मुंबईतील २६/११ आणि दिल्लीतील १०/११ च्या घटनांनी सार्वजनिक सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटी उघड केल्या आहेत. बस स्थानकापासून ते रेल्वे स्थानकांपर्यंतच्या सुरक्षेच्या गंभीर त्रुटींवर थेट बोट.

२०१७ मधील माझा वडोदरा बस स्थानकाचा अनुभव आजही माझ्या स्मरणात आहे. एकाच प्रवेशद्वारातून आत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे आणि सामानाचे तिथे स्कॅनिंग केले जात होते. प्रवेश आणि बाहेर पडण्याचा मार्ग एकच ठेवण्यात आला होता, ज्यामुळे सुरक्षा तपासणीवर पूर्ण नियंत्रण होते. सार्वजनिक ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत कडक असलेले हे मॉडेल बघून मला आश्चर्य वाटले, विशेषतः जेव्हा याची तुलना मी गोव्यातील पणजी बस स्थानकाशी केली. पणजीचे बस स्थानक सर्व बाजूंनी खुले आहे. अशा ठिकाणी कोणीही, कधीही, कोणतीही वस्तू ठेवून जाऊ शकतो आणि त्याची माहिती कोणालाही मिळणार नाही. काही सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, पण ते कार्यरत आहेत की नाही, याची खात्री नाही. आणि आधीच कोणतीही मूलभूत सुरक्षा नसताना, 'संदिग्ध वस्तूंना हात लाऊ नका, बॉम्ब असू शकतो' अशा सूचना लावल्याने नेमका काय उपयोग साधणार?
मुंबईतील २६/११/२००८ हल्ल्याच्या घटनेचे मला आजही आश्चर्य वाटते की, ताज हॉटेलसारख्या प्रतिष्ठित ठिकाणी दहशतवादी आत घुसलेच कसे? त्यावेळी कडक तपासणी केली जात नव्हती, असे इंटरनेटवरील माहितीवरून दिसते. आज परिस्थिती बदलली आहे. देशभरातील अनेक हॉटेल्समध्ये आता प्रवेशद्वारावर व्यक्ती आणि सामानाची कडक तपासणी आणि स्कॅनिंग केले जाते. अशा प्रकारची सुरक्षा तपासणी केवळ हॉटेल्सपुरती मर्यादित न राहता, ती प्रत्येक महत्त्वाच्या आणि गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी अत्यावश्यक आहे. अन्यथा, कोण कधी काय घेऊन घुसणार किंवा ठेवून जाणार, याचा अंदाज लावणे अशक्य आहे.
मुंबई आणि दिल्लीसारख्या अत्यंत संवेदनशील महानगरांमध्ये आजही सुरक्षेच्या बाबतीत मोठी त्रुटी दिसून येते. देशातील विमानतळांवर, उदाहरणार्थ, दिल्लीतील टी-१ टर्मिनलवर स्कॅन मशीनमध्ये उभे राहावे लागते, तर टी-३ टर्मिनलवर कधीकधी हातावर क्रोमॅटोग्राफी चाचणीही केली जाते. तसेच देशभरातील सर्व मेट्रो स्टेशनच्या प्रत्येक प्रवेशद्वारावर व्यक्ती आणि सामानाची कडक तपासणी केली जाते. विमानतळे आणि मेट्रो स्टेशनवरचे हे सुरक्षा मॉडेल अत्यंत प्रभावी आणि सध्याच्या काळात गरजेचे आहे.
मला रेल्वेने प्रवास करताना सुरक्षेची भीती वाटते. दुर्दैवाने, भारतातील जवळजवळ प्रत्येक रेल्वे स्थानकावर आजही सुरक्षा तपासणीचा अभाव आहे. अनेक मोठ्या रेल्वे स्थानकांवर आजपर्यंत मला कोणतीही सक्रिय सुरक्षा व्यवस्था दिसलेली नाही. जगभरात प्रतिष्ठित असलेले आणि युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित असलेले मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे याचे उदाहरण. या इतक्या मोठ्या आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या स्थानकावरही पुरेशी सुरक्षा व्यवस्था नाही. कोणीही कुठूनही सहज आत प्रवेश करू शकतो. इथे सामानाचे स्कॅनिंग होत नाही, प्रवेश करणाऱ्यांची तपासणी होत नाही आणि प्रवाशांची तिकीट तपासणीसुद्धा क्वचितच होते. इतक्या प्रचंड गर्दीत कोण काय बघणार, अशी गंभीर स्थिती आज निर्माण झाली आहे.
वाढत्या लोकसंख्येमुळे आणि होणाऱ्या प्रचंड गर्दीमुळे सुरक्षा तपासणीत खूप वेळ लागेल, हे आव्हान निश्चितच मोठे आहे. पण या कारणास्तव सुरक्षेकडे दुर्लक्ष करणे हे देशाला परवडणारे नाही. किमान युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांवर तरी कडक सुरक्षा व्यवस्था राखली पाहिजे, प्रत्येक सामानाचे स्कॅनिंग झाले पाहिजे आणि प्रवेश करताना लोकांची तपासणी झाली पाहिजे. २६/११ च्या भीषण हल्ल्यानंतरही आपण यातून काहीच धडा घेतला नाही का?
दिल्लीत नुकत्याच १०/११/२०२५ रोजी झालेल्या कार हल्ल्याच्या घटनेनंतर अनेक वृत्तवाहिन्यांनी 'संपूर्ण दिल्ली बॉम्बने उडवण्याचा कट' होता, असे म्हटले. संपूर्ण दिल्ली सोडा, पण सुरक्षेतील ज्या त्रुटी दिसून येत आहेत, त्यावरून भारतातील एखादे संपूर्ण रेल्वे स्थानक मात्र गंभीर धोक्यात आहे, असे खात्रीने वाटते. हे केवळ दिल्ली किंवा मुंबईपुरते मर्यादित नाही, तर देशातील सर्व प्रमुख रेल्वे स्थानके, बस स्थानके, मुख्य बाजारपेठा, सुपरमार्केट, धार्मिक स्थळे, शैक्षणिक संस्था, सार्वजनिक सभा, ऐतिहासिक वारसा स्थळे आणि धरणे यांसारख्या मोक्याच्या ठिकाणी कडक सुरक्षा तपासणीची तातडीने गरज आहे. खूप ठिकाणी गर्दीमुळे एक-दोन नव्हे, तर अनेक प्रवेशद्वारे ठेवावी लागतील, हे निश्चित आहे. पण असलेल्या प्रत्येक प्रवेशद्वारावर व्यक्ती आणि सामानाची अनिवार्य सुरक्षा तपासणी झालीच पाहिजे. गोव्यातील पणजी बस स्थानकसुद्धा आता चारही बाजूंनी बंद करून केवळ चार ते सहा नियंत्रित प्रवेशद्वारे ठेवली पाहिजेत.
दुर्दैवाने, आपल्याकडे कुठेही हल्ला झाल्यावर केवळ ३-४ दिवस कडक सुरक्षा ठेवली जाते आणि त्यानंतर सर्व काही थंड होते. ही प्रतिक्रियात्मक सुरक्षा व्यवस्था आता बदलायला हवी. लाल किल्ल्यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी सतत पोलीस गस्त आणि तपासणी असते, पण तरी सुद्धा या हल्ल्यात गाडीत काय आहे, याचा तपास कोणीच कसा केला नाही व ती तिथपर्यंत कशी पोहोचली हा मूलभूत प्रश्न आहे. फिदायीन स्वरूपाच्या हल्ल्यात व्यक्ती, गाडी व सामान तपासणी हा पहिला सुरक्षा उपाय असायला हवा. पण वेळीच कितीतरी किलो बॉम्ब बनविण्याचे सामान पकडले गेले, हे खूप चांगले कार्य झाले. अन्यथा देशभरात विविध ठिकाणी आणखी खूप मोठे नुकसान झाले असते आणि ते थोडक्यात टळले.
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आता 'सर्वांचा आदर करा, पण सर्वांवर संशय ठेवा' (Respect all, suspect all) हा मंत्र गंभीरतेने आणि दैनंदिन सवयीच्या रूपात स्वीकारण्याची गरज आहे. सुरक्षा व्यवस्था ही केवळ प्रशासकीय गरज न राहता, ती आपल्या सामाजिक जीवनाची संस्कृती व्हायला हवी. सुरक्षा ही केवळ एक घटना किंवा प्रतिसाद नसावा, तर ती एक अखंड प्रक्रिया असावी.

- आदित्य सिनाय भांगी
पणजी - गोवा