मेजर जनरल इयान कार्डोझो यांचे पुत्र, कर्नल सुनीथ कार्डोझो यांनी वडिलांच्याच गोरखा रेजिमेंटमध्ये सेवा दिली. श्रीलंकेतील गोळीबारापासून सियाचीनच्या बर्फाळ शिखरांपर्यंत आणि सुदानमधील संयुक्त राष्ट्रांच्या मोहिमेपर्यंत त्यांचा हा थरारक सैन्यप्रवास खूप प्रेरणादायी आहे.

मेजर जनरल इयान कार्डोझो हे भारतीय सैन्यातील एक मोठे आणि अनुभवी नाव. त्यांचे पुत्र आणि गोव्याचे भूमिपुत्र कर्नल सुनीथ कार्डोझो यांनी वडिलांचा हा वारसा पुढे नेला. त्यांनी थेट वडिलांच्याच 'गोरखा रेजिमेंट'मध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. ओपन कॅटेगरीतून इतर कोणत्याही सैन्य विभागात जाण्याचा पर्याय असूनही त्यांनी हा सन्मानाचा मार्ग निवडला. त्यांच्या बटालियनमध्ये त्याकाळी दुसऱ्या पिढीतील पाच अधिकारी होते. आज तिसऱ्या आणि चौथ्या पिढीतील अधिकारीही भारतीय सैन्यात सेवा देत आहेत, ही अभिमानाची गोष्ट आहे.
मुलभूत प्रशिक्षण मिळाल्यावर कर्नल कार्डोझो यांना लगेचच श्रीलंकेत तैनात असलेल्या त्यांच्या बटालियनमध्ये पोस्ट करण्यात आलं. मद्रासहून कुरिअर फ्लाईटमधून ते श्रीलंकेला पोहोचले आणि त्यांच्या पहिल्याच दिवशी त्यांना गोळीबाराचा सामना करावा लागला. विमानतळावर उतरताच बाहेर गोळीबार सुरू झाला आणि त्यांना तातडीने एका छोट्या खोलीत आश्रय घ्यावा लागला. सुमारे चार तास तणावाखाली राहिल्यानंतर परिस्थिती शांत झाली आणि ते रात्री उशिरा बटालियनमध्ये पोहोचले.
‘आयपीकेएफ’ (Indian Peace Keeping Force) चा भाग म्हणून श्रीलंकेत असताना त्यांचं प्रशिक्षण सुरू झालं. सैन्यात अधिकारी म्हणून दाखल झाल्यावर लगेचच कमांडो सैन्य दिलं जात नाही. त्यांच्यावर अनुभवी लोकांची देखरेख होती. त्यांना एका सार्जंटच्या आणि वरिष्ठ अधिकाऱ्याच्या कंपनीत नियुक्त करण्यात आलं होतं. त्यांच्या कमांडिंग ऑफिसरने त्यांना स्पष्ट सूचना दिली होती की, “कोणतंही शौर्य दाखवायचं नाही. शिपाई जे काही करतील, तुम्ही त्यांच्यासोबत तेच करा.”
पहिले तीन महिने त्यांनी एका सार्जंट आणि जेसीओच्या (Junior Commissioned Officer) अधीन राहून शिपायांचे काम शिकले. गस्त घालणे, सैनिकांसोबत राहणे आणि रात्री गार्ड ड्युटी करणे, हे सर्व त्यांनी शिपायांसारखंच केलं. त्यांना ऑफिसर्स मेसमध्ये प्रवेश करण्याचीही परवानगी नव्हती. भारतीय सैन्य तिथून माघार घेत असताना ते उत्तर, जाफना, पलाली या भागात होते आणि तीन महिन्यांत बटालियनसह मायदेशी परतले.
कर्नल कार्डोझो यांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये सहा कार्यकाळ सेवा केली आहे. जेव्हा त्यांनी तिथे सेवा सुरू केली, तेव्हा परिस्थिती खूप तणावाची होती आणि दहशतवाद शिगेला पोहोचला होता. त्यांनी त्या काळातल्या सर्वात उष्ण भागांपैकी एक असलेल्या कुपवाडा येथे सेवा केली.
पहिला कार्यकाळ संपवून ते शांतता कार्यकाळासाठी डलहौजीला गेले, पण लगेचच पूंछ आणि राजौरी येथे तणाव वाढला. परिणामी, ते पुन्हा अडीच वर्षांसाठी काश्मीरमध्ये परतले. पाकिस्तानींनी काश्मीरनंतर राजौरी आणि पूंछमध्ये घुसण्याचा प्रयत्न केल्यामुळे तो भाग तापला होता. अशाप्रकारे, त्यांनी काश्मीर, पूंछ आणि राजौरीमध्ये जवळपास पाच वर्षे सेवा दिली.
तिथून शांतता कार्यकाळासाठी अलाहाबादला जीटीओ (Group Testing Officer) म्हणून गेल्यानंतरही त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच त्यांना युनिटकडून बोलावणं आलं. बटालियन सियाचीनला जात होती. त्यांनी त्वरित स्वेच्छा दर्शवली आणि जगातील सर्वात उंच रणभूमीवर एक कार्यकाळ पूर्ण केला. त्यानंतर फिरोजपूर, सुदानमधील संयुक्त राष्ट्रांची मोहीम आणि पुन्हा राजौरी-पूंछ अशा सततच्या कार्यकाळात त्यांनी आपले बहुमूल्य योगदान दिले.
कर्नल कार्डोझो यांनी एसएसबी (Service Selection Board) अलाहाबादमध्ये ग्रुप टेस्टिंग ऑफिसर (जीटीओ) म्हणूनही काम केलं आहे. जीटीओ टास्कमध्ये उमेदवारांची कार्यक्षमता, ग्रुप डायनॅमिक्स आणि संवादाची क्षमता तपासली जाते. जीटीओ गट चर्चा, ग्रुप अडथळ्याची शर्यत यासारख्या गोष्टींवरून उमेदवाराचे मिनिटांत मूल्यांकन करतात. मानसशास्त्रज्ञ आणि मुलाखत घेणारा अधिकारी स्वतंत्रपणे मूल्यांकन करतात, त्यानंतर परिषद भरते, जिथे अंतिम निर्णय घेतला जातो.
सैन्य निवड प्रक्रियेत पीआयक्यू (Personal Information Questionnaire) फॉर्म अत्यंत महत्त्वाचा असतो. मुलाखत घेणारा अधिकारी उमेदवाराच्या आवडी, छंद, शिक्षण आणि पार्श्वभूमीची माहिती या फॉर्मवरून घेतो आणि त्यावर आधारित प्रश्न विचारतो. उमेदवाराला जागतिक घडामोडींमध्ये रस दाखवावा लागतो. तुम्ही जे काही माहिती देता, त्याबद्दल तुम्ही स्पष्ट आणि ठाम असणं गरजेचं आहे. अन्यथा, मुलाखत घेणारा अधिकारी तुम्हाला सहजपणे ‘ट्रॅप’ करू शकतो, असं कर्नल कार्डोझो सांगतात.

- जॉन आगियार
+ ९१ ९८२२१५९७०५