दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
मडगाव: दसरोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण गोव्यातील मंदिरांमधील गर्दीचे व्यवस्थापन, वाहतूक कोंडी आणि अत्यावश्यक सेवांबाबत नियोजन करण्याचे आदेश दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. पोलिस, आरोग्य, अग्निशमन दल, बांधकाम खाते आणि मंदिर व्यवस्थापनांना हे आदेश जारी करण्यात आले आहेत.
दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस यांनी १ आणि २ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या दसरोत्सवादरम्यान सार्वजनिक सुरक्षा, कायदा आणि सुव्यवस्था तसेच आपत्कालीन सज्जता सुनिश्चित करण्यासाठी हे निर्देश जारी केले आहेत. जिल्ह्यातील सर्व संबंधित अधिकारी आणि मंदिर समित्यांमध्ये समन्वयाने काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मागील काही घटनांमध्ये गर्दीचे व्यवस्थापन, वाहतूक नियंत्रण आणि आपत्कालीन प्रतिसादात काही अडचणी आल्या होत्या. वेळेवर नियोजन आणि सर्वांच्या समन्वयामुळे अशा घटना टाळता येऊ शकतात. त्यामुळे, उत्सवादरम्यान प्रमुख मंदिरांमध्ये अपेक्षित असलेली गर्दी लक्षात घेऊन नियोजनाचे निर्देश देण्यात आले आहेत.
उपजिल्हाधिकारी आणि उपविभागीय दंडाधिकारी यांनी उत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी मंदिर समित्या आणि संबंधित विभागांसोबत बैठका बोलावल्या आहेत. मामलेदार आणि सहाय्यक मामलेदारांसह सर्व कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी आपल्या अधिकारांचा वापर करून संपूर्ण उत्सवादरम्यान नेमलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक आहे.
दक्षिण गोवा पोलिस अधीक्षकांनी मोक्याच्या ठिकाणी आवश्यक कर्मचारी वर्दीत असतील याची खात्री करावी. उपविभागीय अधिकारी आणि पोलिस निरीक्षक गर्दीचे नियमन करतील तसेच संवेदनशील भागांवर २४ तास देखरेख ठेवतील. मंदिर समित्यांनाही प्रवेश आणि बाहेर पडण्याचे मार्ग निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस आणि कार्यकारी दंडाधिकाऱ्यांशी समन्वय साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. अग्निशमन दलाने जास्त गर्दीच्या ठिकाणी अग्निशामक यंत्रे आणि वाहने तैनात करावीत. आरोग्य सेवा संचालनालयाने आपत्कालीन उपकरणांनी सुसज्ज रुग्णवाहिका आणि प्रथमोपचार बूथ तयार ठेवावेत.
कोणत्याही सार्वजनिक अधिकारी किंवा एजन्सीने या आदेशाचे पालन न केल्यास ते कर्तव्यपूर्तीमध्ये कसूर मानले जाईल आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आणि दक्षिण गोव्यात धार्मिक उत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी हे उपाय अत्यंत महत्त्वाचे आहेत. या आदेशांच्या प्रती पोलिस, उपजिल्हाधिकारी, आणि गृह विभागासह सर्व संबंधित अधिकाऱ्यांना पाठवण्यात आल्या असून, त्यांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.