ऑटिझमसोबत जगणे

ऑटिझम हे केवळ एक वेगळेपण नाही, तर जगाकडे पाहण्याचा एक अद्भुत दृष्टिकोन आहे. हे इंद्रधनुष्याच्या रंगांसारखे आहे; प्रत्येक व्यक्ती वेगळी, पण अर्थपूर्ण. ऑटिझम विश्व समजून घेणे, म्हणजे 'सामान्य' या संकल्पनेला आव्हान देणे आहे.

Story: मनी मानसी |
07th November, 10:28 pm
ऑटिझमसोबत जगणे

कधी वाटलं आहे का, आपल्या आजूबाजूचं जग एका वेगळ्याच भाषेत बोलतंय? आपण शब्दांनी व्यक्त होतो, पण काहीजण नजरेच्या शांततेत, हाताच्या हालचालीत आणि अंतर्मनाच्या रेशांतून बोलतात. त्यांचं जग रंगांनी भरलेलं असतं, फक्त त्या रंगांची 'पॅलेट' आपल्यासारखी नसते. हेच जग म्हणजे ऑटिझमचं विश्व.

ऑटिझम म्हणजे नेमकं काय?

हा एक न्यूरो-डेव्हलपमेंटल डिसऑर्डर आहे,  म्हणजेच मानवी मेंदूच्या विकासातील एक वेगळेपण ज्यात भाषेचं, सामाजिक वर्तणुकीचं आणि भावनिक सामंजस्याचं नाजूक संतुलन सर्वसामान्यांपेक्षा जरा वेगळ्या रीतीने घडलेलं असतं. त्यांच्या जगाचं चित्रण आपल्यासारखं नाही; ते रंग, आवाज, स्पर्श, संवाद, सगळं थोड्या वेगळ्या दृष्टिकोनातून अनुभवतात. पण ही वेगळेपणाची ओळख म्हणजे दोष नाही, तर ती एक वेगळी रचना आहे, जी ‘सामान्य' या संकल्पनेलाच नव्याने वाचा फोडते.

एका ठराविक चौकटीत न बसणाऱ्या या ऑटिझमला “स्पेक्ट्रम” असं म्हटलं जातं, कारण ऑटिझम म्हणजे एक श्रेणी नव्हे, तर इंद्रधनुष्याच्या विस्तृत रंगांसारखा असतो. जिथे प्रत्येकाचा रंग वेगळा, पण प्रत्येक रंग अर्थपूर्ण होय:

  'अॅस्पर्जर सिंड्रोम' [Asperger’s Syndrome] असलेल्या मुलांमध्ये बुद्धिमत्ता आणि शब्दसंपदा अफाट असते, पण सामाजिक नात्यांमध्ये थोडी अस्वस्थता दिसते.

  'मॉडरेट ऑटिझम' [Moderate Autism] मध्ये संवाद मर्यादित असतो, पण काही विशिष्ट विषयांवर त्यांची लक्ष केंद्रित करण्याची क्षमता आश्चर्यकारक असते.

  'क्रॉनिक ऑटिझम' [Chronic Autism] मध्ये संवेदनांची तीव्रता इतकी जास्त असते की, सामान्य जग त्यांना कधीकधी अतिशय गोंगाटी वाटू शकतं.

ऑटिस्टिक मुलांचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन विलक्षण वेगळा असतो. जणू शब्दांपेक्षा आवाजांचे, चेहऱ्यांपेक्षा भावनांचे विश्लेषण करणारा! काही मुलांना 'पॅटर्न्स'ची अप्रतिम समज असते, काही गणितात तरबेज असतात, तर काही संगीताच्या प्रत्येक सुरात अर्थ शोधतात.

माझ्या मानसशास्त्रीय 'इंटर्नशिप'च्या वेळेस घडलेला एका शाळेतला अनुभव सांगते. एक छोटा मुलगा, जो अबोल असे. त्याला 'मॉडरेट ऑटिझम' असल्याचे निदान झाले होते, पण तो दररोज वर्गातल्या खिडकीवर एक छोटा 'डॉट' काढायचा. शिक्षकांनी विचारलं, “का?” त्याने काहीच उत्तर दिलं नाही; महिन्याभरानंतर लक्षात आलं की त्या 'डॉट'चा 'पॅटर्न' सूर्याच्या हालचालींसारखा होता! त्याच्या त्या लहानशा कृतीत विश्वाचं गणित होतं! आहे की नाही गंमत?

