पुणे हादरले ! 'दृश्यम' पाहून केला पत्नीचा खून! मृतदेह भट्टीत जाळला, बेपत्ता झाल्याचा बनाव रचला

चारवेळा चित्रपट पाहिला, पूर्वनियोजित कट रचला-अखेर असे बिंग फुटले!

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
पुणे हादरले ! 'दृश्यम' पाहून केला पत्नीचा खून! मृतदेह भट्टीत जाळला, बेपत्ता झाल्याचा बनाव रचला

पुणे : एका अत्यंत थंड डोक्याने आणि पूर्वनियोजनाने केलेल्या हत्येमुळे पुणे शहर हादरले आहे. चारित्र्याच्या संशयातून एका पतीने आपल्या शिक्षिका असलेल्या पत्नीचा गळा आवळून खून केला. इतकेच नाही, तर पुरावा पूर्णपणे नष्ट करण्याच्या हेतूने त्याने मृतदेह खास तयार केलेल्या लोखंडी भट्टीत जाळला आणि ती राख नदीत फेकून दिली. संपूर्ण गुन्ह्याचा घटनाक्रम एखाद्या थ्रिलर चित्रपटाला साजेसा असाच आहे. विशेष म्हणजे खुद्द आरोपी पतीनेच पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. मात्र, वारजे पोलिसांनी 'दृश्यम' स्टाईलने तपास करत या हत्येचा पर्दाफाश केला आणि आरोपीला बेड्या ठोकल्या.

चारित्र्याच्या संशयातून रचला कट

खून झालेल्या महिलेचे नाव अंजली समीर जाधव (वय ३८, रा. शिवणे) असून, त्या एका खासगी शाळेत शिक्षिका होत्या. पोलिसांनी त्यांचा पती समीर पंजाबराव जाधव (वय ४२) याला अटक केली आहे. फॅब्रिकेशनचे काम करणाऱ्या समीरला पत्नी अंजलीचे एका व्यक्तीसोबत प्रेमप्रकरण सुरू असल्याचा संशय होता. व्हॉट्सॲप चॅटिंगवरून झालेल्या वादातून त्याने पत्नीचा खून करण्याचा क्रूर कट रचला.

गोडाऊन भाड्याने घेतले, भट्टीची केली तयारी

समीरने पत्नीचा काटा काढण्याची पूर्ण तयारी आधीच केली होती. खून करण्यासाठी त्याने मुंबई-बंगळूरू बाह्यवळण मार्गावरील खेड शिवापूरजवळील गोगलवाडी फाट्याजवळ १८ हजार रुपये मासिक भाड्याने एक गोडाऊन घेतले. दोघांना दोन मुले आहेत. दिवाळीच्या निमित्ताने ते मूळ गावी जाऊन परतले होते.

खून करण्याच्या दिवशी, २६ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता समीर पत्नीला फिरायला जाण्याच्या बहाण्याने मोटारीतून घेऊन गेला. मरीआई घाटाजवळ फिरून परतत असताना, रात्री आठ वाजता दोघे गोडाऊनमध्ये आले. चटईवर भेळ खात असताना, समीरने अंजलीचा गळा आवळला आणि ती मेल्याची खात्री केली. त्याने अगोदरच गोडाऊनमध्ये लाकुड सरपण आणि एक लोखंडी भट्टी तयार ठेवली होती. समीरने मृतदेह त्या भट्टीत टाकला, त्यावर पेट्रोल टाकले आणि आग लावली. रात्री दहाच्या सुमारास मृतदेह पूर्णपणे जळून खाक झाला. भट्टी थंड झाल्यावर पहाटेच्या वेळी त्याने अंजलीची राख जवळच्या नदीत फेकून दिली. इतकेच नव्हे, तर दुसऱ्या दिवशी वापरलेल्या विटा फोडून टाकल्या आणि जी लोखंडी भट्टी तयार केली होती, ती स्क्रॅपमध्ये विकून नष्ट करून टाकली.

'दृश्यम' पाहून घेतली खबरदारी

समीरने पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी चित्रपटातून प्रेरणा घेतल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी सांगितले की, अंजलीचा खून करण्यापूर्वी समीरने प्रसिद्ध थ्रिलर चित्रपट 'दृश्यम' चारवेळा पाहिला होता. यामुळेच पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने कोणतीही कसर सोडली नाही.

असा फुटला 'समीर'चा बनाव

पुरावा नष्ट केल्यानंतर दोन दिवसांनी समीरने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात जाऊन आपली पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. या प्रकरणाची हद्द राजगड पोलिसांची असल्याने तक्रार तिकडे वर्ग करण्यात आली.

परंतु, वारजे माळवाडीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजित काईंगडे यांना समीरच्या वागणुकीत संशय जाणवला. समीर वारंवार पोलीस ठाण्यात येऊन पत्नीचा शोध कधी घेणार, अशी चौकशी करत होता. काईंगडे आणि त्यांच्या पथकाने ही तक्रार राजगडकडे वर्ग केल्यानंतरही तपास सुरू ठेवला. त्यांनी समीरचे तांत्रिक विश्लेषण केले, सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि त्याच्या माहितीत असलेली विसंगती ओळखली. दोघांना एकत्र बाहेर पडतानाचे फुटेज पोलिसांना मिळाले. याच दरम्यान, पोलिसांनी समीरच्या मैत्रिणीला ताब्यात घेतले आणि खाक्या दाखवताच, समीरने पत्नीचा खून केल्याची कबुली दिली.

हेही वाचा