त्या दिवसानंतर, स्वयंपाकघर विभासाठी केवळ स्वयंपाक करण्याची जागा राहिली नाही. ती आईच्या प्रेमाची, तिच्या शिकवणीची, आणि आठवणींची एक जागा होती. आता प्रत्येक पदार्थ बनवताना विभाला जाणवत असे की आई तिच्या सोबतच आहे.

आई गेल्यानंतर पाच महिने झालेले होते. तरीही तिचा आवाज, स्वयंपाक घरात घुमत होता. आईच्या सर्व वस्तू आणि आठवणी कपाटात जशाच तशा होत्या. आई सोडून गेली तरीही स्वयंपाक घरातील प्रत्येक वस्तूत ती जिवंत आहे असा विश्वास विभाचा होता. त्यामुळे आईची आठवण प्रत्येक क्षणी विभाला येत होती. आई गेल्यानंतर विभा एकटी पडली. एकदा स्वयंपाकघरात गेली असताना विभाचे मन आईच्या आठवणींनी भरून आले. स्वयंपाकघरातील प्रत्येक वस्तूशी आईचे गहिरे नाते असल्याने विभाच्या डोळ्यातून नकळत पाणी येत होते.
एकदा आईच्या आठवणींचे अनेक वस्तू पाहताना विभाला आईची एक जूनी वही भेटली. ती वही हळदीच्या पिवळ्या रंगाने माखलेली होती. ही वही फक्त पाककृतींसाठीच नाही, तर आईचे सुख-दुःख, तिच्या आठवणी, तिच्या भावना यांचे प्रतीक होते. विभाने वही हातात घेताच तिला आईच्या आठवणींचा सुगंध दरवळल्यासारखे झाले.
विभाची आई गेली तेव्हापासून ती वही तशीच स्वयंपाक घरात पडलेली होती. तिने ती वही उघडली, त्या वहीत आईने अनेक चविष्ट पदार्थ लिहून ठेवले होते, हे विभाने पाहिले. जसे की आम्रखंड, पुरणपोळी, थालीपीठ, बासुंदी अशा चविष्ट पाककृतींची नोंद आईने त्या वहीत करून ठेवलेली होती. विभाला त्या वहीतून आईच्या प्रेमाचा उजाळा मिळाला आणि ती वहीची पाने उलटत होती. तेव्हाच आईने लिहून ठेवलेल्या नोंदींचा आस्वाद घेत असताना वहीतून एक कागद बाहेर पडला. विभाने तो कागद हातात घेतला, तर त्या कागदाला पिवळे डाग लागलेले होते तसेच त्या कागदाचे काही भाग फाडून गेलेले होते. विभाने तो कागद उघडला तर त्यात एक पत्र तिला सापडले. आईची अक्षरे त्यात रेखाटलेली विभाला दिसली.
आईने पत्रात लिहिलेले होते की,
‘प्रिय विभा,
जर तू हे पत्र वाचत असशील, तर मग मला तुला या पत्रातून एक सत्य सांगायचे आहे. जे तुला सांगायचेच राहिले होते.’
आईचे असे शब्द वाचून विभाच्या मनात धडधड सुरू झाली, आणि तिने ते पत्र पुढे वाचले. आईने पुढे लिहिलेले होते,
‘मी तुझी जन्मदात्री आई नाही आहे. तुझा जन्म फार कठीण प्रसंगी झाला होता. त्या क्षणी मी तुला माझी मुलगी म्हणून स्वीकारण्याचा निर्णय घेतला. हे सत्य मी तुला सांगू शकले नाही, कारण मला रक्ताच्या नात्यापेक्षा प्रेमाचे नाते मोठे असते असे वाटले.
आईने पुढे पत्रात लिहिले होते की,
‘माझ्या पाककृतीत नेहमीच एक गुपित असायचे, ते म्हणजे पाककृती मोजमापाने नाही तर मी त्या प्रेमाने करत होते. माझ्या आयुष्याच्या वस्तूंवर जसे प्रेम मी केले तसेच प्रेम मी तुझ्यावरही केले विभा. म्हणूनच हे पत्र वाचल्यावर तुझे माझ्यावरचे प्रेम कधीही कमी होणार नाही याची मला खात्री आहे.’ शेवटी आईने ‘तुझीच आई’ असे पत्रात लिहिलेले होते.
आईने प्रेमाने व स्वतःच्या ममतेने लिहिलेले पत्र वाचून विभाचे मन एकदम सुन्न झाले. आईने लिहिलेल्या पत्रातील लिखाणावर विभाचा विश्वास बसतच नव्हता, ‘आईने लिहिलेले हे पत्र का लपवलं? असे काय आहे यात? तसेच मी आईची खरी मुलगी नाही? मग मी कोण आहे?’ असे प्रश्न विभाला पडले नाहीत. कारण परकी असूनही आईने विभावर अफाट प्रेम केलेले होते. ती परकी आहे याची कमीही तिला भासू दिली नव्हती. म्हणून विभाच्या डोळ्यातून अश्रू दाटून आले. आईच्या आठवणींची आठवण करून विभाच्या डोळ्यातून आईच्या ममतेचे आनंदाश्रू बाहेर पडायला लागले. विभा त्यानंतर आईच्या त्या मायेने लिहिलेल्या वहीला जपून ठेवू लागली.
आईने गुपित लपवून ठेवले याचे वाईट विभाला कधीच वाटले नाही कारण, स्वतःची आई नसूनही तिने विभाला आपल्या रक्ताच्या मुलीप्रमाणे वागणूक दिली होती, तिच्यावर माया केली होती. त्यानंतर या घडलेल्या पत्राच्या प्रसंगातून विभा स्वयंपाक घरात जाऊ लागली आणि आईने वहीवर लिहिलेल्या रेसिपी प्रमाणे पदार्थ बनवू लागली. असे अनेक पाककृती बनवताना तिला आईचे पत्रातील विचार आठवत होते, आई म्हणत असे की, “पाककृतीत मोजमापाला नव्हे, पण पाककृतीतील प्रेमाला महत्त्व असते”.
म्हणूनच त्यानंतर प्रेमाने आणि आईच्या ममतेने व्याकुळ होऊन विभा आईची नोंद केलेली वही घेऊन, नवनवीन पदार्थ बनवून आईच्या आठवणींना उजाळा देऊ लागली. शेवटी विभाला समजले की, प्रेमाने केलेल्या पाककृतीत मोजमाप नसते, तर प्रेम दाटलेले असते.
त्या दिवसानंतर, स्वयंपाकघर विभासाठी केवळ स्वयंपाक करण्याची जागा राहिली नाही. ती आईच्या प्रेमाची, तिच्या शिकवणीची, आणि आठवणींची एक जागा होती. आता प्रत्येक पदार्थ बनवताना विभाला जाणवत असे की आई तिच्या सोबतच आहे. आईचे एक वाक्य तिच्या मनात नेहमीच उमटायचे की, ‘पाककृतीत मोजमाप नसते, प्रेम असते’ आणि तेच प्रेम विभा प्रत्येक पदार्थात मिसळत राहिली...

- पूजा भिवा परब
पालये, पेडणे-गोवा