टँकर-कारच्या भीषण धडकेत 'सेपक टाक्रॉ' असोसिएशनचे अध्यक्ष ठार; मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडून उपाययोजना करण्याचे निर्देश

पणजी: गोव्यातील पणजी-मडगाव राष्ट्रीय महामार्गावरील बांबोळी पट्टा सध्या अपघातांचे केंद्रस्थान बनले आहे. गेल्या केवळ पाच दिवसांच्या कालावधीत याच मार्गावर तीन मोठे अपघात घडले असून, यात दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बांबोळीतील नियाझ रेस्टॉरंटजवळील उतारावर हे अपघात वारंवार घडत असल्याने या भागातील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
टँकर-कारची भीषण धडक
अपघातांची ही मालिका मंगळवारी उत्तर रात्री १ वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण घटनेने सुरू झाली. उतारावर टँकर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे तो दुभाजक तोडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या 'रेंट अ कॅब'ला धडकला. ही टक्कर इतकी भीषण होती की, कारचा चक्काचूर झाला.

या अपघातात 'रेंट अ कॅब'मधील चालकासह दोघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये ऑल इंडिया सेपक टाक्रॉ असोसिएशनचे अध्यक्ष योगेंद्र सिंग आणि खेळाडू अंकित कुमार बलियान यांचा समावेश आहे. जुने गोवे पोलिसांनी टँकर चालक राहुल सर्वदे याच्यावर गुन्हा नोंदवून त्याला ताब्यात घेतले आहे.
उपाययोजनांचे निर्देश देऊनही अपघात सुरू
हा भीषण अपघात ताझा असतानाच, बांबोळी येथे ६ नोव्हेंबर रोजी पुन्हा एक अपघात झाला. भरधाव वेगात असलेला मासळीवाहू कंटेनर (Fish Container) भरकटला आणि तो दुभाजकाला धडकला. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही.

अपघातांची वाढती संख्या पाहून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी वाहतूक पोलीस अधीक्षक आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली. बांबोळी येथे महामार्गावर याच पट्ट्यात अनेक अपघात झाले आहेत. रोड इंजिनिअरिंगचा अभ्यास करून आवश्यक त्या सुधारणा करण्याचे तसेच बॅरिकेड्स वगैरे लावण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली होती.

मात्र, मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतरही अपघातांचे शुक्लकाष्ठ थांबले नाही. काल ८ नोव्हेंबर रात्री १० वाजण्याच्या सुमारास याच अपघातप्रवण ठिकाणी पुन्हा एकदा कार आणि ट्रकची धडक झाली. गेल्या पाच दिवसांतील ही तिसरी घटना होती. सुदैवाने या शेवटच्या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. बांबोळी महामार्गावरील या वाढत्या अपघातांमुळे या भागातील रस्ते सुरक्षा उपाययोजना आणि 'रोड इंजिनिअरिंग'च्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.