ईडीकडून अटक : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तपास सुरू

पणजी : गोव्यातील सर्वात मोठ्या भूखंड हडप घोटाळ्याचा कथित मास्टरमाईंड मोहम्मद सुहैल उर्फ मायकल याला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केल्यानंतर न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे. मेरशी येथील विशेष न्यायालयाने हा आदेश दिला.
बार्देश तालुक्यातील जमिनी बनावट कागदपत्रे तयार करून हडप केल्याचे समोर आल्यानंतर सरकारने विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली. यात मोठ्या प्रमाणात मनी लॉन्ड्रिंग झाल्याचे उघड झाल्यावर ईडीने तपास सुरू केला. ईडीने म्हापसा पोलीस स्थानकात नोंद झालेले तीन आणि एसआयटीने दाखल केलेले १५ गुन्हे विचारात घेऊन कारवाई सुरू केली आहे. या प्रकरणी मास्टरमाईंड मोहम्मद सुहैलसह इतरांविरोधात ईडीने न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.
दरम्यान, ईडीने आणखी एका जमीन हडप प्रकरणाची चौकशी सुरू केली असता, त्यात मुख्य सूत्रधार रोहन हरमलकर याचा सहभाग समोर आला आणि त्याला अटक करण्यात आली आहे. मोहम्मद सुहैलचा मोठ्या प्रमाणात सहभाग समोर आल्यामुळे ईडीने त्याची कोठडी मागण्यासाठी न्यायालयात अर्ज सादर केला. त्यानुसार, न्यायालयाने २२ जून रोजी सुहैलला ईडीच्या स्वाधीन केले. ईडी कोठडीची मुदत संपल्यानंतर सुहैलला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावली.
सशर्त जामीन मिळाल्यानंतर सुहैल होता फरार
यापूर्वी एसआयटीने सुहैलला अटक केली होती, मात्र सशर्त जामीन मिळाल्यानंतर तो गेल्या एक वर्षापासून फरार झाला होता. २० जून २०२५ रोजी सुहैल केपे परिसरात जमीन व्यवहार करण्यासाठी येणार असल्याची माहिती एसआयटीला मिळाल्यानंतर त्याला पुन्हा अटक करण्यात आली होती.