
एका घनदाट, सुंदर हिरव्यागार जंगलात, सोनटक्का नावाच्या फुलांच्या झुडपात, एक ससा कुटुंब आनंदाने राहत होते. त्या कुटुंबात बनी नावाचा एक छोटा आणि गुटगुटीत ससा होता. बनी ससा खूप चपळ आणि उत्साही होता, पण त्याला एक सवय होती. तो नेहमी आईचे कधीच नीट न ऐकता, पूर्ण गोष्ट न ऐकताच तो लगेच कामाला लागायचा.
बनी सशाला गाजरे आणि कोबी खूप आवडायची. त्याची आई, जी खूप प्रेमळ आणि अनुभवी होती, ती त्याला नेहमी सांगायची की, "बाळा, जंगल खूप मोठे आहे. गाजराच्या शेतात जाताना नेहमी मधल्या वाटेवरून जायचे, कारण बाजूच्या वाटेवर शिकारीचा सापळा असू शकते." एक सुंदर सकाळ होती. आईने बनी सशाला गाजर आणायला शेतात पाठवले. आई म्हणाली, "बाळा! तू लवकर जा आणि गाजरे घेऊन ये. पण लक्षात ठेव..."
आईचे वाक्य पूर्ण होण्यापूर्वीच, बनी ससा उत्साहाने म्हणाला, "हो, हो! मला माहिती आहे! गाजरे आणायची आहेत!" आणि तो क्षणात धूम ठोकून पळाला. आई त्याच्याकडे पाहत राहिली आणि स्वतःशीच पुटपुटली, "बाप रे! याला नेहमीच घाई असते. पूर्ण गोष्ट कधीच ऐकत नाही."
बनी ससा झपाट्याने धावत होता. त्याला मधला रस्ता माहीत होता, पण त्याला वाटले की आज त्याने थोडी वेगळी वाट निवडून पहावी. "आज नवीन रस्ता धरूया. म्हणजे मी अजून लवकर पोहोचेन," असा विचार करून तो बाजूच्या, कमी वापरलेल्या वाटेने निघाला.
आईने त्याला बाजूच्या वाटेवर जाळे असू शकते, हे सांगण्याचा प्रयत्न केला होता, पण बनी ससाने तिचे बोलणे अर्धवट ऐकून पळ काढला होता. बाजूच्या वाटेने तो थोडाच पुढे गेला असेल, तेवढ्यात त्याला एका गवतात लपवलेले एक मोठे जाळे दिसले. त्या जाळ्यामध्ये नुकताच अडकलेला एक छोटा उंदीर भयभीत होऊन मदतीसाठी ओरडत होता.
उंदराचा तो आवाज ऐकून बनी ससा एकदम थांबला. त्याने पाहिले की तो जाळ्याच्या अगदी जवळून जात होता. जर त्याने दोन पाऊले अजून पुढे टाकली असती, तर तोही त्या जाळ्यात अडकला असता! तो लगेच मागे फिरला आणि त्याने मधला सुरक्षित रस्ता धरला. वाटेत त्याला आई आठवली. तिने त्याला नेमके याच धोक्याबद्दल सावध करायचे होते. त्याला आपल्या घाईची आणि निष्काळजीपणाची खूप लाज वाटली.
तो सुरक्षितपणे गाजरे घेऊन घरी परत आला. त्याने लगेच आईच्या कुशीत शिरून तिला मिठी मारली. आईने विचारले, "काय झाले माझ्या बाळाला? तू इतका घाबरलेला का दिसत आहेस?" बनी सश्याने रडत-रडत संपूर्ण घटना आईला सांगितली. आईने त्याला शांत केले आणि म्हणाली, "बनी, बाळा, मी तुला हेच सांगत होते. जीवनात नेहमी दुसऱ्यांचे शांतपणे ऐकले पाहिजे. प्रत्येक मोठ्या व्यक्तीला आणि विशेषतः आईला, जगाचा अनुभव असतो. घाईत घेतलेले निर्णय आणि अर्धवट ऐकलेल्या गोष्टी नेहमी धोक्याच्या ठरतात."
बनी ससाने आईचे म्हणणे मान्य केले. त्याने शपथ घेतली की, यापुढे तो कधीही कोणाचे बोलणे अर्धवट ऐकणार नाही. तो नेहमी शांतपणे आणि पूर्ण विचार करूनच काम करेल. त्या दिवसापासून बनी ससा खूप समजूतदार झाला आणि त्याने आपल्या आईच्या शब्दांना खूप महत्त्व दिले.
बोध: मोठ्या माणसांचे बोलणे नेहमी पूर्ण आणि शांतपणे ऐकावे. घाई करणे आणि अर्धवट माहितीवर काम करणे नेहमी धोक्याचे ठरते. अनुभवाच्या गोष्टी ऐकल्याने आपण संकटांपासून वाचू शकतो.

- स्नेहा सुतार