रणजी ट्रॉफी क्रिकेट: सुयश प्रभुदेसाई, अभिनव तेजराणाची दमदार शतके

पणजी : रणजी ट्रॉफीच्या चालू हंगामातील मोहाली येथे सुरू असलेल्या पंजाबविरुद्धच्या सामन्यात गोव्याने आपल्या फलंदाजीतून भक्कम ताकद दाखवली आहे. पंजाबने पहिल्या डावात ३२५ धावा केल्यानंतर गोव्याने प्रत्युत्तरादाखल ३ बाद ४३९ धावा करत ११४ धावांची भक्कम आघाडी घेतली आहे. गोव्याच्या फलंदाजांपैकी सुयश प्रभुदेसाई (१४९), अभिनव तेजराणा (१३१) आणि मंथन खूटकर (८६) यांनी अप्रतिम खेळी साकारून पंजाबच्या गोलंदाजांचा समाचार घेतला.
चार दिवसांचा हा सामना न्यू चढ्ढा स्टेडियम, मोहाली येथे सुरू आहे. पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गोव्याच्या गोलंदाजांनी पंजाबला ३२५ धावांवर रोखले. पंजाबकडून कर्णधार उदय सहारनने ११९ धावा करत आपले वर्चस्व दाखवले. त्याला सलिल अरोरा (६३) आणि हितेश राणा (३६) यांनी चांगली साथ दिली. गोव्यातर्फे दर्शन मिसाळने ३, वासुकी कौशिकने २, तर अर्जुन तेंडुलकर आणि मोहित रेडकरने प्रत्येकी १ गडी बाद केला.
फलंदाजीस उतरताच गोव्याच्या सलामीवीरांनी पंजाबच्या गोलंदाजांना दणका दिला. सुयश प्रभुदेसाई (५८) आणि मंथन खुटकर (६३) यांनी दुसऱ्या दिवसाअखेर १२२ धावांची अभेद भागीदारी करून चोख प्रत्युत्तर दिले.
तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होताच गोव्याने पहिल्या दिवसाची गती कायम ठेवली. सुयश प्रभुदेसाईने आपल्या दमदार फलंदाजीचा झंझावात सुरू ठेवत २२२ चेंडूत १४९ धावा (१७ चौकार) झळकावल्या. त्याचे दीडशतक एका धावेने हुकले.
त्याने मंथन खूटकरसोबत पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. मंथनने देखील १८५ चेंडूत ८६ धावा (९ चौकार) करून सुयशला साथ दिली. पंजाबच्या गोलंदाजांनी कसोशीने प्रयत्न केले, पण सुयश-मंथन जोडीवर त्यांना काहीही चालले नाही. अखेरीस मंथन मार्कंडेयच्या चेंडूवर पायचित झाला, तर सुयशला आयुष गोयलच्या थ्रोवर रनआऊट व्हावे लागले.
अभिनव तेजराणाचे झंझावाती शतक
दोन प्रमुख फलंदाज बाद झाल्यानंतर अभिनव तेजराणाने सुत्रे आपल्या हातात घेतली. त्याने केवळ १४० चेंडूत १३१ धावा झळकावत पंजाबच्या गोलंदाजांना हतबल केले. त्याच्या खेळीमध्ये ६ चौकार आणि तब्बल ७ षटकारांचा समावेश होता. अभिनवच्या या झंझावाती फलंदाजीने गोव्याचा डाव ४०० च्या पार गेला. तिसऱ्या दिवसाअखेर गोव्याचा स्कोअर ३ बाद ४३९ धावा झाला असून त्यांनी ११४ धावांची भक्कम आघाडी घेतली आहे. कर्णधार स्नेहल कवठणकर ५४ तर ललित यादव ३ धावांवर खेळत आहे. पंजाबकडून मयंक मार्कंडे आणि आयुष गोयल यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
संक्षिप्त धावफलक 
पंजाब : पहिला डाव: ३२५ (उदय सहारन ११९, सलिल अरोरा ६३) 
गोवा : पहिला डाव: ३ बाद ४३९ (सुयश प्रभुदेसाई १४९, अभिनव तेजरणा १३१, मंथन खूटकर ८६)