गोव्यातील लग्नसमारंभ हळदीचा सोहळा आणि लोकसंस्कृती

कुठल्याही कार्याचा मंगल दिवा प्रज्वलित करताच त्यावर वाहिली जाते ती हळद आणि त्यानंतर कुंकू. याच हळदीने वधूच्या किंवा वराच्या सर्वांगाला लेपन करणे म्हणजे हळद लावण्याचा विधी.

Story: भरजरी |
22nd November, 10:47 pm
गोव्यातील लग्नसमारंभ   हळदीचा सोहळा  आणि लोकसंस्कृती

विवाह या मंगल कार्याचा दुसरा दिवस म्हणजे हळद लावणे. हळदीला आयुर्वेदात अनन्यसाधारण महत्त्व आहे. हळदीमध्ये रोगप्रतिकारशक्ती मोठ्या प्रमाणात असते. सौंदर्यप्रसाधनासाठीही हळदीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. हळद दुधाबरोबर पोटात घेतल्यास कित्येक आजारांचा नायनाट होतो. असे आयुर्वेदात एक ना अनेक हळदीचे फायदे असले तरी, आपल्या धार्मिक कार्यामध्ये तिचे महत्त्व अधिक आहे. हळद आणि कुंकवाशिवाय आपला कोणताही धार्मिक विधी पूर्ण होत नाही. कुठल्याही कार्याचा मंगल दिवा प्रज्वलित करताच त्यावर वाहिली जाते ती हळद आणि त्यानंतर कुंकू. याच हळदीने वधूच्या किंवा वराच्या सर्वांगाला लेपन करणे म्हणजे हळद लावण्याचा विधी.

​गोव्यामध्ये प्रत्येक घराच्या परसात हळदीची रोपे आजही दिसून येतात. नागपंचमीला हळदीच्या पानावर पातोळ्या थापल्या जातात. याच हळदीच्या पानावर नागपंचमीला किंवा गणेश चतुर्थीला गौरी पूजनाच्या वेळी 'हौसे’ वाढले जातात. आणि लग्न विधीच्या वेळी हीच हळकुंडे कांडून त्यापासून हळद तयार केली जाते, जी पुढे संपूर्ण मंगल कार्यासाठी वापरली जाते. लग्नासारख्या मंगल कार्यासाठी वापरलेल्या हळदीच्या रोपाला मात्र सर्वसामान्य हळदीपेक्षा जास्त श्रेष्ठत्व दिले आहे. हे सांगताना 'घरणीबाई’ ओवी गाऊ लागते:

पाऊस पडला

मानका मोतीयाचा

बरम्या हाती कुदळी

काढला एक ढेप

तेथून लायला रोप

काय हळदीचा

कोलवा चा धाकना

दुधाचा शिपणा

हळदीच्या खानाक झाला

काय एक पान

​माणिक मोत्याचा पाऊस पडू लागताच प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने आपल्या हाती कुदळ घेतली. ब्रह्मदेवाने कुदळ घेऊन मातीचा एक ढेपाचा खड्डा खणला आणि त्यामध्ये हळदीचे रोप लावले. या हळदीच्या रोपाला 'कोलव्याने' म्हणजेच सुकलेल्या चाऱ्याने/पानांनी झाकले. रोज त्याला दुधाने शिंपले. अशाप्रकारे ब्रह्मदेवाच्या खास देखरेखीखाली हळदीचे रोप वाढले. चंद्राच्या कलेप्रमाणे हे रोप एक पान दोन पान करीत वाढू लागले. हळदीचे रोप पूर्ण तयार झाल्यावर त्याच्यापासून हळद कांडली आणि ती नवरदेवाला किंवा नवरीला सर्वांगाला लावली.

​अशी कल्पना करताना घरणीबाई घरातल्या माणसांना हळद लावायला बोलावते. पण घरातल्या माणसांना बोलावण्यापूर्वी ती गणिसाला म्हणजे आद्य दैवत श्री गणेशाला बोलावते:

​साळी दाळीचे तांदूळ

हळदी वलया

गणिस देवा बलया

काय हळद लाव

गणिस देवा येती

हळद लायती काय

नवऱ्या बाळा

​या ओळीचा अर्थ आहे, नारळाच्या तेलात कालवून हळद तयार केली. त्यात मांगल्याचे प्रतीक म्हणून तांदूळ एकत्र केले. अशी हळद लावण्याची सर्व तयारी झालेली आहे. अशा वेळेला सर्वप्रथम गणेश देवाला हळद लावण्यासाठी बोलावतात. गणेश देव ही तयारी बघून खुश होतात, आनंदाने हे आमंत्रण स्वीकारून हळदीच्या समारंभाला येऊन नवरदेवाला हळद लावत आपला आशीर्वाद देतात.