ऑटिझम असलेल्यांचे विचार, संवेदना आणि निरीक्षणे आपल्याला “वेगळी” वाटतात, पण खरं सांगू? मला कधीकधी वाटतं, कदाचित आपणच त्यांच्यासारखं जग पाहायला कधी शिकलोच नाही.

ह्या दरम्यान हे देखील एक सत्यच आहे की, या मुलांचे दैनंदिन जगणे थोडे अधिक आव्हानात्मक असते. म्हणूनच त्यांना “विशेष गरजा” म्हणतात, कारण त्यांच्या शिकण्याच्या, समजण्याच्या आणि जगण्याच्या गरजा सामान्य चौकटींपेक्षा वेगळ्या असतात, ज्यामुळे त्यांना त्यांच्या समजूतीनुसार दैनंदिन गोष्टी शिकवणे अत्यावश्यक असते. परंतु, ह्यात लक्षात घेण्यायोग्य बाब ही की, ‘विशेष’ या शब्दात करुणा नाही, तर त्यांच्या याच अलौकिक वेगळेपणाचा सन्मान आहे.

मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिलं तर, ऑटिझम हा काही दोष नव्हे, फक्त एक फरक आहे. आणि त्या फरकाला समजून घेणं आणि स्वीकारणं, हे आपल्या समाजाचं कर्तव्य आहे. त्यांचं जग रेषा आखून चालतं जे एकवेळ आपल्याला एकसुरी वाटेल, पण त्या रेषांच्या मधे त्यांनी शोधलेली शांतता म्हणजेच खरं जीवनानुभवाचं संगीत असतं.

आपल्या गोव्यातही अशा विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे, पण त्याचबरोबर जागरूकताही वाढत आहे. राज्यभरातील अनेक शाळा व संस्था या विशेष शिक्षणाची जबाबदारी अगदी लीलया पार पाडत आहेत. उदा. दिशा स्कूल, संजय सेंटर 'फॉर स्पेशल एज्युकेशन' , सेतु ट्रस्ट, केशव सेवा साधना यांसारख्या अनेक उत्तमोत्तम संस्था हे काम प्रेमाने करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाने अनेक ऑटिस्टिक विद्यार्थी केवळ शिक्षणच नव्हे, तर व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करून स्वावलंबी जीवन देखील जगत आहेत, जसे चित्रकला, संगणकशास्त्र, बेकरी, डिजिटल डिझाईन इ.

शासनातर्फे आयोजित ‘पर्पल फेस्ट’ सारख्या वार्षिक उपक्रमांनी या मुलांना आणि त्यांच्या कुटुंबांनासुद्धा एक मंच मिळतो, जिथे त्यांचं “वेगळं असणं” हे साजरं केलं जातं. संगीत, नृत्य, चित्रकला, नाट्य, प्रत्येक क्षेत्रात या मुलांच्या अभिव्यक्तीचा उत्सव असतो, जो दाखवतो की ‘समावेशन’ ('inclusion') हे फक्त धोरण नाही, ती भावना आहे. ऑटिस्टिक व्यक्तींना त्यांच्या क्षमतांच्या रंगांनी रंगवण्यासाठी समाज तयार होत आहे, हीच खरी प्रगती आहे.

हो, ऑटिझमसोबतचं जीवन सहज होऊ शकतं, जर आपण ‘ठरवलेलं सामान्यपण’ सोडून दिलं तर. कारण सामान्यतेचं परिमाण समाजाने बनवलं आहे, माणसाने नाही. आणि जो समाज या चौकटींपलीकडे पाहायला शिकतो, तोच खऱ्या अर्थाने संवेदनशील ठरतो.

या प्रवासाचा दुसरा भाग पुढील आठवड्यात आपण वाचू, जिथे आपण या मुलांच्या पालकांच्या, भावंडांच्या आणि त्यांचे सावलीसारखे आधार बनलेले शिक्षकांच्या जगात डोकावू, जे दररोज या ‘वेगळ्या’ विश्वाशी नवं नातं विणत असतात.


- मानसी कोपरे

मानसोपचारतज्ज्ञ व समुपदेशक

डिचोली - गोवा 

७८२१९३४८९४