गवळी-धनगरांना एसटी दर्जासाठी पाठपुरावा करू; मुख्यमंत्र्यांचे शिष्टमंडळाला आश्वासन

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
20 hours ago
गवळी-धनगरांना एसटी दर्जासाठी पाठपुरावा करू; मुख्यमंत्र्यांचे शिष्टमंडळाला आश्वासन

गवळी-धनगर समाजाच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व बाबू कवळेकर.

पणजी : राज्यातील गवळी-धनगरांना एसटी दर्जा मिळून देण्यासाठी पर्यंत करू, तसेच या मुद्द्याचा पाठपुरावा करून भारतीय महानिबंधकांची (आरजीआय) एकत्र बैठक घेऊन हा विषय मार्गी लावण्यावर भर देण्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी धनगर समाजाच्या शिष्टमंडळांला आश्वासन दिल्याचे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत (बाबू) कवळेकर यांनी सांगितले.
गेली वीस वर्षे गवळी-धनगरांना एसटी दर्जा मिळून देण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. पूर्वी ‘गाकूवेध’ संघटनेमार्फत प्रयत्न चालू होते. यात गावडा, कुणबी, वेळीप या समाजाला एसटी दर्जा मिळाला. या तीनही समाजाला एसटी दर्जा मिळाल्याचे आम्ही स्वागत करतो. पण धनगर समाजाला अजूनही एसटी दर्जा मिळाला नाही. समाजाकडून सविस्तर कागदपत्रे देऊनही भारतीय महानिबंधक कार्यालयातून प्रत्येक वेळी त्रुटी काढत राहिल्यामुळे गेल्या २० वर्षांपासून राज्यातील धनगर समाजाला एसटी दर्जा मिळाला नाही, असे कवळेकर यांनी सांगितले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या गोवा भेटीच्या प्रसंगी हा मुद्दा त्यांच्या समोर मांडण्याचा पर्यंत करू किंवा पुढील महिन्यात केंद्रीय गृहमंत्र्यांची दिल्लीत भेट घेऊन या विषयावर चर्चा करून लवकरात लवकर राज्यातील गवळी, धनगर समाजाला एसटी दर्जा देण्याचा प्रयत्न करू, असे मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांनी आश्वासन दिल्याचे कवळेकर यांनी सांगितले.      

हेही वाचा