गोवा डेअरीच्या कामगारांकडून मागण्यांसाठी धरणे आंदोलन

गोवा डेअरीच्या गेटसमोर निदर्शने : आश्वासन मिळूनही मागण्यांची पूर्तता नाही

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
20 hours ago
गोवा डेअरीच्या कामगारांकडून मागण्यांसाठी धरणे आंदोलन

दादा वैद्य चौकात निदर्शने करताना गोवा डेअरीचे कामगार. सोबत कामगार नेते ख्रिस्तोफर फोन्सेका.

फोंडा : गोवा डेअरीच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी सोमवारी प्रातिनिधिक धरणे आंदोलन केले. गोवा मिल्क युनियन एम्प्लॉईस असोसिएशन व गोमंतक मजदूर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने हे निदर्शने करण्यात आले.
कामगारांनी सकाळी दादा वैद्य चौकात घोषणाबाजी केली. त्यानंतर त्यांनी गोवा डेअरीच्या गेटसमोर दुपारपर्यंत निदर्शने करत आपल्या मागण्यांचा जोर वाढवला. कामगार नेते ख्रिस्तोफर फोन्सेका व पुती गावकर यांनी आंदोलकांना मार्गदर्शन केले.
कामगारांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर २०२४ मध्येच त्यांनी संप पुकारण्याची नोटीस दिली होती. गोवा डेअरीच्या व्यवस्थापनाने कामगारांच्या अनेक मागण्या मागील कित्येक वर्षांपासून प्रलंबित ठेवल्याच्या निषेधार्थ हा संप पुकारला जाणार होता. त्यावेळी सहकार मंत्री सुभाष शिरोडकर यांनी मध्यस्थी करून काही मागण्या मान्य करण्यासंबंधी आश्वासन दिले होते. यंदा चतुर्थीच्या अगोदरही मंत्री सुभाष शिरोडकर यांच्याबरोबर कामगार युनियनची बैठक झाली होती. मात्र, तिथेही कामगारांचे समाधान करण्यात आले नाही. दरम्यान, सोमवारी कामगारांनी पुन्हा एकदा मागण्यांचे निवेदन गोवा डेअरीच्या व्यवस्थापन समितीला दिले.

कामगारांच्या प्रमुख मागण्या
- पगारातील डीएमध्ये वाढ करणे.
- २०२३ पासून डीएची तफावत देणे.
- कंत्राटी व रोजंदारीवरील कामगारांना नोकरीत नियमित करणे.
- पगाराच्या स्केलमध्ये वाढ करणे.
- सातव्या वेतन आयोगाचे फायदे डेअरी कामगारांना देणे.
- गोवा डेअरीमध्ये चालू असलेला भोंगळ कारभार सुधारणे.
गोवा डेअरीच्या उत्पादनाचा खप वाढवणे.

हेही वाचा