स्तनपान हा आई आणि बाळाच्या नात्यातील महत्त्वाचा टप्पा आहे, पण बाळाच्या वाढीनुसार ते हळूहळू बंद करणे आवश्यक आहे. ही विनिंग प्रक्रिया हळूवार, नियोजनबद्ध आणि प्रेमळ असल्यास आई व बाळाचे आरोग्य जपले जाते.

स्तनपान हे आई आणि बाळाच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचे आणि पवित्र नाते असते. आईचे दूध हे बाळासाठी संपूर्ण आणि सर्वोत्तम अन्न असते, ज्यामध्ये पोषक घटक, जीवनसत्त्वे आणि रोगप्रतिकारक तत्त्वे विपुल प्रमाणात असतात. स्तनपानामुळे बाळाचा शारीरिक, मानसिक आणि भावनिक विकास साधला जातो.
जागतिक आरोग्य संघटना आणि इतर आरोग्य संस्थांनुसार बाळाच्या जन्मानंतर किमान ६ महिने केवळ स्तनपान देण्याची शिफारस केली आहे, त्यानंतर २ वर्षांपर्यंत योग्य पूरक अन्नांसह स्तनपान चालू ठेवण्याची शिफारस केली आहे. पण बाळ जसजसे वाढत जाते आणि सहा महिन्यांनंतर घन आहाराकडे वळण्याची वेळ येते, तसतसे स्तनपान हळूहळू बंद करण्याची गरज निर्माण होते. या प्रक्रियेला ‘वीनींग’ किंवा स्तनपान बंद करणे असे म्हटले जाते.
वीनींग प्रक्रिया नैसर्गिक असली तरी ती अनेक अडचणींनी आणि आव्हानांनी भरलेली असते. प्रथम आपण बाळाच्या भावनिक आणि वर्तनात्मक अडचणींचा विचार करूया. बाळाला आईच्या स्तनाशी अतिशय जवळीक असते. केवळ अन्न घेण्यासाठी नव्हे तर सुरक्षितता, प्रेम आणि आश्वासन मिळवण्याचे कार्य हे स्तनपानाद्वारे होते. त्यामुळे स्तनपान बंद करताना बाळाला मानसिक अस्थिरता जाणवते. बाळ अस्वस्थ होते, वारंवार रडते, झोपेचा त्रास होतो आणि कधी कधी यादरम्यान खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष होऊ शकते. नवीन आहार स्वीकारणेही अनेकदा कठीण जाते. काही वेळा पचनाचे त्रास, बद्धकोष्ठता किंवा अतिसार यांसारख्या समस्या निर्माण होतात.
आईलाही अनेक शारीरिक आणि भावनिक अडचणींचा सामना करावा लागतो. अचानक स्तनपान थांबवल्याने स्तनात दूध साचते, ज्यामुळे सूज, वेदना, गाठी किंवा स्तनदाह (मास्टायटीस) होऊ शकतो. हार्मोन्समध्ये होणारे बदल आईच्या मनःस्थितीवर परिणाम करतात, त्यामुळे तिला चिडचिड, थकवा किंवा भावनिक ताण जाणवतो. बाळ अजून लहान असेल किंवा स्तनपानावर खूपच अवलंबून असेल अशा परिस्थितीत काही कारणांमुळे महिलांना स्तनपान थांबवताना अपराधीपणा किंवा दु:खही वाटते.
सामाजिक आणि सांस्कृतिक घटक देखील या प्रक्रियेला प्रभावित करतात. काही वेळा कुटुंबातील सदस्यांकडून किंवा समाजाकडून मिळणारे परस्परविरोधी सल्ले आईला गोंधळात टाकतात. आईची गर्भधारणा, आईपासून दीर्घकाळ वेगळे राहणे, दूध येण्यास त्रास, काहीजणींना कामावर पुन्हा जाण्याची गरज असल्यामुळे किंवा इतर काही वैद्यकीय कारणांमुळे स्तनपान अचानक थांबवावे लागते, ज्यामुळे मानसिक ताण वाढतो.
मुलाचे स्तनपान थांबवणे कठीण दिसत असले तरी पूर्णपणे नक्कीच शक्य असते. बहुतेक मुले मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या तयार झालेली असतात. येऊ शकणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी स्तनपान बंद करण्याची प्रक्रिया हळूहळू, नियोजनपूर्वक आणि संवेदनशील पद्धतीने पार पाडणे अत्यंत आवश्यक असते. अशा वेळेस पुढील गोष्टी महत्त्वाच्या असतात.
