भूमिगत वीज वाहिन्या घातल्यानंतर कुंकळ्ळीतील वीजपुरवठा होणार सुरळीत!

वीजमंत्री सुदिन ढवळीकर : कुंकळ्ळीत चार वीज प्रकल्पांचा शुभारंभ

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
09th November, 11:44 pm
भूमिगत वीज वाहिन्या घातल्यानंतर कुंकळ्ळीतील वीजपुरवठा होणार सुरळीत!

मडगाव : कुंकळ्ळीतील भूमिगत वीज वाहिन्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर येथील वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्या संपुष्टात येतील, अशी माहिती वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिली. त्यांच्या हस्ते कुंकळ्ळीतील भूमिगत वीजवाहिन्यांच्या चार कामांचे उद्घाटन झाले.
कुंकळ्ळी मतदारसंघातील भूमिगत वीजवाहिन्यांची कामे हाती घेण्यात आली होती. त्यातील कुंकळ्ळी फिडर, माळंगिणी फिडर, धर्मापूर फिडर व चिंचणी फिडरवरील ११ केव्ही भूमिगत वीजवाहिनी नेटवर्कची कामे पूर्ण झाली होती. या कामांचा शुभारंभ वीजमंत्री ढवळीकर यांच्या हस्ते झाला. यावेळी विरोधी पक्षनेते तथा आमदार युरी आलेमाव, कुंकळ्ळी पालिका नगराध्यक्ष लँड्री मास्कारेन्हस, वीज खात्याचे अधीक्षक अभियंता राजीव सामंत यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
आमदार युरी आलेमाव यांनी सांगितले की, या कुंकळ्ळी, माळंगिणी, धर्मापूर, चिंचणीतील फिडरवरील प्रकल्पांचा सुमारे ७ हजार वीज ग्राहकांना फायदा होणार आहे. या भूमिगत वीजवाहिन्यांच्या कामांवेळी लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. रस्ते खोदण्यात आले होते मात्र, बांधकामाच्या कामादरम्यान लोकांनी दाखवलेल्या संयमाचे कौतुकच केले पाहिजे. या प्रकल्पांमुळे वीज पुरवठ्यातील अनियमितपणा दूर करून सुरळीत वीजपुरवठा सुनिश्चित केला जाईल. पावसाळ्यात ओव्हरहेड वीज वाहिन्यांवर अनेकदा झाडे पडल्यामुळे वीज पुरवठा विस्कळीत होतो. आता या प्रकल्पांमुळे यातून दिलासा मिळेल, असे ते म्हणाले.
ग्रीन एनर्जीत गोवा देशाला आदर्श बनू शकतो
मंत्री ढवळीकर यांनी सांगितले की, कुंकळ्ळी परिसरातील वीज पुरवठ्याच्या सर्व समस्या सोडवल्या जातील आणि आलेमाव यांनी दिलेल्या उर्वरित प्रस्तावांवरही अंमलबजावणी केली जाईल. लोकांनी हरित ऊर्जेचा पर्याय निवडण्यास प्राधान्य द्यावे. ग्रीन एनर्जीच्या माध्यमातून गोवा वीज क्षेत्रात देशासाठी आदर्श बनू शकतो, असे ढवळीकर यांनी नमूद केले.

हेही वाचा