मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर क्राईम ब्रांचकडून चौकशी

चाैकशीसाठी पोलीस स्थानकात आलेली संशयित पूजा नाईक.
न्यूज डेस्क। गोवन वार्ता
पणजी : नोकरीसाठी पैसे देण्याच्या घोटाळ्यातील प्रमुख संशयित पूजा नाईक हिची गुन्हा शाखेने रविवारी चार तास कसून चौकशी केली. आवश्यकता भासल्यास या प्रकरणी पुन्हा गुन्हा नोंदवून तपास करण्याची तयारी मुख्यमंत्र्यांनी दर्शविल्यानंतर पूजाची रविवारी चौकशी करण्यात आली. चौकशीसाठी तिला पुन्हा समन्स जारी होण्याची शक्यता आहे.
दोन दिवसांपूर्वी पूजा नाईक हिने नोकरी देण्यासाठी मंत्री, आयएएस अधिकारी, तसेच अभियंत्याला पैसे दिल्याचा आरोप केला होता. पैसे परत दिले नाहीत, तर नावे जाहीर करण्याचा इशाराही तिने दिला होता. या पार्श्वभूमीवर पूजा नाईकची रविवारी गुन्हा शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांकडून चार तास चौकशी करण्यात आली.
नोकरीसाठी पैसे देण्याच्या प्रकरणातील संशयित पूजा नाईकने प्रुडंट मीडियाशी बोलताना धक्कादायक खुलासा केला होता. तिने एका मंत्र्याला, एका आयएएस अधिकाऱ्याला आणि सार्वजनिक बांधकाम खात्यातील वरिष्ठ अभियंत्याला नोकऱ्यांसाठी पैसे दिल्याचे म्हटले होते. त्यांनी २४ तासांत पैसे परत न केल्यास पुराव्यासह मुख्यमंत्र्यांना माहिती देण्याचा इशारा दिला होता. ताज्या आरोपांमुळे राजकारणात पुन्हा खळबळ उडाली आहे.