सामाजिक विचार परिवर्तनासाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक

मंत्री विश्वजीत राणे : आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोमेकॉत कार्यक्रम

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
12th October, 12:05 am
सामाजिक विचार परिवर्तनासाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक

पणजी : आजच्या युगात मुलगी आणि मुलगा असा फरक राहिलेला नाही. समाजातील मुलींविषयीचे गैरसमज दूर झाले पाहिजेत. सामाजिक विचार परिवर्तनासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन महिला आणि बालकल्याण मंत्री विश्वजीत राणे यांनी केले. शनिवारी गोमेकॉमध्ये आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खात्याच्या संचालिका ज्योती देसाई, सचिव अरुण कुमार मिश्रा, गोमेकॉ सुप्रीटेंडंट डॉ. राजेश पाटील उपस्थित होते.
राणे म्हणाले की, आज मुली मुलांबरोबरीने सर्व क्षेत्रांत आघाडी घेत आहेत. मुलगी शिकली तर सर्व कुटुंबाची प्रगती झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. योग्य पाठिंबा आणि संधी दिल्यास महिला चांगली कामगिरी करून दाखवत आहेत. यामुळे मुलगी जन्माला आली म्हणून वाईट वाटून घेणे अयोग्य आहे. उलट पालकांनी मुलींना शिक्षण, करिअर करण्यासाठी पाठिंबा देणे आवश्यक आहे. शिक्षण असेल तर आर्थिक स्थैर्यता येते. आर्थिक स्थैर्य असेल तर इतर सर्व गोष्टी योग्य प्रकारे होतात. त्यामुळे मुलींना शिक्षण मिळणे आवश्यक आहे.
ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बेटी बचाव बेटी पढाव अभियान सुरू केले होते. आता संपूर्ण देशभरात याचा चांगला परिणाम दिसत आहे. महिला, मुलींना सक्षम करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. यासाठी आरोग्य तसेच महिला आणि बालकल्याण खाते काम करत आहे. समाजात एखादे चांगले काम करण्यासाठी मंत्री, आमदार अथवा वरिष्ठ सरकारी अधिकारी असले पाहिजे असे काही नाही. सामान्य माणूस देखील आपल्या परीने समाजासाठी काम करू शकतो. मुली, महिलांविषयी दुजाभाव करणार नाही अशी प्रतिज्ञा प्रत्येकाने केली पाहिजे.
गर्भलिंग चाचणीच्या इच्छुकांसाठी समुपदेशन
गर्भाचे लिंग जाणून घेण्याची इच्छा असलेल्या काही जणांसाठी आरोग्य खात्यातर्फे गरोदर महिलांचे समुपदेशन करण्याबाबत विचार सुरू असल्याचे मंत्री राणे यांनी सांगितले. राज्यात गर्भलिंग चाचणी करणे कायद्याने गुन्हा आहे. असे असले तरी काही जण लिंग जाणून घेण्यास उत्सुक असतात. त्यासाठी समुपदेशनाद्वारे त्यांच्या मनातील गैरसमज दूर केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा