काँग्रेसचे आमदार सतीश सैल यांची गोव्यातील २१ कोटींची मालमत्ता 'ईडी'कडून तात्पुरती जप्त

बेळ्ळिकेरी अवैध खाण घोटाळाप्रकरणी मनी लॉन्ड्रिंग कायद्यान्वये कारवाई

Story: वेब डेस्क | गोवन वार्ता |
3 hours ago
काँग्रेसचे आमदार सतीश सैल यांची गोव्यातील २१ कोटींची मालमत्ता 'ईडी'कडून तात्पुरती जप्त

पणजी: बेळ्ळिकेरी येथील बेकायदेशीर लोहखनिज निर्यातीशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मोठी कारवाई केली आहे. ईडीने कर्नाटक राज्यातील कारवारचे आमदार सतीश कृष्णा सैल आणि इतरांशी संबंधित तब्बल २१ कोटी रुपये किमतीची स्थावर मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे.

बेळ्ळिकेरी घोटाळ्याशी कनेक्शन

ईडीने दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेली मालमत्ता गोवास्थित असलेल्या मेसर्स श्री मल्लिकार्जुन शिपिंग प्रा. लि. (SMSPL) कंपनीच्या नावावर आहे आणि या कंपनीचे मालक आमदार सतीश सैल आहेत. हे प्रकरण २०१० मध्ये बेळ्ळिकेरी बंदरात उघडकीस आलेल्या अवैध खाणकाम आणि लोहखनिज निर्यातीशी जोडलेले आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

२०१० मध्ये कर्नाटक वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बेळ्ळिकेरी बंदराला भेट दिली असता, त्यांना खाण आणि भूगर्भ विभाग तसेच वन विभागाचे वैध परवाने नसलेला मोठ्या प्रमाणात लोहखनिजाचा साठा आढळला होता. त्यावेळी सुमारे ५ लाख मेट्रिक टन लोहखनिजाचा साठा जप्त करण्यात आला होता.

ईडीच्या तपासानुसार, एसएमएसपीएलचे व्यवस्थापकीय संचालक (MD) असलेले सतीश सैल यांनी विविध पुरवठादारांकडून जप्त केलेला सुमारे १.५४ लाख मेट्रिक टन लोहखनिज खरेदी केल्याचा दावा केला होता. मात्र, त्यांनी पोर्ट कंझर्व्हेटरच्या संगनमताने, हे अवैध लोहखनिज जहाजे (MV Columbia आणि MV Mandarin Harvest) वापरून बेकायदेशीरपणे चीनला निर्यात केले. गुन्हेगारीतून मिळालेले हे पैसे लपवण्यासाठी (Layering) आमदार सैल यांनी हाँगकाँगमध्ये एक कंपनी उघडून व्यवहारांचे जाळे विणल्याचा आरोप ईडीने ठेवला आहे.

गोव्यातील मालमत्ता जप्त

या कारवाईत ईडीने जप्त केलेली मालमत्ता प्रामुख्याने गोव्यात आहे. या मालमत्तेची किंमत, बाजारमूल्यानुसार सुमारे ६४ कोटी रुपये आहे:

  • * चिखली (मुरगाव) गावात १२,५०० चौरस मीटर जमीन.
  • * मुरगाव तालुक्यात 'पेड्रो गॅले कॉट्टा' नावाने ओळखली जाणारी १६,८५० चौरस मीटर शेतजमीन.
  • * वास्को येथील कदंब बसस्थानकासमोर असलेल्या 'अवर लेडी ऑफ मर्सिस बिल्डिंग'मधील पहिल्या ते पाचव्या मजल्यावरील व्यापारी जागा (Commercial Premises).

यापूर्वी ईडीने कर्नाटक, गोवा, दिल्ली आणि मुंबईत १५ ठिकाणी छापे टाकले होते. त्यावेळी आमदार सैल यांना अटक करण्यात आली होती, तसेच त्यांच्याकडून ८ कोटी रुपये किमतीची रोकड आणि सोने जप्त करण्यात आले होते. दरम्यान, त्यांना मिळालेला वैद्यकीय जामीन ७ नोव्हेंबर २०२५ रोजी विशेष न्यायालयाने रद्द केला आहे. ईडीच्या बंगळूरु विभागीय कार्यालयाने ही कारवाई केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा