अशा गुन्ह्यांमध्ये पैशांचा वापर कसा आणि कुठे झाला, पैसे दिलेल्या काळात झालेली खरेदी किंवा ते इतरांना दिले असल्यास त्यातील काही सूत्र सापडते का, ते पाहणे गरजेचे आहे. पोलिसांनी एकदा या साऱ्या प्रकरणांचा तपास केला आहे, पण तपास पूर्ण न केल्यामुळे हा गुंता वाढत चालला आहे.

पैसे घेऊन सरकारी नोकरी देतो असे सांगणाऱ्यांचा गेल्या वर्षी भांडाफोड झाल्यानंतर आता वर्षभराने पुन्हा या प्रकरणाची चर्चा सुरू झाली. गेल्या वर्षीच्या शेवटी गोव्यात वेगवेगळ्या नोकरभरतीसाठी पैसे घेणाऱ्यांचा एकाचवेळी पर्दाफाश करण्यात आला होता. रेल्वेत, लष्करात, राज्य सरकारच्या खात्यांमध्ये नोकऱ्या देणाऱ्यांच्या अटकेचे सत्र सुरू झाल्यानंतर राज्यात खळबळ माजली होती. मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना या प्रकरणी चौकशी करून सर्वांवर कारवाई करण्याचे निर्देश दिल्यानंतर पोलिसांनी अनेकांना अटक केली होती. ९५ पेक्षा जास्त जणांनी तक्रारी केल्यानंतर सुमारे ३५ गुन्हे नोंद झाले होते. २०२२ ते २०२४ पर्यंत अशा प्रकारचे सुमारे ४५ गुन्हे गोव्यातील वेगवेगळ्या पोलीस स्थानकांत नोंद झाले होते. २०२४ च्या अखेरच्या तीन महिन्यांत सुमारे ३५ गुन्हे नोंद झाले, ज्यात आलेल्या तक्रारींनुसार सुमारे ९ कोटींचा हा घोटाळा होता. या ३५ गुन्ह्यांमध्ये पूजा नाईक, दीपश्री गावस सावंत, प्रिया यादव, श्रुती प्रभुगावकर, संदीप परब, प्रकाश राणे, सागर नाईक अशा कितीतरी जणांना अटक झाली. त्यातील सगळेच आता जामिनावर आहेत. अटकेनंतर एकमेकांची नावे उघड करून पोलिसांसमोर तपासासाठी आव्हान निर्माण करणाऱ्या या सर्वांनीच आपली सुटका करून घेतली. लोक पैसे परत मागत असल्यामुळे आपण अमुक लोकांना ते दिले, असेही अटकेनंतर संशयितांनी सांगितले. पण त्याचे ठोस पुरावे अनेकांकडे नव्हते.
आता एका वर्षानंतर अचानक पूजा नाईक समोर येऊन दोन अधिकाऱ्यांना चोवीस तासांची मुदत देते आणि त्यानंतर क्राईम ब्रांच, डिचोली पोलीस तिला बोलावतात, पण या तपासातून काहीच निष्पन्न झाले नाही. अधिकाऱ्यांची नावे सांगत असली तरी पूजा नाईक हिने पुराव्यादाखल काहीच ठोस दस्तावेज दिले नसल्यामुळे पुन्हा एकदा या सगळ्या गोष्टींची फक्त हवाच निर्माण झाली आहे. ज्या दोन अधिकाऱ्यांची नावे ती घेत आहे, त्यांनीही उघडपणे आपली भूमिका मांडली नाही. पूजा नाईकने हा बनाव पुन्हा का केला असावा, ते कळण्यास मार्ग नाही. तपासातून अद्याप काही समोर आले नाही, पण पूजा नाईकने जर काही दस्तावेज किंवा माहिती पोलिसांनी दिली असेल तर ती माहिती तपासण्यासाठी पोलीस आता त्या अधिकाऱ्यांना बोलावतील का, ते पहावे लागेल. यापूर्वीही या अधिकाऱ्यांचीच नावे पूजाने पोलिसांना दिली होती. पण त्यांना कधीच बोलावण्यात आले नव्हते. त्यामुळे आताही तीच नावे आली आहेत, पण तपासाला योग्य दिशा मिळाली नाही.
मुख्यमंत्र्यांनी घेतलेली भूमिकाही योग्य आहे. या प्रकरणातील पुरावे पूजा नाईक या महिलेने पोलिसांना देणे आवश्यक आहे; ते मुख्यमंत्र्यांना देण्यात काही अर्थ नाही. मंत्री सुदिन ढवळीकर यांनीही या प्रकरणात महत्त्वाचे विधान केले आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कदाचित पूजा नाईक हिने आपला बचाव करण्यासाठीही आरोप केलेले असू शकतात. त्यामुळेच पोलिसांनी हे प्रकरण योग्य पद्धतीने तपासावे, असे त्यांचे म्हणणे आहे. पोलिसांनी पूजा नाईकच्या सांगण्याप्रमाणे आर्थिक देवाण-घेवाण तपासणे गरजेचे आहे. ज्या माणसांकडून पूजाने पैसे घेतले, त्यांचे जबाब घेणे आवश्यक आहे. भलेही अधिकाऱ्यांना किंवा मंत्र्यांना पैसे दिल्याचे पुरावे नसतील, पण आर्थिक व्यवहाराचे काहीतरी धागेदोरे सापडतात का, ते शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. हा तपास कुठेच पोहोचला नाही, तर पुन्हा पुन्हा असे बनाव होत राहतील. देणारे लोक जेव्हा पैसे मागायला जातील, तेव्हा घेणारे आपल्या बचावासाठी अशा प्रकारची विधाने करत राहतील. त्यासाठीच अशा गुन्ह्यांमध्ये पैशांचा वापर कसा आणि कुठे झाला, पैसे दिलेल्या काळात झालेली खरेदी किंवा ते इतरांना दिले असल्यास त्यातील काही सूत्र सापडते का, ते पाहणे गरजेचे आहे. पोलिसांनी एकदा या साऱ्या प्रकरणांचा तपास केला आहे, पण तपास पूर्ण न केल्यामुळे हा गुंता वाढत चालला आहे. या प्रकरणांच्या मुळाशी जाण्यासाठी पैसे गेले कुठे, ते शोधण्याची गरज आहे. त्यानंतरच यातील सत्य बाहेर पडेल. अन्यथा फक्त तोंडी व्यवहार झालेले असतील तर ही बनवाबनवी कधीच समोर येणार नाही.