मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत : सहकार भारतीचे आठवे अधिवेशन पेडणेत उत्साहात

गोवा सहकार भारतीच्या आठव्या अधिवेशनाचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. सोबत राज्यसभा खासदार सदानंद शेठ तानावडे, पांडुरंग कुर्टीकर, दिलीप पाटील, अशोक गावडे, रघुवीर वस्त, आश्विनी पालयेकर.
पेडणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील विकसित भारत आणि विकसित गोवा २०३७ चे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी सहकार भारतीने सहकार्याच्या माध्यमातून प्रयत्न करावेत. यासाठी गोव्याच्या सहकार क्षेत्रात युवक आणि महिला कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये समावेश करावा, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
सहकार भारती गोवाच्या आठव्या अधिवेशनाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. यावेळी राज्यसभा खासदार सदानंद शेठ तानावडे, गोवा राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष पांडुरंग कुर्टीकर, सहकार भारतीचे राष्ट्रीय मंत्री दिलीप पाटील यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, सहकार क्षेत्रात असलेल्या पळवाटा बंद करून सहकाराला नवी दिशा देण्यासाठी सहकार भारतीने पुढाकार घ्यावा. गोव्याच्या सहकाराचा सर्वसामान्य जनतेला कसा फायदा होईल, याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
गोवा राज्य सहकारी संघाच्या मार्फत कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देणे, सहकारी संस्थांचे संगणकीकरण करणे आणि एक खिडकी योजना राबवून सर्व सहकारी संस्थांना एका छताखाली आणणे, ही कामे आगामी काळात करायची आहेत, असेही ते म्हणाले.
राज्यसभा खासदार सदानंद शेठ तानावडे म्हणाले, सहकार क्षेत्रात निस्वार्थीपणे कार्य केल्यास संस्थांची प्रगती निश्चितच होते. महाराष्ट्रातील साखर कारखाने, लिज्जत पापड आणि अमूल डेअरी यांसारख्या संस्था सहकार क्षेत्राचे भूषण आहेत. गोव्यातील सहकार कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून बदल घडवून आणण्यासाठी सज्ज व्हायला हवे. विकसित भारतासाठी सहकार क्षेत्राला पर्याय नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रीय मंत्री दिलीप पाटील यांनी गोव्यात सहकाराचे क्षेत्र मजबूत करण्यासाठी राज्याची सहकार नीती लवकरच घोषित करावी आणि सहकार भारतीला कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी मान्यता द्यावी, अशी मागणी केली.
यावेळी गोव्याच्या सहकार क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या सुभाष हळणकर, महेश आमोणकर, वल्लभ साळकर, डॉ. दत्ताराम देसाई, छाया पै खोत, विठ्ठल वेर्णेकर, श्रीपाद परब यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सहकारातून समृद्धी, विश्वास संपादन करा
मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, सहकारातून समृद्धी घडवणे शक्य आहे आणि सहकारातूनच देशाच्या विकासाचे स्वप्न दृष्टिपथात येऊ शकते. गोव्याच्या सहकार क्षेत्रात विश्वसनीय कामगिरी करून लोकांचा विश्वास संपादन करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी सहकारी संस्थांनी लोकाभिमुख कार्यक्रम आखणे योग्य आहे.