१. हळूहळू कमी करणे हा सर्वात प्रभावी आणि कमी त्रासदायक मार्ग:
पहिली पायरी: दिवसातील एक ठराविक फीड (उदा. दुपारच्या झोपेपूर्वीची) कमी करा. त्या वेळेला बाळाला खेळ, फिरायला नेणे, गोष्ट सांगणे किंवा आवडता खाऊ देणे अशा गोष्टींमध्ये व्यस्त ठेवा.
दुसरी पायरी: काही दिवसांनी आणखी एक फीड बंद करा (उदा. सकाळचा किंवा रात्रीचा). दिवसांमध्ये बाळाला भरपूर प्रेम, मिठ्या आणि जवळ घेऊन राहा, जेणेकरून त्याला भावनिक सुरक्षितता वाटेल.
तिसरी पायरी: शेवटचा फीड (बहुतेक वेळा रात्रीचा असतो) बंद करण्यापूर्वी काही आठवडे थांबा. त्या वेळी झोपवण्यासाठी गोष्ट सांगणे, गाणे म्हणणे, पाठीवरून हात फिरवणे यांसारख्या नव्या सवयी आणा.
२. बाळाला समजावणे :
दोन वर्षांच्या आसपासची मुले समजूतदार असतात. त्यांना हळुवारपणे सांगा, “आता तू मोठा/मोठी झाला/झाली आहेस, दूध आता आईकडून नाही, कपातून/ग्लासातून घेऊया.” किंवा “आईचे दूध संपले आहे, आता आपण दुसरे चविष्ट खाणार आहोत.” काही आई हलके विनोदी किंवा कथारूप पद्धती वापरतात. “दूध छोट्या बाळांना दिले जाते, तू आता मोठा झाला आहेस!”
३. पर्यायी आहार आणि सवय लावणे:
सकाळी किंवा रात्रीच्या वेळी दूध (गायचे/फॉर्म्युला) ग्लासातून द्या.
फळे, सुका मेवा, दही, सूप, सॉफ्ट खाऊ यांचा आहारात समावेश करा.
पुरेसे पाणी, दूध आणि पोषक आहार दिल्यास बाळाला स्तनपानाची गरज वाटणार नाही.
आईनेही स्वतःची काळजी घ्यावी. पुरेसा आराम, योग्य आहार आणि आवश्यक असल्यास यादरम्यान डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.
४. रात्रीचे स्तनपान थांबवणे :
वीनींग प्रवासातील हे सगळ्यात अवघड असते, कारण बाळ झोपताना सवयीने दूध मागते. ही सवय तोडण्यासाठी,
झोपेपूर्वी पोट भरलेले ठेवा.
झोपवताना दुधाऐवजी गाणे, गोष्ट, मऊ खेळणी, हात धरून झोपवणे ही तंत्रे वापरा.
वडील किंवा आजी-आजोबांकडे झोपवा. त्यामुळे आई दिसत नसल्याने दूध मागणे कमी होते.
५. आईसाठी स्तनदुखी किंवा सूज कमी करण्याचे उपाय:
स्तनात ताण वाटल्यास थंड शेक किंवा गरम पाण्याने हलका शेक करा.
आवश्यक वाटल्यास थोडे दूध काढा. पूर्ण काढल्यास दूध परत तयार होते.
घट्ट पण आरामदायक ब्रा वापरा.
जर वेदना, लालसरपणा किंवा ताप वाटला — तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
६. प्रेम आणि संयम :
बाळासाठी स्तनपान फक्त अन्न नसते. ते पहिली ओळख, आवड, सुरक्षितता आणि जवळीक असते. त्यामुळे थांबवताना बाळाला जास्त मिठ्या, वेळ आणि प्रेम द्या. थोडा रडारोडा किंवा विरोध होईल, पण काही दिवसांत बाळ जुळवून घेतं.
अशा प्रकारे, स्तनपान बंद करणे ही प्रक्रिया आई आणि बाळ दोघांसाठीही तणावदायक काळ असतो. यात संयम, प्रेम आणि योग्य मार्गदर्शनाची गरज असते. हळूहळू व समजूतदारपणे ही प्रक्रिया केल्यास आई-बाळाच्या नात्यातील प्रेम आणि जिव्हाळा अबाधित राहतो आणि दोघांचे आरोग्यही चांगले राहते.

- डॉ. श्वेता राऊत मुळगावकर