टॅक्सी पार्किंग शुल्कावरून मोपात टॅक्सी व्यावसायिक आक्रमक

विमानतळ परिसरात चढाई : मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन शमले

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
20 hours ago
टॅक्सी पार्किंग शुल्कावरून मोपात टॅक्सी व्यावसायिक आक्रमक

मोपा विमानतळ परिसरात जुन्या प्रवेशद्वाराच्या बाहेर आंदोलनकर्त्यांसोबत बोलताना विजय सरदेसाई, आरजी नेते मनोज परब, दीपक कळंगुटकर, चेतन कामत, रामा वारंग, निखिल महाले, आनंद गावस व इतर.

पेडणे : मोपा विमानतळावरील पार्किंग शुल्क वाढीच्या विरोधात गेले चार दिवस सुरू असलेल्या आंदोलनाचा सोमवारी उग्र रूप दिसून आले. वाढीव शुल्कामुळे संतप्त झालेल्या शेकडो टॅक्सी व्यावसायिक, त्यांचे कुटुंबीय आणि विविध पक्षांचे राजकीय नेते यांनी थेट मोपा विमानतळ परिसरात घुसून प्रशासकीय इमारतीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला.
जीएमआर कंपनीने टॅक्सी व्यावसायिकांना विश्वासात न घेता पूर्वीचे ८० रुपये शुल्क (जीएसटीसह) थेट २०० रुपये केल्याने हा उद्रेक झाला होता. आंदोलकांनी मोठ्या पोलीस बंदोबस्तालाही न जुमानता प्रशासकीय इमारत गाठली. यावेळी त्यांनी फक्त सीईओ शेषन यांनाच चर्चेसाठी बोलवावे, अशी मागणी धरली.
यावेळी गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई, आरजीचे मनोज परब यांच्यासह दीपक कळंगुटकर, अमित सावंत, निखिल महाले, आनंद गावस यांसह शिवम वॉरियर्सचे अध्यक्ष रामा वारंग यांनी आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी शिष्टमंडळाने पणजी येथील मुख्यमंत्र्यांच्या महालक्ष्मी बंगल्यावर त्यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी वाढीव शुल्क 'होल्डवर' ठेवून 'जैसे थे' ठेवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, येत्या ४ ऑक्टोबर रोजी वाढीव शुल्क आणि इतर विषयांवर खास बैठक आयोजित करण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला दिली. मुख्यमंत्र्यांच्या या आश्वासनानंतर आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले आहे.
जीएमआरचा मनमानी कारभार
शिवम वॉरियर्सचे अध्यक्ष रामा वारंग यांनी यावेळी जीएमआर कंपनीचा मनमानी कारभार वाढत असल्याचा आरोप केला. सीईओ शेषन कोणालाही जुमानत नाहीत आणि ते मुख्यमंत्र्यांच्या पूर्वीच्या बैठकीच्या इतिवृत्तालाही किंमत देत नाहीत, असा दावा त्यांनी केला. टॅक्सी संघटनेचे नेते मोगॅम्बो यांनी सरकार आणि जीएमआर कंपनीने शुल्क कमी न केल्यास त्याचे पडसाद संपूर्ण गोव्यातील पर्यटन व्यवसायावर उमटतील, असा इशारा दिला.

जीएमआर कंपनी स्थानिकांना कोणतीही सुविधा देत नाही, उलट बाहेरील लोकांचे चोचले पुरवण्याचे काम करत आहे. यामुळे मुख्यमंत्री जीएमआर कंपनीला बळी पडत आहेत. गेली दोन वर्षे टॅक्सी व्यावसायिक न्याय हक्कांसाठी लढत आहेत. भाजप सरकार आणि जीएमआर कंपनी वारंवार त्यांना रस्त्यावर उतरण्यास भाग पाडत आहे. हे प्रकार यापुढे खपवून घेतले जाणार नाहीत. - विजय सरदेसाई, आमदार तथा गोवा फॉरवर्डचे नेते

जीएमआरची हुकूमशाही वाढली : परब
सरकार वारंवार स्थानिकांना रस्त्यावर उतरवण्याचे काम करत आहे. सध्या नवरात्रोत्सव सुरू असताना, भाजप सरकारने महिलांना (नवदुर्गांना) आज रस्त्यावर येण्याची पाळी आणली आहे, जी शर्मेची आणि लज्जास्पद बाब आहे. या मोपा विमानतळासाठी स्थानिक भूमिपुत्रांनी जमिनी देऊन त्याग केला, पण त्यांना अजूनही पैसे मिळालेले नाहीत. जे स्थानिक बेरोजगार युवक टॅक्सी व्यवसाय करत आहेत, त्यांच्या पोटावर पाय ठेवण्याचे काम जीएमआर कंपनी आणि सरकार करत आहे. हे आंदोलन यापुढे अधिक तीव्र होईल, असा इशारा परब यांनी दिला.            

हेही वाचा