पोरसू ही एकेकाळी गोव्यातील प्रत्येक गावात दिसणारी सामूहिक शेतीची संकल्पना होती. पालये येथील 'खऱ्यार' नावाच्या जागेत झालेल्या या पोरसूतून फक्त भाज्याच नाही, तर बालपणीचे गोड क्षण, निसर्गाची ओढ आणि सामूहिक स्नेह जपला गेला.

माझ्या जन्मगावी पालये येथील ‘खऱ्यार’ ही जागा पोरसू करण्याचीच होती. घरापासून अंदाजे एक किलोमीटर अंतरावर ही जागा होती. त्याला जोडून असलेला विस्तीर्ण शेतमळा हे तेथील खास आकर्षण होते. पोरसू वाड्यावरील प्रत्येकजण करायचा. एकत्रित कुटुंब पद्धती, त्यामुळे सर्वांचेच पोरसू असायचे. शेतमळा वायंगणी शेतीसाठी पोटात ओल घेऊन वर्षभर सक्रीय असायचा. आम्ही ज्या जागेत पोरसू करत असू, त्यात भवानी काकी, वयल्यागेलो मनोहर, आम्ही आणि लखोकाका अशी चौघांची वाटणी होती. त्यात पोरसू शिंपणे, वय करणे, कुंपण घालणे, या गोष्टी स्वतःच्या स्वतंत्रपणे करायच्या.
पोरसाला पाणी एकाच डोबक्याचे. त्यासाठी दिवस सर्वांनी समजुतीने ठरविलेले. एकाच दिवशी दोघांनी शिंपण करायची. एकाने सकाळी तर दुसऱ्याने दुपारी. पाणी काढण्यासाठी कोळमे आणि शिंपण्यासाठीचे कर्ले प्रत्येकाचे स्वतंत्र असायचे. पाणी पोरसाला पोहोचण्यासाठी खास पाटांची व्यवस्था केलेली असायची.
आजच्या पिढीला पोरसूची संकल्पना लक्षात येणार नाही. मात्र पंचवीस-तीस वर्षांपूर्वी प्रत्येक गाव स्वावलंबी होता. पावसाळ्यात वाल, दोडकी, चिटकी, घोसाळी, पडवळ, भेंडी इत्यादी भाज्या अंगणात, घराच्या कडे-कुशीला लावल्या जायच्या. काकडीचा वेल चढविण्यासाठी मांडव घातला जायचा. माझी आई तर अंगणात या भाज्यांवर भरपूर मेहनत घ्यायची. काकडीच्या टिपऱ्या छोट्या छोट्या काकड्या पानाआड दडून बसलेल्या असत. आईची नजर चुकवून या टिपऱ्या काढून फस्त करायच्या हे ठरलेलंच होतं. त्यासाठी अनेकदा आईची बोलणी खावी लागली होती.
काकडी आणि टिपऱ्या खाण्यासाठी माझा मामा जेव्हा येत असे, तेव्हा तर चंगळ व्हायची. टिपरी हातात धरून तो आपला हात वर करायचा. आम्ही दोघीही त्याच्या हाताला दोन्ही बाजूंनी लटकत राहून ती छोटी काकडी आमच्या हाताला लागते का, म्हणून प्रयत्न करीत असू. मामाची ओढ त्या बालमनाला खूप होती. तशी ती आजही मनातळात आहे. ते तसे असंख्य अविस्मरणीय क्षण मामाच्या सहवासात आम्ही अनुभवले होते. पोरसू आठवले की मग बालपण परत आतमध्ये सामावून जाते. ताटात नेहमीच ताज्या भाज्या असत. भाद्रपद महिना संपून गेला तरीही या भाज्या कमी-अधिक प्रमाणात मिळत असत.
त्यानंतर दिवाळी. घरासमोरच्या मळ्यात वायंगणी शेतीची सर्वांना घाई असायची. प्रचंड विस्तारलेल्या त्या मळ्यात वरक्याचा बांध ते पुढे भंडारवाडा पर्यंत सर्वत्र कोठे बैल नांगराला जुंपलेले, तर कोणी गुठो घालून जमीन तयार करत असल्याचे दृश्य दिसायचे. थंडीचे दिवस. शेतात चिखल पाणी. शेतकरी नांगर खांद्यावर घेऊन चाललेला. नांगरणी सुरू होते. “हिरीरी पा पा पा” असे आवाज मुखातून येत असत. मध्येच कोठेतरी आळस करणाऱ्या बैलांवर छडी मारण्याचा आवाज... धुके पसरलेले... आणि चिखल पाण्यातून वाफा येतानाचे दृश्य डोळ्यात जसेच्या तसे आहे.
