रायगडमधून एकाला अटक; ९ राज्यांतील ७.४७ कोटींच्या घोटाळ्याचे कनेक्शन उघड

पणजी: गोव्याच्या सायबर गुन्हे पोलिसांनी एका मोठ्या सायबर फसवणूक प्रकरणाचा छडा लावत एका तब्बल ९ राज्यांत पसरलेल्या गुन्हेगारी सिंडीकेटचा पर्दाफाश केला आहे. दक्षिण गोव्यातील कांसावली येथील रहिवासी असलेल्या एका नागरिकाला 'डिजिटल अटक' करण्याची भीती दाखवून आरोपींनी तब्बल २ कोटी ८० लाख रुपयांची फसवणूक केली होती.
याप्रकरणी १६ ऑक्टोबर रोजी तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS Act 2023) आणि आयटी ॲक्ट अंतर्गत गुन्हे नोंदवले.
नेमका काय होता घोटाळा?
गुन्हा दाखल केलेल्या तक्रारदाराला ४ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत दोन वेगवेगळ्या व्हॉट्सॲप क्रमांकांवरून मेसेज आले. संशयितांनी स्वतःला ईडी (ED) अधिकारी भासवले आणि तक्रारदाराचे आधार कार्ड मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात वापरले गेल्याचे सांगितले/
या भीतीमुळे तक्रारदाराला आरोपींनी घरातच 'हाऊस अरेस्ट' करून बाहेर न पडण्याचे निर्देश दिले आणि हे प्रकरण मिटवण्यासाठी दबाव आणला. घाबरलेल्या तक्रारदाराने चार वेगवेगळ्या RTGS व्यवहारांद्वारे एकूण २ कोटी ८० लाख रुपये आरोपींच्या बँक खात्यात हस्तांतरित केले.
रायगडमधून झाली अटक
गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी सायबर क्राईम पोलिसांनी तांत्रिक आणि आर्थिक विश्लेषणाद्वारे कसून तपास सुरू केला. पोलीस उपनिरीक्षक मनीष दाभाळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तपासाचे धागेदोरे मिळवले आणि महाराष्ट्रातील रायगडपर्यंत पोहोचले. दिवाकर वरुण झा (वय ३०, रा. ताळोजी माजकूर, रायगड) या आरोपीला पोलिसांनी अटक केली.
९ राज्यांतील घोटाळ्याचे कनेक्शन
चौकशीत एक धक्कादायक माहिती उघड झाली आहे. अटक केलेल्या आरोपी दिवाकर झा याच्या बँक खात्यात फसवणुकीची ५० लाख रुपयांची रक्कम जमा झाली होती, जी त्याने लगेचच आपल्या साथीदारांच्या अनेक खात्यांमध्ये वळवली होती. विशेष म्हणजे, हे एकच बँक खाते गोवा व्यतिरिक्त मध्य प्रदेश, राजस्थान, आंध्र प्रदेश, बिहार, मिझोराम, तामिळनाडू, तेलंगणा आणि गुजरात अशा ९ राज्यांमधील ११ अन्य सायबर फसवणूक प्रकरणांशी जोडलेले आहे! या सर्व प्रकरणांची एकत्रित फसवणूक रक्कम ७ कोटी ४७ लाख रुपये इतकी आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असून, त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सायबर गुन्हे पोलीस या घोटाळ्याचा सखोल तपास करत आहेत.
उत्तर गोवा पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता, सहाय्यक अधीक्षक बीव्ही श्रीदेवी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सायबर गुन्हे पोलीस स्थानकाचे निरीक्षक दीपक पेडणेकर यांच्या नेतृत्त्वाखाली पथकाने उपनिरीक्षक मनीष दाभाळे व पथकाने या प्रकरणाचा छडा लावला.