कारवार नौदल गुप्तहेरगिरी प्रकरणी आणखी दोन आरोपींना शिक्षा

पाच वर्षांहून अधिक कारावास : गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरविल्याचा आरोप

Story: वार्ताहर। गोवन वार्ता |
2 hours ago
कारवार नौदल गुप्तहेरगिरी प्रकरणी आणखी दोन आरोपींना शिक्षा

जोयडा : कारवार नौदल गुप्तहेरगिरी प्रकरणात आणखी दोन आरोपींना पाच वर्षांहून अधिक कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या दोघांपैकी एकाला कारवार येथील आयएनएस कदंबा नौदल तळावरून अटक करण्यात आली होती, अशी माहिती राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) ने दिली आहे.

विशाखापट्टणम (आंध्रप्रदेश) येथील एनआयए विशेष न्यायालयाने विशाखापट्टणम जिल्ह्यातील कलवलपल्ली कोंडा बाबू आणि हिमाचल प्रदेशातील कांग्रा जिल्ह्यातील अविनाश सोमल या दोघांना पाच वर्षे १० महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. तसेच प्रत्येकी ५,००० दंडही ठोठावला असून, दंड न भरल्यास अतिरिक्त एक वर्षांचा साधा कारावास भोगावा लागेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

या शिक्षेनंतर एकूण सहा आरोपींना या पाकिस्तान-लिंक असलेल्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले. कारवारसह भारतीय नौदलाच्या संवेदनशील तळांवरील गुप्त माहिती परदेशी गुप्तहेरांना पुरविल्याचे उघड झाले आहे.

या दोघांना डिसेंबर २०१९ मध्ये मुंबई आणि कारवार येथून अटक करण्यात आली होती. तपासात उघड झाले की, हे दोघे व्हॉट्सअॅप आणि फेसबुकद्वारे पाकिस्तानी गुप्तहेरांशी संपर्कात होते आणि त्यांनी कारवारमधील नौदल तैनाती, हालचाली, व इतर संवेदनशील माहिती शेअर केली होती.

एनआयएच्या तपासानुसार, या आरोपींनी ही गुप्त माहिती आर्थिक मोबदल्यात पुरवली होती. ही रक्कम त्यांना अब्दुल रहमान, हारून लाकडवाला, शायस्ता कैसर आणि इम्रान गीतेली या आधीच दोषी ठरलेल्या आरोपींकडून पाकिस्तानी एजंटांच्या निर्देशानुसार दिली गेली होती.

एनआयएने हे प्रकरण २०१९ मध्ये आंध्र प्रदेश पोलिसांच्या इंटेलिजन्स विभागाकडून ताब्यात घेतले होते. आतापर्यंत एकूण १५ जणांना अटक झाली असून, जून २०२० मध्ये १४ जणांविरुद्ध आणि मार्च २०२१ मध्ये आणखी एका आरोपीविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.