टीम इंडियातील स्मृती, जेमिमा, दीप्तीला स्थान; हरमनला वगळले

बंगळुरू : भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेला ५२ धावांनी पराभूत करून विश्वचषक जिंकल्यानंतर, आयसीसीने महिला विश्वचषक २०२५ च्या ‘टीम ऑफ द टूर्नामेंट’ची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, भारताला पहिला विश्वचषक विजय मिळवून देणाऱ्या कर्णधार हरमनप्रीत कौर हिचा या सर्वोत्तम संघात समावेश करण्यात आलेला नाही.
विश्वविजेत्या भारत आणि उपविजेत्या दक्षिण आफ्रिकेच्या प्रत्येकी तीन खेळाडूंचा या ११ सदस्यीय संघात समावेश आहे. भारताकडून निवडले गेलेले खेळाडूंमध्ये सलामीवीर स्मृती मानधना, फलंदाज जेमिमा रॉड्रिग्ज, ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ दीप्ती शर्मा यांचा समावेश आहे.
दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वुल्व्हार्डटची या संघाची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. वुल्व्हार्डटने ७१.३७ च्या सरासरीने ५७१ धावा करून विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला. तिने उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध १६९ धावा आणि अंतिम फेरीत भारताविरुद्ध १०१ धावांची खेळी केली. स्मृती मानधना ही ५४.२५ च्या सरासरीने ४३४ धावा करून स्पर्धेत दुसरी सर्वाधिक धावा करणारी खेळाडू ठरली. तिच्या नावावर एक शतक आणि दोन अर्धशतके आहेत.
उपांत्य फेरीत पोहोचलेल्या ऑस्ट्रेलियन संघातील अॅनाबेल सदरलँड, अॅश गार्डनर आणि अलाना किंग या तीन खेळाडूंचा समावेश आहे. इंग्लंडची फिरकीपटू सोफी एक्लेस्टन हिलाही संघात स्थान देण्यात आले आहे. तर पाकिस्तानची सिद्रा नवाज ही बाद फेरी गाठण्यात अपयशी ठरलेल्या संघातून निवडलेली एकमेव खेळाडू आहे.
आयसीसीने निवडलेला सर्वोत्तम संघ
स्मृती मानधना (भारत), लॉरा वुल्व्हार्ड (दक्षिण आफ्रिका) (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्ज (भारत), मारिझान कॅप (दक्षिण आफ्रिका), अॅशले गार्डनर (ऑस्ट्रेलिया), दीप्ती शर्मा (भारत), अॅनाबेल सदरलँड (ऑस्ट्रेलिया), नदीन डी क्लार्क (दक्षिण आफ्रिका), सिद्रा नवाज (पाकिस्तान) (विकेटकीपर), अलाना किंग (ऑस्ट्रेलिया).