चेन्नई: एका बाजूला करूर येथील रॅलीत झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्दैवी घटनेचे दु:ख आणि दुसऱ्या बाजूला जीवाला धोका. तामिळनाडूच्या राजकारणात पाऊल ठेवण्याची तयारी करणाऱ्या अभिनेता थलपती विजय यांच्या अडचणी संपता संपत नाहीत. या हृदयद्रावक घटनेनंतर त्यांना बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.
करूर येथे राजकीय हेतूने काढण्यात आलेल्या थलपती विजय यांच्या प्रचार रॅलीत शनिवारी अचानक चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत ३९ निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला, तर १०० पेक्षा जास्त लोक जखमी झाले. या घटनेनंतर तीव्र संतापाची लाट उसळली असून, विरोधकांनीही विजय यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. या घटनेचे पडसाद उमटत असतानाच त्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
धमकी मिळाल्यानंतर विजय आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहेत. त्यांच्या निवासस्थानी सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आली असून, चेन्नई पोलीस आणि सीआरपीएफच्या जवानांना तैनात करण्यात आले आहे. पोलिसांची पथके धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. धमकीनंतर स्निफर डॉग्स आणि बॉम्ब पथकाने विजय यांच्या घराची कसून तपासणी केली, मात्र कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही.
या तणावपूर्ण परिस्थितीत पोलीस यंत्रणा जनतेला शांतता राखण्याचे आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन करत आहे. दुसरीकडे, थलपती विजय यांनीही चेंगराचेंगरीच्या घटनेवर शोक व्यक्त करत आपल्या चाहत्यांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. या संकटाच्या काळात विजय त्यांच्या चाहत्यांच्या आणि जनतेच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करत आहेत.