युपीएससी गाजलेले खटले

युपीएससी च्या परीक्षांसाठी सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निकाल वाचणे अत्यावश्यक आहे. या सखोल न्यायनिर्णयांच्या अभ्यासाने तुमचे ज्ञान आणि आत्मविश्वास वाढतो.

Story: यशस्वी भव: |
22nd November, 10:58 pm
युपीएससी गाजलेले खटले

युपीएससी च्या मुख्य परीक्षेमध्ये जनरल स्टडीजच्या लेखी परीक्षेत हल्ली-हल्लीच्या सर्वोच्च न्यायालयातील निकालांवर सुद्धा दीर्घोत्तरी प्रश्न असतात. हल्ली इंटरनेटवर PDF स्वरूपात यांचे पूर्ण निर्णय उपलब्ध असते. ते न्यायनिर्णय म्हणजे एक प्रकारे मोठे पुस्तकच असते, ज्यामध्ये निकाल जो दिलेला आहे तो कोणकोणत्या गोष्टींच्या आधारे दिला आहे, कोणत्या जुन्या खटल्यांचा आधार, त्या त्या वेळेस त्या त्या न्यायाधीशांनी कशी-कशी मते व्यक्त केली आहेत, पक्षकारांनी आपापले मुद्दे, पुरावे, साक्षी कशा प्रकारे नोंदवलेल्या आहेत याचा संपूर्ण गोशवारा असतो. पक्षकारांनी कोणत्या शब्दाचा कसा अर्थ घेतला व कोर्टासमोर विचार करायला ठेवला, ज्याला ‘इंटरप्रिटेशन’ असे म्हणतात. असे मुद्दे स्वच्छ आणि स्पष्टपणे नमूद केलेले असतात. त्याचबरोबर विरुद्ध पक्षाने पण कसे मुद्दे मांडले आहेत, याचाही गोषवारा असतो. ती केस नीट समजून घेण्यासाठी हे सर्व वाचन अत्यंत आवश्यक आहे. या सर्व गोष्टींचा उहापोह हा दीर्घोत्तरी प्रश्नांमध्ये करावा लागतो.

उदा. ‘मराठा आरक्षण’ हा विषय. या विषयाचा निकाल शेकडो पानांमध्ये मांडलेला आहे. ‘मराठा’ या शब्दाचा अर्थ, ‘मराठा’ या जातीचा अर्थ, त्याचा उगमस्थान, स्थित्यंतरे घटनेतील कलमांशी याचा संबंध लावताना पुढे कसे-कसे होत गेले, याचा उलगडा होतो व ती माहिती खूप ‘मनोरंजक’ असते. याने ‘सामान्य ज्ञान’ तर वाढतेच, परंतु ‘केस’ नीट कळते. त्यामुळे अशा प्रकारच्या न्यायनिर्णयांच्या वाचनाचा विद्यार्थ्याला खूप फायदा होतो. हातातील मोबाईल फोनच्या इंटरनेटचा यासाठी नक्की फायदा होतो.

गेल्या ५ वर्षांत कलम ३७०, रामजन्मभूमी खटला, मराठा आरक्षण, महाराष्ट्रातील सत्तातराचा खेळ, तिहेरी तलाक असे अनेक खटले मार्गी लागले. यांचे अवश्य वाचन करावे. त्याचबरोबर जुने गाजलेले खटले, जसे की भोपाळ वायूदुर्घटना, व्यभिचार, ‘नॉमिनी’ या शब्दाचा अन्वयार्थ असे अनेक गाजलेल्या प्रकरणांचा नीट अभ्यास, वाचन व मनन करावे. कारण पुढे ‘मुलाखती’साठी सुद्धा या विषयांची माहिती उपयोगी पडते. त्यामुळे युपीएससी च्या उमेदवारांनी या गोष्टी आवर्जून वाचाव्यात. सर्वोच्च न्यायालय कोणत्याही गोष्टींचा किती बारकाईने विचार करते याचे ही आपल्याला कौतुक वाटले तर नवल नाही. मोबाईलमध्ये ‘यु ट्युब’च्या माध्यमातून या संदर्भात माहिती तर मिळतेच, परंतु हल्ली या निकालांची प्रत्यक्ष PDF सुद्धा उपलब्ध होते. ती एकदा वाचली की प्रचंड ज्ञान तर वाढतच, परंतु याने आत्मविश्वास सुद्धा प्रत्यक्ष मुलाखतीमध्ये दिसून येतो. सर्वोच्च न्यायालयाच्या अशा निकालांमध्ये इतके विस्तृत लिहिलेले असते की दोन्ही बाजूचे युक्तिवाद, त्यांनी लावलेले ‘सायटेशन (आधार) सुद्धा विचारात घेतलेले दिसतात. उगाचच एकतर्फी असे काही निर्णय दिलेले नसतात. प्रत्येक गोष्टींचा व बाबींचा अन्वयार्थ लावला जातो व कशा निष्कर्षापर्यंत कोर्ट कसे पोहोचलेले आहे, हे सुद्धा लिहिलेले असते. यामुळे ‘न्यायिक भाषा’ सुद्धा कळायला लागते व पुढे-पुढे प्रत्येक निकाल आपल्याला कळायला लागतो. या गोष्टींचा पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखतींमध्ये फार उपयोग होतो.

(लेखक नामांकित वकील आणि करिअर समुपदेशक आहेत.)


- अॅड. शैलेश कुलकर्णी

कुर्टी - फोंडा