. कांगारू संघाने २००४ मध्ये नागपूर कसोटीत भारताविरुद्ध ५४२ धावांची आघाडी घेतली होती. बावुमाच्या संघाने केवळ ६ धावांच्या फरकाने हा ३१ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे. या विक्रमामुळे, दक्षिण आफ्रिकेच्या संघाने टेंबा बावुमाच्या नेतृत्वाखाली, कसोटी मालिकेत पहिल्याच सामन्यात विजय मिळवल्यानंतर आता सूपडा साफ करण्याची दाट शक्यता निर्माण केली आहे.
ट्रिस्टन स्टब्सचे शतक हुकले
दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेचा युवा फलंदाज ट्रिस्टन स्टब्स याने लक्ष्यवेधी आणि शानदार फलंदाजीचे प्रदर्शन केले. तो आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय शतकाच्या अगदी जवळ पोहोचला होता. पण त्याला रविंद्र जडेजाने क्लिन बोल्ड करून तंबूत पाठवले. स्टब्जने १८० चेंडूंमध्ये ९ चौकार आणि १ षटकारासह ९४ धावा केल्या. स्टब्स बाद झाल्यानंतर कर्णधार बावुमाने कोणताही विलंब न करता लगेच डाव घोषित केला, जेणेकरून भारतीय संघाला लवकरात लवकर फलंदाजीसाठी बोलावून त्यांच्यावर दबाव आणता येईल. आफ्रिकेच्या डावादरम्यान, टोनी डी जोरजी (४९) याचे अर्धशतकही एका धावेने हुकले.
भारतासमोर ‘करा किंवा मरा’ची स्थिती
सध्याची परिस्थिती पाहता भारतीय संघासमोर एकतर विक्रमी पाठलाग करून सामना जिंकणे किंवा उर्वरीत अर्धा दिवस आणि गुरुवारचा पूर्ण दिवस फलंदाजी करून सामना अनिर्णित राखणे हे दोन पर्याय आहेत. क्रिकेट रसिकांचे डोळे आता भारतीय फलंदाजीकडे लागले आहेत. या संकटातून ते मार्ग काढतात की दक्षिण आफ्रिका ३१ वर्षांनंतर भारतीय भूमीवर कसोटी मालिका क्लीन स्वीप करून नवा इतिहास रचते, याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.