रव पेरताना, टिकट्यावर तर कधी पिड्यावर बसून तरवा काढतानाचे दृश्य, ओणव्याने तो लावतानाची दृश्ये जिवंत होतात. उकड्या तांदळाची पेज आणि आमली यांचा आस्वाद तर स्वर्गीय वाटायचा. बऱ्याच वेळा या पेजेच्या ओढीनेच तरवा काढण्यासाठी माझी पावले मळ्याकडे वळायची.
वायंगणी शेतकाम सुरू असताना दुसऱ्या बाजूने खऱ्यारच्या जागेत पोरसू करण्याची घाई प्रत्येक कुटुंबाला व्हायची. ही कामे साधारण तुळशीचे लग्न आटोपून सुरू होत असत. नांगरणी, ढेकळे फोडणे, शेणखत, माती मऊसूत रवाळ करणे, चऱ्या पाडणे, मधोमध पाणी जाण्यासाठी माग तयार करणे, ही सर्व कामे करताना आई एकटी राबायची. लखोकाका, परुची आई यांची सोबत होतीच.
कोळम्यांने पाणी काढणे ही कला सर्वांनाच जमत होती असे नाही, पण ते दिवसच वेगळे होते. जीवन जगण्याच्या गरजेतून वैविध्यपूर्ण कला कौशल्यांची अविष्कृती निर्माण झाली. त्याला लोकमनाच्या कल्पकतेची जोड मिळाली. पोरसूची केलेली रचना, कोणती भाजी कोठे असायला हवी, मिरचीच्या रोपांची जागा, कांद्याची, वाल, तांबडी भाजी, मुळा, सासवेलची भाजी, गड्ड्याची भाजी सगळ्यांच्या जागा ठरलेल्या होत्या. वेगळ्या वाफ्यात पहिल्यांदा मिरचीची रोपे उगवायची व नंतर ती जी चर केलेली असे, तिथे लावली जायची. रोप लावण्यासाठी दिवस ठरवले जायचे. एकमेकांना विचारून ही कामे सामूहिकतेने केली जायची.
या पोरसात मुख्य लागवड ही मिरचीची असायची, पण त्याबरोबरच पांढऱ्या कणग्यांचा वाफा हमखास असायचा. शिवाय गोंणी आणि दांणी रोजा, झेंडूची फुले, वालीच्या वेली, मका, ही पिके घेतली जात असत. पोरसू करण्यासाठी मोठी माणसे जात असत. तिथे लहानपणी आम्ही जात असू ते चिरपुटांच्या आशेने. कोवळ्या मक्याची दुधाळ कणसे, कुरुकुरु करून खायला मिळणाऱ्या वालीसाठी. खरंतर चिरपुटे तिथे कोणीही लावलेली नसत, ती आपोआपच रुजत. मोदकाच्या आकाराचे हे फळ. वरचे पातळ आवरण बाजूला केले की आत गोलाकार कोवळा हिरवा गर. चव आंबट, तुरट, कडवट, गोड... चिरपुटे जिभेवर ठेवायची, तिथेच त्यांना फिरवायचे. दाताखाली आले की आतील रवाळ गर वेगळीच अनुभूती देत असे.
पोरसू कसे परिपुष्ट होत असे. पाणी पुरविणारे डोबके म्हणजे छोटीशी विहिरच होती. कोळम्याने, पत्र्याच्या डब्याचा वापर करून काढलेले पाणी मागातून वाट काढीत सळसळत पुढे जायचे. सर्वांचीच पोरसू जवळजवळ असल्याने हे माग, पाट एकमेकांना जोडलेले होते. त्यामुळे पाणी काढण्यापूर्वी दुसऱ्यांच्या पोरसात जाऊ नये म्हणून छोटा मातीचा बांध घालून अडवत.
पोरसू आता कालबाह्य ठरले. दैनंदिन जीवनातील सर्व गरजा गाव स्वतःच भागवत असे. हे अन्न पूर्णपणे नैसर्गिक होते. त्यात मेहनत होती. ऐक्याची भावना होती. रोजंदारीवर काम ही संकल्पनाच कोठे नव्हती. त्यामुळे आपुलकी, स्नेह, जिव्हाळा, ह्या भावना वेढून होत्या.
आज गावात गेल्यावर उजाड ओस पडलेला मळा दिसतो. ‘खऱ्यार’ ही जागा एकाकी पडलेली आहे. कदाचित पैशांसाठी तिचा लिलावही झाला असेल. माणसाला शांत, समाधानी, निरोगी, आनंददायी, स्नेहमयी जीवन हवे आहे की फक्त स्पर्धा आणि पैसा... धनदौलत? याचा विचार केला तर ‘पोरसू’ कळत जाईल. तो नितळ आनंद होता. मातीचा स्पर्श जगण्याची उर्मी वाढवत राहायची.
(लेखिका लोकसाहित्याच्या अभ्यासक, कवयित्री आणि शिक्षिका आहेत.)

- पौर्णिमा केरकर