७ दरोडेखोरांनी लुटला ३५ लाखांचा ऐवज; चोरलेली कार पणजीत सापडली; आंतरराज्य टोळीचा संशय

प्रतिनिधी। गोवन वार्ता
म्हापसा : गणेशपुरी, म्हापसा येथील डॉ. महेंद्र घाणेकर यांच्या बंगल्यावर मंगळवारी पहाटे सात दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला. सुरीचा धाक दाखवून, तसेच मारहाण करून सुमारे ३५ लाखांचा ऐवज त्यांनी लुटला. हे दरोडेखोर बेळगावला पसार झाले असून त्यांचा शोध कर्नाटक पोलिसांच्या मदतीने म्हापसा पोलीस घेत आहेत. या गंभीर घटनेची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नोंद घेऊन पोलीस महासंचालक अलोक कुमार यांच्यासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरोडेखोरांनी पळवलेली डॉ. घाणेकर यांची कार पणजीत सापडली.
दरोड्याची ही घटना मंगळवारी पहाटे ३ ते ५ दरम्यान घडली. घाणेकर कुटुंब गाढ झोपेत होते. एक दरोडेखोर खिडकीचे लोखंडी ग्रील कापून घरात शिरला. मुख्य दरवाजा उघडून त्याने साथीदारांना आत घेतले. डॉ. घाणेकर यांची ८० वर्षीय आई स्वयंपाकगृहात चहा करत होती. तिला काही कळण्यापूर्वीच दरोडेदेखोरांनी तिच्यावर हल्ला केला. सुरीचा धाक दाखवून तिला तिथेच बांधून घातले. पहिल्या मजल्यावर झोपलेले डॉ. महेंद्र, डॉ. अनुराधा आणि त्यांची १४ वर्षीय कन्या यांना उठवून त्यांना सुरीचा धाक दाखवला. दरोडेखोरांनी त्यांच्याकडून कपाटाच्या चाव्या घेतल्या. सर्वांचे मोबाईल काढून घेतले. डॉ. अनुराधा यांना खोलीतील बाथरूममध्ये बंद केले. डॉ. घाणेकर यांना मारहाण करून बेडशीट व साडीच्या साहाय्याने त्यांना बांधून घातले. त्यांच्या कन्येला तिच्या खोलीत बंद केले. डॉक्टरांच्या खोलीतून मोठी रक्कम न सापडल्याने दरोडेखोरांनी सर्वांना जीवे मारण्याची धमकी दिली. घाणेकर यांच्या आईने १० लाख रुपयांची रक्कम दरोडेखोरांना दिली. कुटुंबियांचे दागिने, मोबाईल आणि रोख रक्कम मिळून एकूण ३५ लाखांचा मुद्देमाल घेऊन त्यांनी पळ काढला.

पहाटे ५ च्या सुमारास दरोडेखोर गेल्यानंतर घाणेकर कुटुंबियांनी कशीतरी आपली सोडवणूक करून घेतली आणि आरडाओरड करत घरातून बाहेर धाव घेतली. शेजारील लोकांना उठवले. घटनेची माहिती म्हापसा पोलिसांना देण्यात आली. दरोडेखोर आपली कर्नाटक नोंदणीकृत कार व डॉ. घाणेकर यांची कार घेऊन पसार झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक निखील पालेकर व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गणेशपुरी ते गिरी आणि करासवाडा मार्गांवरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. पणजीच्या दिशेने ५.१५ च्या दरम्यान दोन कार भरधाव जात असल्याचे दिसून आले. त्यामध्ये एक घाणेकर यांची कार होती. पोलिसांनी पर्वरी व पणजी पोलिसांना सतर्क केले. पणजी बसस्थानकासमोर अटल सेेतूच्या खाली डॉ. घाणेकर यांची कार बेवारस स्थितीत सापडली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पोलीस महासंचालक आलोक कुमार, महानिरीक्षक वर्षा शर्मा, अधीक्षक राहुल गुप्ता, उपअधीक्षक तुषार वेर्णेकर, विल्सन डिसोझा, गुन्हा शाखेचे उपअधीक्षक सूरज हळर्णकर व निरीक्षक तुषार लोटलीकर यांनी घटनास्थळाची पाहणी केली. दरोडा आंतरराज्य टोळीने घातल्याचे उघडीस आले असून पोलिसांनी दरोडेखोरांची ओळख पटवली आहे. त्यानुसार बेळगाव, बंगळुरू व कोल्हापूर भागांत पथके रवाना केली आहेत. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. ठसेतज्ज्ञ व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते.
घटनेचा पोलिसांकडून सखोल व योग्य दिशेने तपास सुरू आहे. या दरोड्यामागे सराईत गुन्हेगार आहेत. ते उत्तर भारतीय हिंदी भाषेत बोलत होते. आरोपींना शंभर टक्के अटक केली जाईल. असे गुन्हे घडू नयेत म्हणून रात्रीची गस्त वाढवण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत.
डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
भीतीचे वातावरण
या प्रकरणानंतर गणेशपुरी व म्हापसा शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. अनेक घरांत वृद्ध राहत आहेत. त्यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच भाजप नेते दत्तप्रसाद खोलकर व इतरांनी घाणेकर कुटुंबियांची विचारपूस केली.
बंगल्याची रेकी केल्याचा अंदाज
दरोडेखोरांची सात जणांची टोळी असून ते स्वीफ्ट कारने आले होते. दोघेजण पूर्वीच गोव्यात दाखल झाले होते. त्यांनी डॉ. घाणेकर यांच्या घराची रेकी केली. नंतर त्यांनी साथीदारांना बोलावून घेतले असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे.
घटनेतील महत्त्वाच्या गोष्टी
घाणेकर यांच्या आईने बनवलेला चहा दरोडेखोर प्यायले. स्वंयपाकगृहातील फ्रीजमधील सफरचंद, संत्रीही त्यांनी खाल्ली.
दरोडेखोरांनी सोबत आणलेली सुरी, हातोडा ही शस्त्रे घाणेकरांच्या घरातच टाकून दिली.
दरोडेखोरांनी सर्वांचे हात-पाय बांधून उशीमधील कापसाचे बोळे त्यांच्या तोंडात कोंबले.
दरोडेखोरांनी सीसीटीव्ही कॅमेरांचा डीव्हीआर काढून नेला.
दरोडेखोरांनी माकडटोप्या घातल्या होत्या. एक जण घराबाहेर पहारा देत होता. सर्वजण ३० ते ४० वर्षे वयोगटातील होते.
डॉ. महेंद्र व डॉ. अनुराधा म्हापसा जिल्हा इस्पितळात सेवा बजावतात.
दरोडेखोरांना बेळगावमध्ये सोडलेल्या टॅक्सी चालकाचा जबाब पोलिसांना नोंदवला आहे.