खासगी बसच्या अपघातात सातजण जखमी

धर्मापूर येथील घटना : बसने कंटेनरला दिली मागून धडक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
06th October, 12:10 am
खासगी बसच्या अपघातात सातजण जखमी

मडगाव : कुंकळ्ळीकडून मडगावच्या दिशेने येणार्‍या खासगी बसने धर्मापूर येथील गतिरोधकाकडे मोठ्या कंटेनरला मागून धडक दिली. यात बसमधील सात प्रवाशांना दुखापत झाली. दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात उपचाराअंती त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मडगाव पोलिसांनी अपघातप्रकरणी गुन्हा नोंद केला.

कुंकळ्ळी येथून मडगावच्या दिशेने येणार्‍या खासगी बसला शनिवारी सकाळी अपघात घडला. धर्मापूर येथील गतिरोधकानजीक येताच चालकाला वेगावर नियंत्रण मिळवता आले नाही. ही बस मडगावच्या दिशेने जाणार्‍या कंटेनरला मागील बाजूने धडकली. ही धडक एवढी मोठी होती की, खासगी बसचा दर्शनी भाग व आतील सीटही मोडल्या. अपघातात मोरपिर्ला येथील सात प्रवाशांना दुखापत झाली. यात रत्नावती गावकर (५०), दिक्षिता वेळीप (३९), सुनीता वेळीप (५०), प्रगती वेळीप (५५), सुचिता वेळीप (४९), प्रेमावती वेळीप (६०) व राधा वेळीप (५९) यांना दुखापत झाली होती. त्यांना तत्काळ दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात उपचारासाठी नेण्यात आले. उपचाराअंती त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. या महिला भाजी व अन्य वस्तूंची विक्री करण्यासाठी मडगाव बाजारात चालल्या होत्या. सदर कंटेनर वेर्णा येथील औद्योगिक वसाहतीत जाणार होता. अपघातातील बस पोलिसांनी ताब्यात घेतली असून हवालदार रुझारिओ डायस याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत. 

हेही वाचा