म्हणाले - मंत्री असो वा अधिकारी, तपासात तथ्य आढळल्यास कठोर कारवाई होणार

पेडणे: गोव्यातील सरकारी नोकरभरतीसाठी पैसे घेतल्याचा मोठा घोटाळा आणि त्यातील मुख्य संशयित पूजा नाईक हिने थेट मंत्री आणि आयएएस अधिकाऱ्यांवर केलेल्या गंभीर आरोपांनंतर, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. पूजा नाईक यांनी सार्वजनिक ठिकाणी विधान करण्याऐवजी, पुराव्यासह तपास यंत्रणांकडे जावे, अशी स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे. पेडणे येथे सहकार संमेलनासाठी आले असता, पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना या घोटाळ्यासंबंधी प्रश्न विचारले.
मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका:
पूजा नाईक हिने केलेले आरोप गंभीर आहेत. आपल्याकडे येऊन माहिती देण्याऐवजी किंवा ज्यांची नावे घ्यायची आहेत, ती माझ्याकडे देण्याची गरज नाही. त्यांनी थेट तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांकडे जाऊन सविस्तर माहिती द्यावी असे मुख्यमंत्री म्हणाले.
मंत्री असो वा अधिकारी, गय केली जाणार नाही
डॉ. सावंत यांनी कठोर कारवाईचे आश्वासन देताना सांगितले की, पूजा नाईक यांनी जे आरोप केले आहेत, त्यात तथ्य आढळल्यास, कोणताही मंत्री असो किंवा अधिकारी, सर्वांवर कठोर कारवाई केली जाईल. जर तिने ज्यांची नावे घेतली आहेत, त्यात एखाद्या मंत्र्याचेही नाव असेल आणि तपासात तथ्य सिद्ध झाले, तर आमचे सरकार संबंधितांवर कडक कारवाई करेल आणि गय केली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
तत्काळ एफआयआर नोंद करण्याचे निर्देश
मुख्यमंत्र्यांनी पोलिसांनाही तातडीने कारवाईचे संकेत दिले. पूजा नाईक यांनी केलेल्या आरोपात जर तथ्य असेल, तर आपण पोलिसांना पुन्हा एकदा बोलावून एफआयआर (FIR) नोंद करून घेतो आणि पूर्ण चौकशी करण्याचे आदेशही देतो, असे डॉ. सावंत म्हणाले.
काय आहे पूजा नाईकचा आरोप?
२०१९ पासून चर्चेत असलेल्या कथित नोकरभरती घोटाळ्यातील संशयित पूजा नाईक हिने नुकताच एका प्रुडंट मीडियाशी बोलताना धक्कादायक खुलासा केला होता. तिने एका मंत्र्याला, एका आयएएस अधिकाऱ्याला आणि सार्वजनिक बांधकाम खात्यातील एका वरिष्ठ अभियंत्याला नोकऱ्यांसाठी पैसे जमवून दिल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यांनी २४ तासांत पैसे परत न केल्यास पुराव्यासह मुख्यमंत्र्यांना माहिती देण्याचा इशाराही तिने दिला होता. या संपूर्ण प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा कोणताही संबंध नसल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले असले, तरी या ताज्या आरोपांमुळे गोव्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.