​अशाप्रकारे याच ओवीमध्ये घरणीबाई कुलदेवतेचे व ग्रामदेवाचे नाव घेते आणि त्यानंतर घरातल्या माणसांना मानपानाप्रमाणे बोलावते. त्यात सर्वप्रथम नवऱ्याच्या वडिलांना, त्यानंतर आई, मामा, मामी, आत्या, मावशी अशी ही नावे वाढत जातात. यावेळी सर्व माणसे हळद लावताना नवरदेवाचे पाय, गुडघे, दंड आणि गाल अशा पाच ठिकाणी हळद लावतात. म्हणजेच नवऱ्याच्या अंगावर हळद चढवतात.

पावली हळद चढयिली

धोपरी हळद चढयिली

कोपरी हळद चढयिली

भुजा हळद चढयिली

गाली हळद चढयिली

​घरातल्या माणसांनी मनमुराद हळद लावल्यावर शेवटी आई पुन्हा येते आणि हळद उतरवू लागते. म्हणजे आता आई तीच हळद सर्वप्रथम गाल, त्यानंतर भुजा, कोपर, गुडघे आणि पावले अशी उतरती हळद लावते. हळद लावून झाल्यावर मग नवरदेवाला आंघोळीसाठी नेले जाते. नवरदेवाला हळद लावून झाल्यावर तीच उष्टी हळद नवरी मुलीच्या घरी पाठवली जाते. ही उष्टी हळद नवरी मुलीच्या अंगाला लावली जाते. हा एक फरक सोडला तर दोन्ही घरचा हळदी समारंभ एकसमान असतो. हळद लावून झाल्यावर नवरदेवाला आणि नवरीला आंघोळीला नेले जाते.

​आंघोळ घालताना त्या जागी 'दिण्याच्या’ झाडाच्या चार डहाळ्या एकत्र बांधल्या जातात. त्याला सभोवताली सुताचे वेढे दिले जातात. मध्ये नवरदेव, नवरी बसते. मामा किंवा काही ठिकाणी आजी प्रतिकात्मक आंघोळ घालते. ही आंघोळ घालताना घरणीबाई गाऊ लागते:

माळाचच्यो मळशेरनी

गंगे तुझा गे पाणी

नवऱ्याच्या बहिणीनी

पाणी तापयला

आमचो नवरो

इंडेन पाणी न्हाई

सरव लोट जाई

नारळा बनी

नारळाचे रे बन

कातू नका रे भवऱ्या

आठ दिस नवऱ्या काय

माटवात

​ही ओवी म्हणजे रीती आणि पर्यावरण याची आपली संस्कृती कशी सांगड घालते, याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. नवऱ्याच्या बहिणीने आंघोळीसाठी पाणी तापवले, नवरदेव आंघोळ करू लागला आणि आंघोळ करतानाचे जे पाणी वाहत जाते, त्या पाण्याचे लोट नारळाच्या बनात जाऊन नारळाची झाडे वृद्धिंगत करतात. अशा ह्या नारळाच्या झाडांना भुंग्याने त्रास देऊ नये आणि आठ दिवस तग धरावा. ह्या आठ दिवसांनंतर भुंग्याचे आणि फुलाचे मिलन होणार आहे. त्यामुळे भवऱ्याने म्हणजेच नवरदेवाने घाई करू नये.

​आपली संस्कृती ही संयमावर आधारित आहे, ती अशी ओव्यांमधूनही डोकावत असते. कुठल्याही गोष्टीची घाई करू नये. प्रत्येक गोष्टीसाठी योग्य वेळ असते आणि ती योग्य वेळ येण्याची प्रत्येकाने वाट बघावी हेच जणू ह्या ओवीमधून जाणवते.

​आपल्याला जे नेहमी वाटत असते की पूर्वीची माणसे अडाणी होती. पण ह्या ओव्या ऐकून आज प्रश्न पडतो की माणसे ती अडाणी होती की आम्ही आहोत? अशा पद्धतीचे वैदिक विधी आणि त्या विधींमागे पर्यावरण आणि स्थानिक वातावरणाची सांगड घालून तयार केलेल्या रितीभाती. या रितीभाती ठरवण्यापूर्वी किती गहन विचार झाला असेल याची कल्पनासुद्धा करवत नाही. आणि ह्या पद्धती फक्त गोव्यापुरत्या किंवा भारताच्या काही भागापुरत्या सीमित नसून संपूर्ण भारतभर याची अशी जवळीक साधणारी लग्नापूर्वी हळद लावण्याची प्रथा आजही दिसून येते. एवढे मोठे भौगोलिक अंतर पार करत या विधी या भारतवर्षाच्या कानाकोपऱ्यापर्यंत कशा पोहोचल्या, हा प्रश्न मात्र नक्की विचार करण्यासारखा आहे. आणि या प्रश्नाचे उत्तर जेव्हा आम्हाला सापडेल, तेव्हा आम्ही किती सुसंस्कृत आणि आधुनिक तसेच प्रगत होतो, याचा अंदाज नक्की येईल.

​आंघोळ घालून झाल्यावर मामाने नवरीला/नवरदेवाला उचलून मांडवात आणायचे असते. इथे नवऱ्याची बहीण त्याची वाट अडवण्यास सज्ज असते.​


- गाैतमी चाेर्लेकर गावस