भारताचा पहिला डाव २०१ धावांत गुंडाळला

मार्को यान्सनचे ६ बळी : द. आफ्रिकेला २८८ धावांची आघाडी

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
24th November, 11:51 pm
भारताचा पहिला डाव २०१ धावांत गुंडाळला

गुवाहाटी : गुवाहाटी कसोटीत, टीम इंडियाचा पहिल्या डाव फक्त २०१ धावांवर आटोपला. तिसऱ्या दिवसाच्या खेळाच्या अखेरीस, दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात नाबाद २६ धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेने भारतावर ३१४ धावांची आघाडी घेतली आहे. सलामीवीर एडेन मार्कराम आणि रायन रिकेलटन नाबाद राहिले.
सोमवारी, सामन्याच्या तिसऱ्या दिवशी, भारताने ९ धावांवरून खेळ सुरू केला. तिसऱ्या सत्रात संघ २०१ धावांवर घसरला. पहिल्या डावाच्या आधारे दक्षिण आफ्रिकेकडे २८८ धावांची आघाडी होती. तथापि, संघाने फॉलो-ऑन लागू केला नाही.
दक्षिण आफ्रिकेसाठी, वेगवान गोलंदाज मार्को जॅन्सनने सहा विकेट्स घेतल्या. त्याच्या गोलंदाजीमुळे भारताला मागे टाकण्यात आले. घरच्या संघासाठी, यशस्वी जयस्वालने ५८ आणि वॉशिंग्टन सुंदरने ४८ धावा केल्या. ९५ धावांपर्यंत संघाने फक्त दोन विकेट्स गमावल्या होत्या, परंतु सलामीवीरांच्या विकेट्सनंतर, संघाने १२२ धावांपर्यंत सात विकेट्स गमावल्या. सुंदर आणि कुलदीप यादवने भारताला २०० धावांपर्यंत पोहोचवले.
भारताने डावात चांगली सुरुवात केली. संघाची दुसरी विकेट ९५ धावांवर पडली. मात्र, त्यानंतर त्यांनी २७ धावांवर सहा विकेट गमावल्या. यशस्वी ९५ धावांवर, सुदर्शन ९६ धावांवर, जुरेल १०२ धावांवर, पंत १०५ धावांवर, नितीश ११९ धावांवर आणि जडेजा १२२ धावांवर बाद झाले.
जैस्वालची सचिनच्या विक्रमाशी बरोबरी
पहिल्या डावात भारतीय फलंदाजांचा संपूर्णपणे फ्लॉप शो असताना, यशस्वी जैस्वाल हा एकमेव यशस्वी फलंदाज ठरला. त्याने ५८ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. या खेळीमुळे त्याने महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या एका खास विक्रमाशी बरोबरी केली आहे. २३ वर्षीय जैस्वालच्या कसोटी कारकिर्दीतील हे २० वे अर्धशतक (७ शतकांसह) ठरले आहे. आपल्या कसोटी कारकिर्दीतील २८ व्या सामन्यांपर्यंत त्याने ४९.९ च्या सरासरीने २४९८ धावा केल्या आहेत. या सामन्यात ५० धावांचा टप्पा पार करताच, यशस्वी जैस्वाल हा २४ वर्षांचा होण्यापूर्वी सर्वाधिक वेळा ५० पेक्षा अधिक धावा करणारा सचिन तेंडुलकरनंतरचा केवळ दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. हा पराक्रम करणारा तो २१ व्या शतकातील पहिलाच भारतीय खेळाडू आहे.
कसोटी क्रिकेटच्या १४८ वर्षांच्या इतिहासात केवळ ६ फलंदाजांना हा विक्रम करता आला आहे, ज्यात केन विलियम्सन आणि ॲलेस्टर कुक यांचा समावेश आहे.
सचिन तेंडुलकरने १९८९ ते १९९७ या कालावधीत २९ अर्धशतके झळकावली होती. तर यशस्वी जैस्वालने २०२३ ते २०२५ या कमी कालावधीत २० अर्धशतके झळकावत केन विलियम्सनच्या (२०१० ते २०१४ दरम्यान २० अर्धशतके) विक्रमाची बरोबरी केली आहे.
मार्को यान्सनने केवळ ४८ धावांत ६ विकेट्स घेत, भारताचा पहिला डाव २०१ धावांत गुंडाळला आणि दक्षिण आफ्रिकेला २८८ धावांची मोठी आघाडी मिळवून दिली. भारतीय खेळपट्ट्यांवर सहसा फिरकीपटूंचे वर्चस्व असते, पण गुवाहाटीत यान्सनची जादू चालली. त्याने आपल्या अचूक बाऊन्सर्सने भारतीय फलंदाजांना फारशी संधी दिली नाही. त्याने ध्रुव जुरेल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह यांच्या विकेट्स घेतल्या.
मार्को यान्सनची विक्रमी कामगिरी
मार्को यान्सनने कसोटी कारकिर्दीत चौथ्यांदा पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. भारताविरुद्धची ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे आणि भारतीय भूमीवरील त्याची सर्वोत्तम गोलंदाजी आहे. या कामगिरीसह त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. मार्को यान्सन हा भारतीय भूमीवर भारताविरुद्ध ५० पेक्षा जास्त धावांची खेळी करण्यासोबतच पाच विकेट्स घेणारा दक्षिण आफ्रिकेचा पहिला डावखुरा खेळाडू ठरला आहे. जगातील केवळ तीन खेळाडूंना हा दुहेरी विक्रम करता आला आहे. दक्षिण आफ्रिकेकडून यान्सनने २५ वर्षांनंतर हा पराक्रम केला आहे. यापूर्वी, २००० मध्ये निकी बोएने आणि १९७६ मध्ये इंग्लंडच्या जॉन लीवरने ही कामगिरी केली होती.
दक्षिण आफ्रिकेने दिला नाही फॉलोऑन
मार्को यान्सनच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे भारतीय संघाची दाणादाण उडाली. दक्षिण आफ्रिका संघाने पहिल्या डावात ४८९ धावांचा भला मोठा डोंगर उभारला होता. विशेष म्हणजे २८८ धावांची मोठी आघाडी मिळूनही दक्षिण आफ्रिकेने भारताला फॉलोऑन दिला नाही. भारतीय भूमीवर भारताविरुद्ध २८८ धावांची आघाडी मिळवूनही फॉलोऑन न देण्याची ही पहिलीच वेळ आहे.