
सरत्या आठवड्यात बांबोळी उतरणीवर झालेल्या भीषण अपघातात आणखी दोघांचे हकनाक बळी गेले. दररोज कुठे ना, कुठे तरी अपघात घडतो आणि बऱ्याचदा निष्पापांचे बळी जातात. अपघात रोखण्यासाठी उपाययोजना सुरू असल्या तरी त्यांना अपेक्षित यश मिळले नाही. तरीही सध्याच्या उपाययोजना सुरू ठेवण्याबरोबर नवीन उपाययोजनाही राबवाव्या लागतील. निसर्गसौंदर्याने नटलेला आमचा गोवा आता पूर्वीसारखा शांत व सुशेगाद राहिलेला नाही. अपघातांबरोबर चोऱ्या, दरोडे तसेच खुनासारखे प्रकार राजरोसपणे घडत आहेत. दोना पावल येथे काही महिन्यांपूर्वी पडलेल्या दरोड्यानंतर गणेशपुरी - म्हापसा येथे दरोडा पडला. दोन्ही दरोड्यांचा तपास चालू आहे. लहान-मोठ्या चोऱ्या तर होतच आहेत.
गोव्यात वाहनांची संख्या वाढत असल्याने अपघातांची संख्याही बळावत आहे. अपघात होण्याचे प्रकार सर्वस्वी रोखणे अशक्य असले तरी किमान ते नियंत्रणात ठेवणे तरी शक्य आहे. वाहतूक नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याबरोबर जागृती मोहीमही अधिक तीव्र करायला हवी.
मोटारवाहन कायद्यानुसार दुचाकी चालविणाऱ्यांना पूर्वीपासून हेल्मेट सक्तीचे होते, तरीही वीसेक वर्षांपूर्वी बहुतांशी दुचाकीचालक हेल्मेट घालत नव्हते. दोन वर्षांपूर्वी गोवा सरकारने हेल्मेट सक्तीची कार्यवाही कडक केली. हेल्मेट नसल्यास वाहतूक पोलिसांकडून दंड होऊ लागला. बसस्थानक तसेच रस्त्याच्या बाजूला पोलीस दुचाकींवर नजर ठेवू लागले. हेल्मेट नसल्याने दंड ठोठावू लागले. यामुळे आता जवळपास ९५ टक्के दुचाकीचालक हेल्मेट परिधान करतात. अपघातात मरण येणाऱ्या बहुतांशी व्यक्ती या दुचाकीचालक असतात. अपघात झाला की हमखास दुचाकीचालकाचे डोके आपटले जाते. हेल्मेट हे बऱ्याच प्रमाणात डोक्याला संरक्षण देते. यामुळे जीव हवा असल्यास दुचाकीचालकाने हेल्मेट हे वापरायलाच हवे. दुसरे म्हणजे सीटबेल्टचा वापरा. कार चालविताना चालकाने सीट बेल्ट घालणेही कायद्याने बंधनकारक आहे. काही दिवसांपूर्वी हेल्मेटबरोबर सीट बेल्ट न घालणाऱ्या कारचालकालाही दंड होत होता. आता बऱ्याच अंशी कार्यवाही शिथील झालेली आहे. यामुळे सीटबेल्टच्या वापराचे प्रमाण पुन्हा कमी झालेले आहे. वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी सील्टबेल्ट सक्तीच्या कार्यवाहीवर नजर ठेवायला हवी.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बेभरवशाची असल्याने गोव्यात प्रत्येकाला वाहन हे ठेवावेच लागते. यामुळे घरात जितकी माणसे असतात, तितकीच वाहने असतात. यामुळे वाहनांची संख्या जेवढी वाढली आहे, त्या प्रमाणात रस्त्यांची संख्या वाढलेली नाही. रस्त्यांच्या विस्ताराबरोबर महामार्गाची कामेही सुरू आहेत. या कामांमुळेही रस्ते असुरक्षित बनलेले आहेत. सार्वजनिक बांधकाम खाते तसेच कंत्राटदारांनी कामाच्या ठिकाणी योग्य सुरक्षा उपाययोजना करायला हव्यात. सुरक्षा उपाय नसल्याने बरेच अपघात घडलेले आहेत. सध्या पर्वरी ते म्हापसा उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. पूल तसेच उड्डाणपुलाचे काम सुरू असताना त्या मार्गावरील वाहतूक धोकादायक बनते. पोलीस ठेवण्याबरोबर सूचना फलकही योग्य प्रकारे लावावेत. वाहतुकीचे नियम, धोका, रस्ता सुरक्षा या विषयी कायम जागृती व्हायला हवी. विद्यालये, महाविद्यालये तसेच वाहतूक खात्याच्या कार्यालयामध्ये जागृतीचे कार्यक्रम ठेवायला हवेत. जागृतीची मोहीम आणखी तीव्र व्हायला हवी.
- गणेश जावडेकर